आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अद्ययावत ‘बसपोर्ट’मुळे बदलणार जळगावातील बसस्थानकाचे रुपडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव  - शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाचे रुपडे पालटून आता अद्ययावत बसपोर्ट हाेणार अाहे. यात प्रवाशांना व्यापारी संकुल, मॉल, आधुनिक सेवासुविधा मिळणार अाहेत. ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’ या अंतर्गत हा उपक्रम राबवला जाणार आहे.
 
पुढील वर्षभरात बसपाेर्टच्या बांधकामास सुरुवात होण्याची स्थिती असून यादरम्यान पर्यायी बसस्थानक विभागीय कार्यालय नेरीनाका वैकुंठधामजवळील एसटी वर्कशॉपमध्ये स्थलांतरित होणार आहे. केंद्राच्या योजनेतून याविषयी प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला अाहे. याला परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दुजोरा दिला आहे. 
 
शहराच्या मध्यवर्ती भागात सुमारे २५ एकरच्या जागेत नवीन बसस्थानक वसलेले आहे. मात्र, या जागेची रचना ही योग्य पद्धतीने झालेली नाही. त्यामुळे अनेक साेयीसुविधांपासून प्रवाशांना वंचित राहावे लागते. या जागेचा पुरेपूर उपयोग करीत आगाराचे उत्पन्न वाढवण्यासह प्रवाशांना सुविधा देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे जळगावच्या आगारात नाशिक येथील ठक्कर बाजाराच्या धर्तीवर ‘बसपोर्ट’ तयार करण्यात येणार आहे.
 
यासह अजून काय करता येईल, याचा आराखडा महामंडळाने तयार केला आहे. आगारातील जागेचे मोजमाप विभागाच्या मुंबई कार्यालयातील आर्किटेक्चर यांनी नुकतीच केली असून सध्या बसपाेर्टच्या डिझाइनचे काम सुरू केले आहे. तसेच यासंबंधीचा प्रस्तावही शासनाकडे पाठवण्यात अाला आहे. 
 
या सुविधा प्रवाशांना मिळणार 
प्रशस्त प्रतीक्षालय, स्वतंत्र रिझर्व्हेशन सेंटर, बसण्यासाठी अत्याधुनिक सीट्स, वायफाय सुविधा, पिण्यासाठी अॅक्वाचे पाणी, अद्ययावत पार्किंगची सुविधा, स्वच्छ प्रसाधनगृहे, हायटेक विभागीय कार्यालय. 
 
अद्ययावत बसस्थानकाच्या निर्मितीची जाेरदार चर्चा सध्या आगारात सुरू झाली आहे. आगारात सध्या १८ बस प्लॅटफाॅर्म आहेत. या प्लॅटफाॅर्मची संख्या वाढून ती २५ पर्यंत पोहाेचेल. कार्यालयाची इमारत पाडून त्या जागेवर चार मजली लिफ्टसह इमारत उभारण्याचे नियोजन आराखड्यात आहे.
 
आगाराच्या दोन्ही बाजूने शॉपिंग मॉल, व्यापारी संकुल असणार आहेत. या दुकानांच्या माध्यमातून आगाराचे उत्पन्न वाढवण्यासाठी हे नियोजन आहे. सध्या आगारातील रिकामे साहित्य हटवणे काही बांधकाम पाडण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. 

शहरातील याच बसस्थानकात अद्ययावत ‘बसपोर्ट’ तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या अाहेत. वर्षभरात होणार कामास सुरुवात , एसटी वर्कशॉप येथे होणार पर्यायी बसस्थानक प्रस्ताव तयार
- जळगाव आगाराच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेतले आहे. यासाठीचा प्रस्तावही तयार केला आहे. नाशिकपेक्षाही अधिक चांगल्या प्रतीचे जळगावात बसस्थानक तयार केले जाणार आहे. यासाठी आर्किटेक्चर नियुक्त केले आहे. त्यांनी पाहणी करून डिझाइनचे काम सुरू केले आहे. पारदर्शी पद्धतीने बांधकाम पूर्ण होऊन प्रवाशांसाठी अद्ययावत ‘बसपाेर्ट’ याठिकाणी तयार केले जाणार आहे. वर्षभरात निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू होईल. दिवाकर रावते, परिवहनमंत्री 
 
जागेचे मोजमाप झाले 
-बसपाेर्ट तयार करण्याच्या दृष्टीने वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना आहेत. यासाठी जागेचे मोजमाप झाले आहे. मात्र, यासाठी निधीची तरतूद, निविदा याविषयी कोणतीही माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. वरिष्ठ कार्यालयाकडूनच हा प्रकल्प राबवला जाईल, त्यामुळे बसस्थानकाचे स्थलांतराविषयीचे अद्याप नियोजन नाही. चेतना खिरवाडकर, विभाग नियंत्रक 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...