आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिनावलला तणावपूर्ण शांतता; 121 जणांवर दंगलीचा गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिनावल/सावदा- चिनावल(ता. रावेर) येथे मंगळवारी बाजारात दुकान लावण्याच्या जागेवरून दोन गटात वाद उफाळला. या वादाचे रूपांतर दंगलीत झाल्याने गावात दगडफेकीसह वाहने, दुकानांची तोडफोड झाली. त्यात दोन्ही बाजूंकडील हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. गावात अजूनही तणावपूर्ण शांतता आहे. 
 
या प्रकरणी परस्परविरुद्ध तक्रारीनुसार १२१ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी १० जणांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येते. अपर पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर गावात तळ ठोकून आहेत. मंगळवारी रात्री उशिराने दंगलप्रकरणी परस्परविरुद्ध तक्रारी दाखल झाल्या. त्यात गौरी योगेश भंगाळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संगीता विनायक गाजरे बाजारात भाजीपाला विक्री करतात. मात्र, त्यांच्या जागेवर गावातील शेख सत्तार शेख सुपडू हा भाजीपाला विक्रीसाठी बसला होता. संगीता गाजरे त्यांचे पती विनायक गाजरे यांनी शेख सत्तारला आमच्या जागेवर का बसला? अशी विचारणा केली. 
 
दगडफेक दुकानांची तोडफोड 
दुसऱ्या गटाकडून जाकीर शेख जहाँगीर (वय २८, रा.फारुके आजम कॉलनी) यांनी फिर्याद दिली. त्यात गुफरान शेख अक्रम, सत्तार खान सुपडू खान हे बाजारात भाजीपाला मसाला विक्री करत होते. योगेश भंगाळे याने फिर्यादीस मारहाण करत बुरखा ओढला.
 
तसेच बाजार गावात दगडफेक करून जावेदखान गफ्फारखान यांची रिक्षा, हनीफ शेख इब्राहिम मन्यार याची छोटा हत्ती रिक्षा, नजीर शेख यांचे दुकान, शेख मोहसीन यांच्या मोबाइल शॉपीची तोडफोड केल्याचा उल्लेख आहे.
 
तसेच आरोपींनी केलेल्या मारहाणीत जाकिराबी शेख बशीर, जयतुनबी शेख जागीर, जुलेखाबी शेख फयास, तसलीमाबी शेख शफी, जैतुनबी शेख जहाँगीर, बानोबी शेख हे जण जखमी झाले आहेत. 
 
विनयभंगाची तक्रार 
काही आरोपींनी बळजबरीने फिर्यादीच्या घरात घुसून विनयभंग केला. शस्त्रांचा धाक दाखवून घरातील कपाटामध्ये ठेवलेले ६० हजारांचे दागिने बळजबरीने हिसकावून नेले. घरासमोरील दुचाकींची तोडफोड करत मोहीत महाजन, विलास महाजन, रवींद्र बोंडे, हेमंत नेमाडे, सचिन महाजन, अतुल महाजन, हर्ष बढे, प्रकाश भारंबे, विनायक गाजरे या १० जणांना मारहाण करून जखमी केले. यानुसार शेख कयाम शेख कुतुबद्दीन, शेख वाहेद खान, शेख इरफान, शेख हयाद खान, शेख अमजद आदी ५२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक जयंत सातव तपास करत आहेत. 
 
गावाला छावणीचे स्वरूप 
पोलिस गावात येत असल्याचे पाहून दंगेखोरांनी मुख्य गल्ली सोडून इतर वस्त्यांना लक्ष्य केले. यामुळे भयभीत झालेल्या ग्रामस्थांनी शेकडोच्या संख्येने ग्रामपंचायतीजवळ एकत्र येत समाजकंटकांच्या अटकेसाठी ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. डीवायएसपी अशोक थोरात, मुक्ताईनगरचे डीवायएसपी समीर शेख इतरांनी ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो निरर्थक ठरला. 
 
एसपी डॉ.सुपेकरांची भेट 
चिनावलमधीलदंगलीची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, अप्पर अधीक्षक नंदकुमार ठाकूर चिनावलमध्ये दाखल झाले. तत्पूर्वी त्यांनी दंगा नियंत्रण पथक, एसआरपीच्या तुकडीसह रावेर, सावदा, फैजपूर, भुसावळ, निंभोरा या पोलिस ठाण्यांतील अधिकारी आणि अतिरिक्त मनुष्यबळ चिनावलमध्ये दाखल झाले होते. डॉ.सुपेकर यांनी दंगेखोर कोणीही असले तरी कारवाई होईल, असे आश्वासन दिले. यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, तरीही गावात तणावपूर्ण शांतता आहे. 
 
घरात घुसून मारहाण 
कोणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसलेल्या दंगेखोरांनी काही भागांत घरात घुसून महिलांना मारहाण विनयभंग केल्याचीही कुजबुज आहे. समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत बाजार गल्लीतील योगेश भंगाळे, चतुर महाजन, संजय महाजन यांच्या घरांचे नुकसान झाले.
 
तसेच विनोद नेमाडे, पिंटू साळुंके, एसटी स्टॅण्ड परिसरातील दुकानांचीदेखील तोडफोड करण्यात आली. याशिवाय सावखेडा रोड कब्रस्तानजवळील काही दुकाने आणि बाजार गल्लीतील शेख मोहसिन यांच्या मोबाइल शॉपीचे नुकसान झाले आहे. 
 
जखमींची नावे अशी 
दंगेखोराच्या प्रचंड दगडफेकीत मोहित विलास महाजन, चतुर इच्छाराम महाजन, सचिन अमृत महाजन, अतुल हरी महाजन, प्रकाश वसंत भारंबे, विलास नामदेव महाजन, नीलेश कैलास नेमाडे, संगीता विनायक गाजरे, रवींद्र नारायण बोंडे, गाैरी योगेश भंगाळे हे जखमी झाले आहेत. पोलिसांनी सर्व जखमींना रावेर ग्रामीण रुग्णालयात पाठवले. 
बातम्या आणखी आहेत...