आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमी काेब्रा जातीच्या सर्पावर शस्त्रक्रिया, म्हशीला चावा घेतल्याने कोब्राची तुटली शेपटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - एका म्हशीला चावा घेतल्यानंतर म्हशीने ठेवलेल्या पायामुळे काेब्रा जातीच्या सर्पाची शेपटी तुटली हाेती. या संदर्भात वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सभासदांना माहिती दिली असता त्यांनी काेब्रावर यशस्वी उपचार केले. तर म्हशीवरही उपचार सुरु अाहेत. 
 
हनुमाननगर परिसरात संदीप गजानन पाठक यांच्या गोठ्यातील म्हशीस कोब्रा जातीच्या सर्पाने पायावर चावा घेतला हाेता. तर या वेळी बिथरलेल्या म्हशीचा पाय पडल्यामुळे कोब्राच्या शेपटीचा खालच्या भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला होता. पाठक यांनी कोब्राला पाहून वन्यजीव संरक्षण संस्थेच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून माहिती दिली. संस्थेचे सर्पमित्र घटनास्थळी पोहोचून त्यांनी जखमी कोब्रा ताब्यात घेतला. तसेच म्हशीची परिस्थिती पाहता पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय गायकवाड यांना माहिती देण्यात अाली. जखमी कोब्राला पशुवैद्यकीय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. जखमी कोब्राची शेपूट वाचवून ती शरीराला जोडण्याच्या उद्देशाने प्रयत्न करण्यात आले. परंतु शेपटी पूर्णपणे तुटलेली असल्याने तसेच मांस हाडांचा देखील चुरा झाल्याने डॉ. गायकवाड यांनी पेनिसच्या खालची बाजू काढून टाकण्याचा निर्णय घेतला. २५ मिनिटे चाललेल्या शस्रक्रियेनंतर कोब्राला वाचवले. या शस्रक्रियेत डॉ. उमेश सोनवणे यांचे सहकार्य लाभले. वन्यजीव संरक्षण संस्थेचे बाळकृष्ण देवरे, रवींद्र सोनवणे, वासुदेव वाढे, राहूल सोनवणे, शुभम पवार, अभिषेक ठाकूर, नीलेश ढाके, सतीश जवळकर, चेतन भावसार, ऋषी राजपूत, योगेश गालफाडे यांनी सहकार्य केले. 
 
संस्थेच्या ताब्यात राहणार काेब्रा 
पथराड येथील तमाशामध्ये सापांचा खेळ सुरू होता. तेथील जप्त केलेल्या कोब्राची देखील वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पुरेसे भक्ष्य मिळाल्यामुळे तो देखील अशक्त झाला होता. त्याचे विषदंत येण्यासाठी अजून १५ ते २० दिवस लागू शकतात. त्यामुळे या दोन्ही सर्पांना निगरणीत ठेवणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. जळगाव वनविभाग सहायक उपवनसनरक्षक डी. आर. पाटील, वनक्षेत्रपाल एन. ए. पाटील, एरंडोल वनक्षेत्रपाल बी. एस. पाटील यांना सूचित करून वनविभागाच्या परवानगीने वन्यजीव संरक्षण संस्थेच्या ताब्यात दोन्ही कोब्रा सर्प ठेवण्यात आले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...