आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणच्या दुर्लक्षामुळे विजेची गळती ४० टक्क्यांवर, विजेची सर्रास चोरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहर आणि विजेच्या समस्या हे सूत्र गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. गेल्या काळात शहरात वीजपुरवठ्याच्या पायाभूत सुविधा नव्हत्या, यामुळे वीजगळतीचे प्रमाण वाढले होते. मात्र, सहा महिन्यांपूर्वी शहरातील दोन्ही भागांसाठी स्वतंत्र सबस्टेशनची उभारणी करण्यात आली. यामुळे विजेची गळती कमी होण्यास मदत होणार आहे. मात्र, पायाभूत सुविधा होऊनही शहरातील वीज गळतीचा प्रश्न सुटत नसल्याचे चित्र आहे. शहरातील दक्षिण भागात सर्वाधिक वीजचोरी होते. महावितरणला ही चोरी थांबवण्यासाठी अपयश येत आहे. बहुतांश सर्वच भागांमध्ये राजकीय पदाधिकाऱ्यांचा आश्रय घेऊन थेट वीजतारांवर आकडे टाकून विजेची चोरी केली जाते. उन्हाळ्यात वीजचोरीचे प्रमाण अधिक असते, मात्र आता हिवाळ्यातही जामनेर रोडवरील भाग, गौसियानगर, पापानगर, काझी प्लॉटचा भाग, खडका रोडवरील विस्तारित भाग, झोपडपट्टी भाग आदी ठिकाणी वीज खांबांवर दिवसाढवळ्या आकडे टाकले जातात.
महावितरणचे कर्मचारी कारवाई करण्यासाठी गेल्यास दमदाटी करणे किंवा राजकीय बळाचा वापर करून धमक्या दिल्या जातात. यामुळे काही भागांमध्ये वर्षानुवर्षे वीज चोरीचे प्रकार सुरूच आहेत. महावितरणच्या वरिष्ठांकडून कर्मचाऱ्यांना पोलिस संरक्षण दिले जात नाही. तसेच कायदेशीर कठोर कारवाई करण्यासाठी पाठबळ दिले जात नाही, यामुळे वीजचोरीचे प्रकार सुरूच आहे. यामुळे शहरातील वीजगळती वाढून त्याचा त्रास आणि भुर्दंड सर्वसामान्य वीज ग्राहकांना सोसावा लागत आहे. महावितरण कंपनीकडून चोरी थांबवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
समस्या झाली दूर : महावितरणकंपनीकडून शहरात यापूर्वी कमी दाबाने वीजपुरवठा केला जात होता. मात्र, गेल्या काळात महावितरणने तापीनगर आणि नाहाटा महाविद्यालयाच्या परिसरात दोन्ही भागांसाठी स्वतंत्र वीज उपकेंद्राची उभारणी केली. यामुळे आता शहरातील सर्व भागांना पूर्ण दाबाने वीजपुरवठा होत आहे. यामुळे वीज ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होत असले तरी केवळ वीजचोरी वाढल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
एरिअल बंच केबल ठरली निरुपयोगी
महावितरण कंपनीने शहरात वीजपुरवठ्याच्या पायाभूत सुविधा पुरवल्या आहेत. मात्र अद्यापही गळती कमी होण्याचे नाव नाही. शहरातील दक्षिण भागात वीजचोरीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शहरातील गळतीचे प्रमाण आता ४० टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. शहरातील बहुतांश भागांमध्ये वीज चोरीचे प्रमाण वाढल्याने आता महावितरण कंपनीने शहरातील विविध भागांमध्ये कारवाईची मोहीम राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.

उपाय ठरले व्यर्थ : शहरातकाही ठिकाणी वीजचोरीचे प्रकार वाढले होते. या भागात महावितरण कंपनीने एरिअल बंच केबल अर्थात रबरी वेष्टन असलेल्या वीजतारांचा वापर केला. मात्र, अशा ठिकाणी आता दूर अंतरावरील वीजतारांवर आकडे टाकले जातात. एरिअल बंच केबलचा शोधलेला उपायही यामुळे व्यर्थ ठरला. विजेची मेन लाइन खांबावर आणून आर्थिंग घराजवळ मोकळ्या जागेत तयार करून काही ठिकाणी जिवघेणा खेळ सुरू आहे.

रिमोटचा वापर
शहरातवीजचोरी करण्यासाठी यापूर्वी मीटरमध्ये छेडखानी केली जात होती. मात्र, आता मीटरमध्ये छेडखानी करता रिमोटचा वापर करून मीटरचा वापर सुरू असतानाही ते बंद करून ठेवता येते. शहरात गेल्या काळात तीन ग्राहकांकडे कारवाई करून महावितरणने रिमोटद्वारे होणाऱ्या वीज वीजचोरीचा शोध लावला होता. शहरात अजूनही याच पद्धतीने वीजचोरी केली जाते. यामुळे महावितरण कंपनीने व्यापक शोधमोहीम राबवल्यास या प्रकारांवर नियंत्रण येऊ शकेल, त्यामुळे उपाय आवश्यक आहेत.

शहरात सर्वेक्षण करून कारवाई करणार
-महावितरणकंपनीनेशहरातील बहुतांश वीजगळती आणि चोरी थांबवण्यात यश मिळवले आहे. आवश्यक ठिकाणी एरिअल बंच केबलचा वापर केला आहे. रिमोटच्याही केसेस शोधल्यामुळे हे प्रकार कमी झाले. मात्र, याबाबत पुन्हा सर्वेक्षण करून कारवाई केली जाईल. तसेच वीजचोरीचे प्रकार अाढळून आल्यास कारवाई केली जाईल.
-व्ही.डी. नवघरे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, भुसावळ
बातम्या आणखी आहेत...