आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे, नंदुरबारात मंत्री खडसेंनी लावले कृषी विद्यापीठाचे भांडण, पाटील यांचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी माजी अामदार प्रा. शरद पाटील यांचे डिपाॅझिट जप्त झाल्याचा मुद्दा उकरून काढल्यानंतर प्रा. पाटील यांनी खडसे यांना थेट खुल्या चर्चेचे अाव्हान दिले. कृषी विद्यापीठाचा मुद्दा धुळ्यात पेटल्यापासून ना. खडसे हे धुळ्याचे कार्यक्रमही टाळत अाहेत. त्याचबराेबर नंदुरबारचे नागरिक विद्यापीठ मागत असल्याचे सांगत धुळे नंदुरबारमध्येही भांडण लावण्याचे काम करीत असल्याचा अाराेप प्रा. पाटील यांनी केला अाहे.

धुळे शहरात कृषी विद्यापीठ व्हावे, यासाठी निमंत्रक म्हणून प्रा. शरद पाटील यांनी संघर्ष सुरू केला अाहे. मात्र महसूल तथा कृषिमंत्री यांनी ही लढाई वैयक्तिक पातळीवर अाणून ठेवली, असा अाराेप करीत प्रा. शरद पाटील यांनी म्हटले की, शिरपूर येथे काल रविवारी महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ना. खडसे यांनी डिपाॅझिट जप्त झाल्याचा मुद्दा काढला. मात्र, निवडणुकीत डिपाॅझिट परत मिळविता येते, पण कृषी िवद्यापीठ अाता मिळाले नाही, तर पुढील काळात काेणताही प्रकल्प धुळ्याला मिळणार नाही. धुळे शहरात कृषी विद्यापीठासाठी पूरक सामग्री अाहे. म्हणून सन २०१० पासून यासाठी प्रयत्न सुरू अाहेत.

धुळे जिल्ह्यातील मागासलेपण दूर हाेऊन शेतीचा विकास व्हावा, यासाठी हे विद्यापीठ गरजेचे अाहे. मात्र, हे विद्यापीठ जळगावकडे त्यातही मुक्ताईनगरला नेण्याचा घाट घातला जात अाहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावात नेल्यानंतर या दुसऱ्या विद्यापीठासाठीही प्रयत्न चालविले अाहेत. मुळात हे विद्यापीठ धुळ्यात हाेणे कसे अयाेग्य अाहे, हे ना. खडसे यांनी पटवून द्यावे. त्यासाठी कृती समितीशी त्यांनी खुली चर्चा करावी. खडसेंना याेग्य वाटल्यास त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या गल्ली क्रमांक मधील कार्यालयासह जिथे शक्य हाेईल तिथे म्हणजे अगदी मुंबई, जळगाव येथे खुली चर्चा केली तरी अाम्ही तेथे जाऊ. मात्र, चर्चेचे हे अामंत्रण त्यांनी स्वीकारावे, टाळू नये, अशी भूमिकाही प्रा. शरद पाटील यांनी मांडली. या वादामुळे भाजप शिवसेनेतील दरी आणखी रुंदावत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या कृषी विद्यापीठासाठी शहरात विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले. त्यानंतर धुळ्यातच हे विद्यापीठ यावे, यासाठी विविध स्तरावर चर्चाही होत आहे. नागरिकही त्याच बाजूने बोलतात. शहराला लौकिक मिळवून देईल, असे काहीतरी शहरानजीक घडावे, असे नागरिकांना वाटते. तीच भूमिका कृती समितीच्या माध्यमातून मांडली जात आहे. त्यावर शासनाने विचार करावा.

धुळे-नंदुरबारमध्ये भांडणे
विधानपरिषदेत ३० मार्च राेजी कृषी विद्यापीठाच्या चर्चेवर अर्धा तास उत्तर देताना ना. खडसे यांनी दुपारी ११ वाजून ५० मिनिटांनी सांगितले हाेते की, कृषी विद्यापीठ निर्मितीबाबत धुळे, नंदुरबार की जळगाव असा पेच शासनापुढे अाहे. यामध्ये नंदुरबारवासीयांनी मागणी केलेली नाही. मात्र ना. खडसे यांनी वाद लावण्याचा प्रयत्न केला, असा टोलाही प्रा. शरद पाटील यांनी दिला.

अमळनेर, चोपडा, पारोळा, चाळीसगाव येथील सर्वपक्षीय आजी‑माजी आमदारांनी शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांनी धुळ्यातच कृषी विद्यापीठ व्हायला हवे, असे म्हटले. तर चंद्रकांत रघुवंशी, दीप्ती चौधरी, भाई जगताप, संजय दत्त, विद्या चव्हाण, प्रा. जाेगेंद्र कवाडे या आमदारांनी विधान परिषदेत धुळ्यासाठी जाहीर पाठिंबा दिला आहे.

ना. खडसे टाळतात धुळ्याला
धुळेशहरात कृषी विद्यापीठाचे अांदाेलन उभे राहिल्यानंतर महसूल कृषिमंत्री ना. एकनाथ खडसे यांनी धुळे शहरात कार्यक्रम घेणे टाळले अाहे. धुळे शहर मध्यवर्ती ठिकाणी असताना ना. खडसे चाेपडामार्गे शिरपूरचे कार्यक्रम स्वीकारतात. कृषी विद्यापीठाच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यासाठी ते धुळ्याला टाळत असल्याचे प्रा. शरद पाटील यांनी म्हटले अाहे.