आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी राष्ट्रपतींच्या भावासह डॉ. उल्हास पाटील खूनप्रकरणी सहआरोपी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. व्ही.जी. पाटील यांच्या खून खटल्यात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे बंधू डॉ. जी.एन. पाटील व माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांना भादंविच्या कलम 319नुसार सहआरोपी करण्याचे आदेश न्यायाधीश डी.जे. शेगोकार यांनी सोमवारी दिले.

व्ही.जी. पाटलांची 21 सप्टेंबर 2005 रोजी चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नी रजनी पाटील यांनी केला होता. खून झाला त्याच दिवशी जी.एन. व उल्हास पाटील यांच्याविषयी रजनी यांनी संशय व्यक्त केला होता. पुढे 25 सप्टेंबर रोजी प्रमुख संशयित राजू माळी, राजू सोनवणे, दामोदर लोखंडे आणि लीलाधर नारखेडे हे पोलिसांना शरण आले होते. अनेक बड्या नावांचा या हत्येत हात असल्याचा जबाब या संशयितांनी दिला होता.

आधी स्थानिक पोलिस व त्यानंतर सीआयडी आणि सध्या सीबीआयने या प्रकरणाची चौकशी केली आहे. प्रकरणाची पुढील सुनावणी 10 जुलै रोजी होणार आहे. दरम्यान, निर्णय देण्याआधी न्यायालयाने एकूण 46 साक्षीदार तपासले. तसेच रजनी पाटील आणि श्रीधर चौधरी यांच्याही न्यायालयीन साक्षीदार म्हणून साक्षी झाल्या आहेत.

काय आहे कलम 319
खटल्याच्या चौकशीत साक्षीदाराने गुन्ह्यात कटाच्या माध्यमातून आणखी काहींचा सहभाग आहे व त्यांनी संगनमताने हा गुन्हा केला, अशी साक्ष दिल्यास ज्या व्यक्तींविरुद्ध सबळ पुरावे आहेत; पण त्यांची नावे आरोपींत नसतील, त्यांना खटल्याच्या कामासाठी कोर्टाच्या आदेशाने आरोपी केले जाते. नंतर त्यांना बचावाचीही संधी दिली जाते. ‘खुनाचा कट रचणे’ या गुन्ह्याखाली जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.

घटनाक्रम...
- 21 सप्टेंबर 2005 : व्ही.जी.पाटलांचा खून
- 25 सप्टेंबर : चौघे संशयित शरण
- डिसेंबर 2005 : रजनी पाटील हायकोर्टात. सीबीआय चौकशीची मागणी.
- फेब्रुवारी 2007 : सीबीआय चौकशीचे हायकोर्टाचे आदेश.
- जून 2009 : खटला सुनावणी सुरू. जी.एन. व उल्हास पाटलांना आरोपी करण्याचा अर्ज देऊन रजनी यांनी पुन्हा मागे घेतला.
- डिसेंबर 2013 : जी.एन. व उल्हास पाटलांना आरोपी करण्याचा रजनी यांचा जिल्हा कोर्टात अर्ज.