आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव : डॉक्टर रुग्णालयात हजर नसल्याने जखमीचा मृत्यू, तर वाचले असते प्राण...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिनेश लखाेटे - Divya Marathi
दिनेश लखाेटे
जळगाव - खामगाव येथून भाचीचे लग्न आटपून परतणाऱ्या कुटुंबीयांच्या चारचाकीचे टायर फुटल्याने जामनेर मंगळवारी सकाळी ८ वाजता जामनेरजवळ अपघात झाला. यात एका जखमीला तातडीने ग्रामीण रूग्णालयात हलवले, परंतु तेथे डॉक्टरच उपलब्ध नसल्यामुळे प्राथमिकही उपचार होऊ शकले नाही. त्यामुळे अपघातग्रस्ताला जळगावात खासगी रूग्णालयात आणत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. तर या अपघातात चार महिला जखमी झाल्या. 
 
जामनेरचे भाजप पदाधिकारी दिनेश श्रीराम लखोटिया (वय ४५) हे भाचीच्या लग्नासाठी कुटुंबीयांसह कारने खामगाव येथे गेले होते. विवाह सोहळा आटोपल्यानंतर मंगळवारी सकाळी ५ वाजता ते जामनेरला येण्यासाठी निघाले. लखोटिया हे स्वत:च चारचाकी चालवत होते. जामनेर शहरापासून ३ किलोमीटर आधीच त्यांच्या चारचाकीचे चालकाच्या बाजूचे टायर फुटले. यामुळे गाडी कलंडून रस्त्याच्या कडेला पडली. यात लखोटिया यांच्यासह चार जण जखमी झाले.
 
 जखमींना तात्काळ जामनेरच्या ग्रामीण रूग्णालयात हलवले. मात्र, तेथे डॉक्टरच उपलब्ध नव्हते. तर दिनेश लखोटिया हे जास्त जखमी असल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना जळगावातील रूग्णालयात हलवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र रस्त्यातच लखोटिया यांचा मृत्यू झाला. 
 
तर वाचले असते प्राण... 
लखोटिया हे जखमी अवस्थेतही कुटुंबीयांना धीर देत होते. कुटुंबातील इतर जखमींना पाहून लखोटिया यांना रक्तदाबाचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. जळगावात खासगी रूग्णालयात पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. जामनेर येथे ग्रामीण रूग्णालयात  उपचार  झाले असते तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते, अशी माहिती त्यांचे बंधू राजेश यांनी दिली.
 
दोषींवर कारवाई करू 
- जामनेरच्या रूग्णालयात तीन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे रूग्णालयात डॉक्टर असलेच पाहिजे. या घटनेच्या वेळी डॉक्टर रूग्णालयात हजर नसतील तर त्यांची चाैकशी करण्यात येईल. तसेच दोषींवर कारवाई करण्यात येईल. 
डॉ.किरण पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव.
बातम्या आणखी आहेत...