धुळे - महाई- सेवा केंद्रात अवघ्या ३० ते ३५ रुपयांत दाखले मिळतात. मात्र, तेच दाखले चक्क १६०० रुपयांत विकले जात असल्याची धक्कादायक बाब तहसीलदारांनीच उघडकीस अाणली. देवपूर तलाठी कार्यालयानजीक असलेल्या दीपक झेरॉक्स या दुकानावर हा गाेरखधंदा सुरू हाेता. चक्क १२०० ते १६०० रुपयांना दाखला विक्री करण्याचा हा प्रकार डमी विद्यार्थी पालकांच्या माध्यमातून अप्पर तहसीलदारांनी उघडकीस आणला. या दुकानातून विविध दाखले दाखले काढण्यासाठी जमा करण्यात आलेले दस्तएेवज जप्त केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश तलाठ्यांना दिले आहेत.
दहावी, बारावीच्या निकालानंतर विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी विद्यार्थी पालकांची धावपळ हाेत आहे. या प्रवेशासाठी लागणारे जातप्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, क्रिमिलेयर, रहिवास दाखला महा ई-सेवा केंद्र सेतू सुविधा केंद्रात ३० ते ३५ रुपयांचे शुल्क अाकारून मिळतात. देवपूर तलाठी कार्यालयाजवळ असलेल्या दीपक झेरॉक्स या दुकानात मात्र हेच दाखले १२०० ते १६०० रुपयांत विक्री करण्यात येत होते. यावर महा ई-सेवा केंद्राचे प्रतिनिधी महेंद्र शिरसाठ यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेऊन प्रांत गणेश मिसाळ यांनी अप्पर तहसीलदार ज्योती देवरे यांना कारवाईची सूचना केली. त्यानुसार बुधवारी दुपारी एक वाजता दीपक झेरॉक्स या दुकानात यशकुमार मेटकर आणि कृष्णा बाविस्कर या दोन डमी विद्यार्थ्यांना पाठविले. या विद्यार्थ्यांसाेबत परिविक्षाधीन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना पालक म्हणून या झेरॉक्स दुकानात पाठविले. या वेळी दुकानचालकाने जातप्रमाणपत्राचा १२०० रुपयांचा दर सांगितला. तसेच विविध प्रकारचे दाखले चक्क दहा रुपयाला विक्री करीत असल्याचे समोर आले. यानंतर दुकानात ज्योती देवरे यांनी प्रवेश केला. तहसीलदार देवरे यांना ओळखून दुकानदाराने पलायन केले.
दरम्यान तहसीलदार देवरे यांनी दुकानातून विविध दाखल्यांसाठी जमा केलेले कागदपत्रे तसेच शासकीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने तयार करण्यात आलेले दाखलेही जमा केली. या कारवाईनंतर तलाठ्यांना पंचनामा करून संबंधित झेरॉक्स दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकारामुळे अधिकाऱ्यांची मिलीभगतही पुढे येत आहे.
साखळीचा संशय
दीपक झेरॉक्स दुकानदार निव्वळ माध्यम असून, या सर्व प्रक्रियेत मोठी साखळीच सक्रिय असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यात महा ई-सेवा केंद्रापासून अप्पर तहसील कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय तलाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचाही प्रत्यक्ष सहभाग असल्याचे उघड होईल, असे या प्रकारावरून दिसून येते.
अनुत्तरित प्रश्न
दीपक झेरॉक्स या दुकानात तलाठ्यांची स्वाक्षरी असलेले दाखले, महा ई-सेवा केंद्रातून विक्री होणारे दाखले पोहाेचतात कसे, तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात दाखले घेऊन वारंवार एकच व्यक्ती येत असताना प्रांताधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालयात या व्यक्तीस हटकले कसे नाही.
तलाठ्यांची स्वाक्षरी; किंमत पंधरा रुपये
दीपक झेरॉक्स या दुकानात देवपूर तलाठ्यांचे स्वाक्षरी केलेले रहिवासी दाखले मिळून आले.या दाखल्यांची या दुकानातून पंधरा रुपयांना विक्री करण्यात येत होती. त्यामुळे अप्पर तहसीलदारांनी अाश्चर्य व्यक्त केले. तलाठ्यांच्या स्वाक्षरीचा दाखला दुकानात अालाच कसा, याची आता चौकशी केली जाणार आहे. त्यातूनच साखळी उघड होईल.
फाैजदारी कारवाई
- शैक्षणिक दाखल्यांसाठी विद्यार्थी पालकांची अडचण विचारात घेऊन दीपक झेरॉक्स या दुकानदाराने उद्योग सुरू केला होता. या संदर्भात पंचनामा करून फौजदारी कारवाईची सूचना केली आहे. विद्यार्थी पालकांना शैक्षणिक दाखल्यांसंदर्भात अडचणींच्या सोडवणुकीसाठी अप्पर तहसील कार्यालयात तक्रार निवारण केंद्र सुरू केले आहे. या केंद्राशी पालकांनी संपर्क साधावा.
-ज्योतीदेवरे, अपर तहसिलदार, धुळे शहर