आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेक्षकांच्या गर्दीला घाबरणारा नितीन वाघ बनला लेखक, दिग्दर्शक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गावात बालकलाकार म्हणून नाटकात काम करताना सुरुवातीच्याच प्रवेशात तोंडून एकही शब्द निघाल्याने स्वत: गोंधळलो. प्रेक्षकांच्या गर्दीला घाबरून तीन वेळा पडद्यामागे पळालो. नंतर चौथ्यांदा कसाबसा बोलायला लागलो. या प्रकारामुळे प्रेक्षक, मित्रांनी खिल्ली उघडली आणि ज्येष्ठ आणि सहकलाकारांची मोठी नाराजी ओढवली. मात्र, या प्रकारामुळे स्वत:च्या मनाशी जिद्द केली, हे हसणारे ग्रामस्थ-प्रेक्षकच एक दिवस अापले कौतुक करतील, या जिद्दीनेच स्वत:ला बदलवले. त्यामुळे अाज प्रसिद्ध नाट्यकलावंत, मालिकांचा संवाद लेखक, दिग्दर्शक, निवेदक म्हणून नावलौकिक मिळवला...हे बोल आहेत रंगकर्मी नितीन वाघ याचे... 
नितीन शकुंतला धनराज वाघ हा कळमसरा (ता. पाचोरा) येथील मूळ रहिवासी असून सध्या पुण्यात नाट्य, चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहे. आईच्या सन्मानासाठी आपल्या पूर्ण नावात तो आई ‘शकुंतला’ यांचेही नाव वडिलांसोबत लावतो. त्यास बालपणापासून नाटकात काम करण्याचा छंद होता. सातवीच्या वर्गात असताना गावातील नवरात्रोत्सवात ‘संत ज्ञानेश्वर’ नाटकात ज्ञानेश्वराच्या बालपणाची भूमिका करण्याची संधी मिळाली. नाटकाची तिसरी घंटा होऊन पडदा उघडल्यानंतर पहिलाच प्रवेश नितीनचा होता. संत ज्ञानेश्वरांच्या ध्यानस्थ भूमिकेतील नितीनने डोळे उघडताच समोर प्रेक्षकांची मोठी गर्दी दिसली आणि त्या गर्दीला बघून तो घाबरला. भीतीमुळे तोंडातून आवाज निघत नव्हता. पडद्यामागून ‘प्रॉग्टिंग’करून त्यास बोलता करण्याचा प्रयत्न केला. पण, तीन वेळाही तो घाबरून पडद्यामागे पळाला आणि चौथ्यांदा रंगमंचावर भीत...भीत संवाद आणि नाटक सुरू झाले. परंतु, या प्रकारामुळे आपले हसू झाले, ही खंत त्याच्या मनात होती. त्यामुळे त्याने नाट्य क्षेत्रातच करिअर करण्याची जिद्द केली. आता नाटक, मालिका, चित्रपट कलावंत, लेखक, दिग्दर्शक म्हणून नावलौकिक मिळवला आहे. अनेक नामांकित नाटकांतील मुख्य भूमिका गाजल्या. त्यामुळे पहिल्या नाटकातील गोंधळाला हसणारी मंडळीच आता उदोउदो करून आपल्याबद्दल अभिमान बाळगत असल्याचे तो सांगतो. 
 
लेखन, दिग्दर्शनातही उमटवला ठसा, नव्या विषयांना हात 
नितीनयाने दूरचित्रवाणीवरील ‘तू माझा सांगाती’ या मालिकेसाठी संवाद लेखन केले. ‘आमची माती आमची माणसं’मध्ये निवेदकाचे काम केले. रझाकार, क्लासमेट्स यासारखे काही चित्रपट, मालिकांचेही डबिंग केले. राधा रामास्वामी दिग्दर्शित ‘द स्टोरी ऑफ मेघा’ या नाटकातही ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ड्रॅमॅटिक सोसायटी (इंग्लंड)च्या अभिनेत्यांसोबत मुख्य भूमिका साकारली आहे. त्याने ‘द डायरी ऑफ सायको’ या वेबसिरिजचे लेखन, दिग्दर्शन केले. यात त्याने अभिनयही केला आहे. आगामी एेतिहासिक मराठी चित्रपटामध्ये किशोरवयीन संभाजी महाराजांची भूमिका, तर एका हिंदी चित्रपटातील मुख्य भूमिकेतही तो लवकरच झळकणार आहे. 
 
‘मुक्काम पोस्ट कळमसरा’चे राज्यभरात केले ७० प्रयोग 
नितीन हा दहावी-बारावीच्या परीक्षेतील टॉपर विद्यार्थी होता. बारावीनंतर पुण्यात कॉम्प्युटर सायन्सला प्रवेश घेतला. मात्र, त्याचे नाटकाविना कुठेच मन रमत नव्हते. त्यामुळे झपाटल्यासारखे अनेक नाटके, चित्रपट पाहून कलावंतांचाही अभ्यास केला. कॉम्प्युटर सायन्स सोडून त्याने जळगावातील मू.जे.महाविद्यालयात बी.ए.नाट्यशास्त्र केले. त्यानंतर दिल्लीच्या त्रिपुरा (ईशान्य भारत) येथील शाखेत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुणे, मुंबई अाकाशवाणी केंद्रात उद््घोषक म्हणून काम केले. ‘मुक्काम पोस्ट कळमसरा’ या एकांकिकेचे राज्यभरात आतापर्यंत सुमारे ७० प्रयोग झाले. ‘ठाकूर अौर मैं...’ या हिंदी एकल नाट्याचे १५ पेक्षा जास्त प्रयोग झाले. त्यांच्या ‘द वंडरफूल वेड’ या लघुपटाला ‘स्पेक्ट्रम फिल्म फेस्टिव्हल’मध्ये रौप्यपदक मिळाले. 
बातम्या आणखी आहेत...