आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेरास सव्वाशेर : SP कार्यालयात तोेतया डेप्युटी कलेक्टरची पोलिसांवरच दादागिरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तोतया समाधान जगताप - Divya Marathi
तोतया समाधान जगताप
जळगाव - पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन थेट पोलिस उपअधीक्षकांनाच हजर व्हायला सांगणाऱ्या एका तोतया डेप्युटी कलेक्टरला गुरुवारी पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. हा तोतया उपजिल्हाधिकारी नाशिकचा असून त्याच्यासमवेत असलेल्या एका अमळनेरच्या तरुणीसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन त्याने पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांना फोन करून कार्यालयात बोलावून घेतले होते. परंतु त्याच्याशी बोलताना उपअधीक्षकांना संशय आला आणि त्यानंतर अवघ्या ३० मिनिटांतच तोतया डेप्यूटी कलेक्टरचा पर्दाफाश झाला. तोतयाला गाफील ठेवत पोलिस यंत्रणेने भराभर राज्यभरात त्याची चौकशी करून तोतयाची बनवेगिरी उघडी पाडली. 
 
समाधान केवलराव जगताप (वय २८, रा.प्लाॅट नंबर ९, एस. गणेश मेसटोन जेलरोड, नाशिक) ज्याेती धनंजय वाडिले (रा.अमळनेर) हे दोघे जळगावातील महिला दक्षता समिती येथे बांभोरी येथील मुलगा दादावाडी परिसरातील मुलगी या पती-पत्नीमध्ये सुरू असलेला कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी गुरुवारी जळगावात आले होते. दरम्यान, या प्रकरणात मुलीवर अन्याय झाला असून तिच्या सासरच्या मंडळींवर कारवाई करा, असे सांगण्यासाठी त्यांनी थेट पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्या मोबाइलवर फोन केला. आपण ‘डेप्यूटी कलेक्टर जे. सिद्धांत’ बोलत असल्याचे त्याने सांगळे यांना सांगितले. तसेच आपण पोलिस अधीक्षक कार्यालयात आलो असून आपली भेट घ्यायची आहे, असेही त्याने सांगितले. तसेच त्याच्यासोबत असलेली तरुणी ज्योती वाडीले हिने देखील कार्यालयातील स्वागत कक्षावरील कर्मचाऱ्यांना जगताप हा डेप्यूटी कलेक्टर असल्याचे सांगितले. फोनवरून त्याची नीट ओळख पटली नव्हती. डेप्यूटी कलेक्टर सांगितल्यामुळे सांगळे घरून कार्यालयात पोहाेचले. सांगळेंच्या दालनात संबंधित मुलीसह तिच्या सासरची मंडळी आणि तोतया डेप्यूटी कलेक्टर जमा झाले. सांगळेंनी सुरुवातीला ओळख करून घेतली. काही मिनिटे चर्चा केल्यानंतर जगताप हा अधिकारी नसल्याचे त्याच्या बोलण्यातून सांगळेंना जाणवले. त्यांनी मूळ प्रकरण बाजूला सारत जगतापची चौकशी सुरू केली. कोणत्या बॅचमध्ये परीक्षा उत्तीर्ण झालात? कोणत्या जिल्ह्यात काम करीत आहात? सोबतच्या अधिकाऱ्यांची नावे सांगा? अशी प्रश्नांची सरबत्ती करताच जगतापची बोबडी वळाली. आपले पितळ उघडे पडत असल्याचे त्याच्या लक्षात आले. तर हा तोतया अधिकारी असल्याचा विश्वास सांगळेंना झाला. त्यांनी तत्काळ पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर पुढील अर्धा तास जगतापने सांगितलेला अधिकारी, जिल्ह्यात फोन करून चौकशी केली. तोपर्यंत त्याला कार्यालयातच बसवून ठेवले. तो तोतया असल्याचे निष्पन्न होताच सांगळे यांनी त्याला ‘खाक्या’ दाखवला. काही क्षणातच त्याने आपले खरे नाव ओळख सांगितली. त्यानंतर जगताप ज्योती वाडिले यांना जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले. दोघांवर भादंवि कलम ४१७, १७०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पीएसआय गजानन राठोड तपास करीत आहेत. 
 
पोलिस ठाण्यात तोरा 
जगताप याला जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणल्यानंतर जगताप याच्याकडील दोन मोबाइल, व्हिजिटिंग कार्ड, लायसन्स, ओळखपत्र पोलिसांनी जप्त केले. या वेळी कागदपत्र माझ्याकडे द्या, असा आग्रह त्याने केला होता. त्यानंतर रेकॉर्डसाठी त्याचे छायाचित्र काढणारे पोलिस कर्मचारी वृत्तपत्रांच्या छायाचित्रकारांशी त्याने मिश्कीलपणे संवाद साधला. फोटो चांगले आले का? असे तोऱ्यात विचारले होते. 
 
उच्चशिक्षित, स्पर्धा परीक्षेची तयारी 
जगताप हा उच्च शिक्षित असून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याआधीच तो ‘तोतया अधिकारी’ बनून मिरवतो आहे. त्याने या पूर्वी अशा प्रकारची कोणाची फसवणूक केली आहे का, याचा तपास पोलिस करीत आहेत. तसेच त्याच्या सोबत आलेल्या ज्योती वाडिले या तरुणीचीही कसून चौकशी करण्यात येत आहे.