आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बा-शराह व्यक्तींना 4 दिशांना पाठवून शोधतात ‘ईद का चाँद’, फतव्यापूर्वी ‘एहतेकाफ’ यांना उठवले जाते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - चाँददिख गया! असे मशिदीच्या भाेंग्यावरून एेलान हाेते. त्यानंतर मुस्लिम समाजातील राेजेदार महिनाभराचे राेजे साेडतात. मात्र, चंद्र दिसण्याची खात्री करण्यासाठी चार ‘बा-शराह’ व्यक्तींना वेगवेगळ्या चार दिशांना पाठवून खात्री करून घेतली जाते. त्यांच्याकडून चंद्र दिसल्याची लेखी ‘शहादत’(साक्षीपुरावा) अाल्यानंतरच हे एेलान केले जाते. सुन्नी पंथाची जिल्ह्याची प्रमुख मशीद (मरकज) व्यवस्थापनासाठी तीन जणांना शहादत अाणण्यासाठी पाठवण्यात येणार अाहे.
 
पवित्र रमजानमध्ये ईदचा चंद्र दिसल्याशिवाय मुस्लिम समजाबांधव रोजे सोडत नाहीत. हा चंद्र कसा शोधला जातो, याविषयी अनेकांमध्ये उत्सुकता असते. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने सुन्नी जामा मशिदीचे विश्वस्त अयाजअली नियाजअली यांच्याशी चर्चा करून माहिती जाणून घेतली. त्यात सन १८५१ ला उभारण्यात अालेल्या नियामकपुरातील (भिलपुरा) सुन्नी जामा मशीद ही जिल्ह्याची मरकज अाहे. मरकज म्हणजे जिल्ह्यातील मशिदीला फतवा देण्याचा समाजातील न्यायनिवाडे करण्याचा अधिकार असलेली मशीद. रमजान महिन्यात चंद्र दर्शनाला मुस्लिम समाजात अनन्य महत्त्व अाहे. चंद्र दर्शनाची खात्री करण्यासाठी खास यंत्रणा ही मशीद गेल्या अनेक वर्षांपासून राबवते. यासाठी ‘बा-शराह’व्यक्तींची नेमणूक केली जाते. बा-शराह म्हणजे अशी व्यक्ती ज्याची मूठभर दाढी अाहे, ताे पाचवेळा नमाज पठण करताे, व्यसन, व्यभिचार करीत नाही, नैतिकतेनेच पैसे कमावताे, अशा व्यक्तींना शहादतसाठी पाठवण्यात येते. प्रामुख्याने नाशिक, सिल्लाेड, बऱ्हाणपूर याठिकाणी सुन्नी जामा मशिदीच्या ट्रस्टतर्फे व्यवस्था करण्यात येते. चार दिशांपैकी काेणाचीही माहिती अगाेदर अाली तरी चंद्र दिसला असे मानून त्याची कल्पना जिल्हाभरात दिली जाते.
 
अशी देतात शहादत  
निश्चितकेलेल्या ठिकाणी गेल्यावर बा-शराह व्यक्ती स्वत:च्या डाेळ्यांनी चंद्र दिसल्याची खात्री करताे. ताे सुन्नी जामा मशिदीच्या प्रमुख माैलानांना यांची माहिती देताे. मात्र, ही माहिती लेखी स्वरुपातच दिली जाते. ज्या ठिकाणी चंद्र दिसला ते ठिकाण, वेळ अादी लिहून मी चंद्र पाहिला, असा मजकूर लिहून त्यावर सही करून देताे. त्यानंतरच चंद्र दिसल्याची माहिती जिल्हाभरात पाेहोचवली जाते. ती देखील लेखी स्वरुपात. यासाठी जिल्हाभरातील प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकी एक प्रतिनिधी जामा मशिदीत चाँद रात्रीला मुक्कामाला येऊन राहतात. जामा मशिदीचे प्रमुख माैलाना लेखी फतव्याने जिल्ह्यातील सर्व मशिदीच्या माैलानांना ही माहिती देतात.

हा लेखी निराेप (फतवा) घेऊन प्रतिनिधी अापापल्या तालुक्याला जाऊन तेथील प्रमुखाला देताे. त्यानंतर त्या त्या मशिदीतून चंद्र दिसल्याचा निराेप भाेंग्यावरून सर्वसामान्यांपर्यंत पाेहोचवला जाताे. जर ट्रस्टने पाठवलेल्या प्रतिनिधींना पाऊस किंवा ढगाळ वातावरणामुळे चंद्र दर्शन झाले नाही तर हे प्रतिनिधी जवळच्या राज्यातील प्रतिनिधींकडून शहादत घेऊन ती ट्रस्टला देतात.
 
फतव्यापूर्वी ‘एहतेकाफ’ यांना उठवले जाते
रमजानमहिन्यात मुस्लिम समाजातील बहुतांश जण राेजे ठेवतात. मात्र, त्यातही २१ व्या दिवसांपासून १० दिवसांचा एहतेकाफ काही जण करतात. या काळात उपवास करणारा अापले दैनंदिन कामकाज साेडून मशिदीत मुक्कामाला येताे. एक जागा निश्चित करून त्याच ठिकाणी १० दिवस बसून पैगंबरांची सेवा करताे. कुराण पठण करताे. चंद्र दिसल्याचा निराेप सर्वत्र देण्यापूर्वी ट्रस्टतर्फे सर्वात अगाेदर अशा एहतेकाफ यांना चंद्र दिसल्याची माहिती देऊन त्यांचे व्रत थांबवण्यास सांगितले जाते.
 
बातम्या आणखी आहेत...