आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्ताई बंगल्यावर ‘भाऊ’गर्दी! सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मंत्रिपदाची झूल उतरल्यानंतर प्रथमच जळगावात दाखल झालेल्या एकनाथ खडसेंना भेटण्यासाठी मुक्ताई बंगल्यावर कार्यकर्त्यांनी ‘भाऊ’गर्दी केली होती. मात्र, चौकशी अहवाल आल्यानंतरच कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांशी बोलण्याचा निर्धार केला असल्याने खडसेंनी केवळ समर्थक, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. काहींची आस्थेवाईकपणे चौकशी केली. या वेळी छोटेखानी अनौपचारिक सभा झाली. चौकशीअंती निर्दाेष सुटल्यानंतर राजीनामा देण्यास भाग पाडण्याचे षडयंत्र रचणाऱ्यांना धडा शिकवा, अशी मागणी नेते, कार्यकर्त्यांनी या वेळी खडसेंकडे केली.खडसेसकाळी रेल्वेने जळगावात आले.
त्या वेळी रेल्वेस्थानकावरच कार्यकर्त्यांनी गर्दी करीत त्यांची भेट घेतली. या वेळी खासदार ए.टी. पाटील, आमदार सुरेश भोळे आदींसह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, फलाटावरून स्थानकाबाहेर येईपर्यंत कार्यकर्त्यांनी खडसेंना गराडा घातला होता. काहींनी मोठा फुलांचा हार घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, खडसेंनी त्याचा नकार दिल्यामुळे तो हार चारचाकी वाहनाला घालण्यात आला.
खडसे शिवरामनगरातील निवासस्थानी पोहाेचल्यानंतर तेथेही गर्दी झाली हाेती. आमदार सुरेश भोळे, स्मिता वाघ, गुरुमुख जगवाणी, माजी आमदार साहेबराव घोडे, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख, भुसावळातील भाजपचे नगरसेवक, तसेच शहर जिल्हाभरातून आलेले भाजप कार्यकर्ते हजर होते. खडसे चेंबरमध्ये बसून काही जणांची भेट घेत होते. घराबाहेर मोकळ्या जागेत मंडप टाकून सभेची तयारी करण्यात आली होती. मात्र, कार्यकर्त्यांशी बोलण्यासाठी काही खास विषय नसल्यामुळे ते बाहेर घरातून पडणार नव्हते. तरीही १०.३० वाजता आमदार भोळे, वाघ, जगवाणी यांच्यासह ते मंडपात येऊन बसले.

बंगल्याच्या हिरवळीवरच झालेल्या अनौपचारिक सभेत प्रा. सुनील नेवे यांनी सूत्रसंचालन करताना सांगितले की, खडसेंवरील आरोप बिनबुडाचे असून त्यांच्या राजीनाम्यामुळे कार्यकर्ते व्यथित झाले आहेत. पण भाऊ निर्दाेष आहेत. आपल्याला न्याय मिळेल. त्यानंतर आमदार भोळे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, भाऊ, आपण कार्यकर्त्यांशी बोलू नका, मुळात आपल्याला बोलण्याची काही गरजच नाहीये. कारण कार्यकर्ते आणि नागरिकांना सर्वच माहिती आहे. तुम्हाला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण जनता आपल्या पाठीशी आहे. तुमची बदनामी करणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवणार आहे. कार्यकर्ते सोबत आहेत. महिनाभरातच आपण पुन्हा आनंदोत्सव साजरा करू, असेही भोळे यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांमुळे मिळाली ऊर्जा
मंत्रिपदगमावल्यामुळे खडसेंच्या चेहऱ्यावर थोड्याप्रमाणात नाराजी होती. हस्तांदोलन करताना ते स्मितहास्य करीत होते. मात्र, त्यांना नाराजी लपवता येत नव्हती. पत्रकारांशी चर्चा करतानादेखील त्यांनी तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या. मात्र, कार्यकर्त्यांनी दबक्या आवाजात खडसेंना माहिती दिली. त्यानंतर खडसेंचा चेहरा चांगलाच खुलला होता. भेटीगाठी संपल्यानंतर खडसे पुन्हा घरात गेले. त्यानंतर ११.१५ वाजता ते जिल्हा बँकेतील सभेसाठी मार्गस्थ झाले.

माजी पालकमंत्री खडसे यांच्यावरील आरोपांची चौकशी सुरू आहे. तत्पूर्वी त्यांची बदनामी मोठ्याप्रमाणात झाली असून आता सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. खडसेंच्या निवासस्थानी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनीही गप्पा-गोष्टी, मजाक-मस्ती करीत वातावरण हलके ठेवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिस बंदोबस्तही लावण्यात आला होता. खडसे जिल्हा बँकेसाठी रवाना झाल्यानंतर पोलिसांची व्हॅनदेखील त्यांच्या वाहनामागेच होती.

खडसे यांच्या निवासस्थानी जिल्हा बँकेचे एमडी जितेंद्र देशमुख, प्रातांधिकारी अभिजित भांडे, जिल्हा उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी हजेरी लावली.
बातम्या आणखी आहेत...