आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीचा खर्च देताना हात आखडता, निवडणूक आयोगाचा दुटप्पीपणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल- निवडणूक प्रक्रिया राबवताना राज्य निवडणूक आयोगाकडून खर्च दिला जातो. मात्र, हा मोबदला देताना आयोग दुटप्पीपणा करत असल्याचे समोर आले आहे. कारण अवघ्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीत आयोगाने प्रतिमतदार १०० रुपये दिले होते. आता झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी मात्र प्रतिमतदार ही रक्कम अवघी २५ रुपये असल्याने प्रशासनाची चांगलीच कोंडी झालेली आहे. यामुळे अनेकांची देयकेदेखील रखडली आहेत. 
 
नोव्हेंबर २०१६मध्ये पालिका निवडणूक पार पडली होती. ही प्रक्रिया राबवण्यासाठी प्रशासकीय खर्च म्हणून राज्य निवडणूक आयोगाने पालिकेला प्रति मतदार १०० रूपये याप्रमाणे खर्च दिला होता. हे संपूर्ण शहरी मतदान होते.
 
 मात्र, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. यासाठी ग्रामीण भागासह अतिदुर्गम भागातील मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने महसूल प्रशासनाला प्रति मतदार केवळ २५ रूपये खर्च दिला आहे. तसेच एकूण ४० रूपये प्रति मतदार खर्च देण्याचे नियोजन असल्याचे महसूल प्रशासनाने सांगितले. 
 
मात्र, खर्चासाठी मिळणारी ही रक्कम अत्यल्प असून यामुळे महसूल प्रशासनाची चांगलीच कोंडी होत आहे. निवडणूक कार्यक्रम राबवताना झालेला खर्च आयोगाकडून मिळणारी रक्कम यात मोठी तफावत असल्याने अनेकांची देयके थकली आहेत. शहरी मतदानाच्या तुलनेत ग्रामीण भागातील मतदान प्रक्रियेला अधिक खर्च लागतो. ही वस्तूस्थिती असूनही निवडणूक आयोगाने घेतलेले दुटप्पी घोरण अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढवणारे ठरले आहे. 
 
जिल्हा परिषद : मतदानकेंद्र १६०, मतदान प्रक्रिया कर्मचारी १२२५, वाहने ५४ (एसटी बस १३, लहान वाहने ३०, मिनीबस ५, दुचाकी ६), मतमोजणी कर्मचारी १५०, प्रशिक्षण २, मतमोजणी प्रशिक्षण १. 
 
नगरपालिका : पालिकानिवडणुकीत यावल शहरात एकूण ३७ मतदान केंद्र होते. तर मतदान प्रक्रियेसाठी २६० कर्मचारी, दोन वाहने आणि मतमोजणी ४५ कर्मचारी नेमण्यात आले होते.
 
दोन्ही निवडणुकांचे आकडे 
- आताच्या निवडणुकीचेकार्यक्षेत्र ८५ गावांमध्ये होते. या संपूर्ण गावांमध्ये मतदान प्रक्रिया पार पाडून ईव्हीएम तालुक्याच्या ठिकाणी (यावल) येथे आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहन कर्मचारी लागले. 
 
- पालिका निवडणुकीचेकार्यक्षेत्र शहरापुरते मर्यादित असते. संपूर्ण मतदान केंद्र शहरात असतात. मतदान प्रक्रिया पार पडल्यावर प्रत्येक केंद्रावरून ईव्हीएम मतमोजणी ठिकाणी पोहोचवण्यास फारशी वाहनेदेखील लागत नाहीत. 
 
तुलनात्मक स्थिती प्रतिमतदार खर्च असा 
यावल पालिकेच्या निवडणुकीत एकूण २९ हजार ८८७ मतदार होते. या वेळी आयोगाने प्रतिमतदार १०० रुपयांप्रमाणे पालिकेला निवडणूक खर्च म्हणून २९ लाख ८८ हजार ७०० रुपये दिले होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यात लाख ४७ हजार ४५७ मतदार होते.
 
महसूल विभागाला आतापर्यंत प्रतिमतदार २५ रुपये याप्रमाणे ३६ लाख ८६ हजार ४२५ रुपये मिळाले. ४० रुपयांप्रमाणे खर्च दिल्यास ही रक्कम ५८ लाख ९८ हजार २८० रुपये होतील. मात्र, प्रत्यक्ष खर्च यापेक्षा जास्त झाल्याची वस्तुस्थिती आहे. 
 
निधीची मागणी केली 
-या निवडणुकीत खर्चात खूपच काटकसर केली आहे. तरीदेखील अजून किमान ४० ते ४५ लाखांची आवश्यकता आहे. एसटी बस, कार्यालयीन स्टाफ, मंडप, स्टेशनरी, व्हिडिओ शूटिंग, डिझेल आदींचा खर्च देयक बाकी आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निधीची मागणी केली आहे. कुंदनहिरे, सहायक निवडणूक अधिकारी, यावल 
 
 
बातम्या आणखी आहेत...