आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाईच्या विराेधासाठी अतिक्रमण पथकामागे सुरे घेऊन पळाले विक्रेते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मेहरूणपरिसरात उघड्यावर मांस विक्रीविषयी नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी दुपारी १२ वाजता अक्सानगरात मनपाच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी गेले हाेते. अचानक सुरू झालेल्या कारवाईमुळे मांस विक्रेते मनपा कर्मचाऱ्यांमध्ये वाद सुरू झाला. यात विक्रेत्यांनी कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ, मारहाण करून दगडफेक केली. या वेळी विक्रेते त्यांचे नातेवाइक मांस कापण्याचे सुरे घेऊन अतिक्रमण पथकाच्या मागे पळत सुटल्याने परिसरात तणाव निर्माण झाला हाेता. या घटनेने काही कर्मचारी किरकाेळ जखमी झाले अाहे. 
मेहरूण परिसरातील नगरसेविका सुभद्रा नाईक इकबाल पिरजादे यांनी आपल्या प्रभागात अतिक्रमण करून उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यासंदर्भात पालिकेत तक्रार दिली होती. त्यानुसार शुक्रवारी दुपारी १२ वाजता अक्सानगर येथे कारवाईसाठी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी साजीद अली आबिद अली, अरुण मोरे, अर्जुन सोनवणे, हिरामण बाविस्कर, रेहानाबी शेख, सलमान भिस्ती अकिल बागवान यांचे पथक गेले हाेते. त्यांनी संबंधित विक्रेते शेख मुख्तार शेख गफुर अबरार शेख मुख्तार यांना अतिक्रमण काढून घेण्यास सांगितले. यावरून विक्रेते अतिक्रमणचे कर्मचारी यांच्यात वाद सुरू झाला. काही मिनिटांत शिवीगाळपर्यंत हे प्रकरण पोहचले. कारवाई सुरू असताना समोर उभ्या असलेल्या साजीद अली या कर्मचाऱ्याच्या दिशेने अबरार शेख हा शिव्या देत गेला. दोघांमध्ये जोरदार शिवीगाळ सुरू असतानाच अबरारने थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. काही सेकंदातच इतर कर्मचाऱ्यांसोबतही धक्काबुक्की सुरू झाली. सलमान भिस्ती याच्या डाव्या हाताच्या पंजावर कुणीतरी दगड मारून फेकला. तर रेहनाबीच्या पोटात एकाने लाथ मारली. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या दिशेने दगडफेक सुरू झाली. तसेच काही विक्रेते त्यांच्या नातेवाइकांनी हातात मांस कापण्याचे सुरे घेऊन अतिक्रमण कर्मचाऱ्यांचा पाठलागही केला. सुदैवाने परिसरातील काही नागरिकांनी या भांडणात मध्यस्ती केल्यामुळे अप्रिय घटना टळली. यात काही कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेनंतर अतिक्रमण विभागाचे कर्मचारी एमअायडीसी पोलिस ठाण्यात पोहचले. साजीद आली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख मुख्तार शेख गफुर, शेख अबरार शेख मुख्तार मोगली यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान पाटील पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. 

१५दिवसांत दुसऱ्यांदा कारवाई 
मांसविक्रेत्यांचे अतिक्रमण १५ दिवसांपूर्वी काढण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी रस्त्यावर तयार केलेले सिमेंटचे ओटे काढून टाकण्यात आले होते. मात्र, काही दिवसांनंतर त्यांनी रस्त्यावरच हातगाडी लावून पुन्हा मांस विक्री सुरू केली होती. त्यामुळे संबंधित नगरसेवकांनी पुन्हा एकदा तक्रार केली होती. त्यानुसार कर्मचारी शुक्रवारी कारवाईसाठी गेले हाेते. 

पोलिस संरक्षण नसल्यामुळे प्रकार 
१५ दिवसांपूर्वी मांस विक्रेत्यांवर कारवाई केली तेंव्हा अतिक्रमणाच्या पथकाने पोलिस संरक्षण घेतले नव्हते. दरम्यान, शुक्रवारी पुन्हा त्यांनी पोलिसांचे संरक्षण मागितले नव्हते. पोलिस घटनास्थळी नसल्यामुळे विक्रेत्यांनी हल्ला केला. पोलिस असते तर हा प्रकार घडला नसता. 
हाणामारीनंतर मांस विक्रेत्यांनी तत्काळ घरासमोरील रस्त्यावर बोअरिंगने पाणी मारून स्वच्छता केली. रस्त्यावर पडलेले मांस, विटांचे तुकडे झाडून, पाण्याने धुऊन फेकून देण्यात आले. तसेच मांस विक्रीचे दुकानही तत्काळ बंद केले होते. तेथील मांस इतरत्र हलवण्यात आले होते. या ठिकाणी काही घटनाच घडली नसल्याप्रमाणे चित्र तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अशी माहिती एका जखमी कर्मचाऱ्यांने ‘दिव्य मराठी’ला दिली. 

व्हिडिओ रेकॉर्डिंगमुळे सत्य आले समोर 
अतिक्रमण विभागात यापूर्वी एक व्हिडिओग्राफर नियुक्तीला होते. आता त्यांची बदली झालेली असल्यामुळे एक कर्मचारी मोबाइलमध्ये शूटिंग करीत होता. शुक्रवारी अतिक्रमणाची कारवाई सुरू झाल्यानंतर देखील मोबाइलमध्ये शूटिंग करण्यात आली. या शूटिंगमध्ये कर्मचाऱ्यांवर झालेला हल्ला कैद झाला आहे. कर्मचाऱ्यांनी हे रेकॉर्डिंग एमआयडीसी पोलिसांना दाखवले. त्यामुळे संपूर्ण घटनेचे सत्य समोर अाले आहे. शिवाय हल्लेखोरांची ओळख पटवणेही शक्य झाले आहे. 

जप्त केलेले वजन काटे लांबवले 
अतिक्रमण पथकाने अक्सानगर येथे जाण्यापूर्वी भाजी बाजारात केलेल्या कारवाईत तीन ते चार वजन काटे जप्त करून ट्रॅक्‍टरमध्ये ठेवले होते; परंतु अक्सानगरात झालेल्या दगडफेकीच्या घटनेत ट्रॅक्ट‍रमधून हे वजन काटे चोरल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. 
बातम्या आणखी आहेत...