आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या खेदजनकच; गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवापूर येथील मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना गुरुमाउली अण्णासाहेब मोरे. - Divya Marathi
नवापूर येथील मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना गुरुमाउली अण्णासाहेब मोरे.
नवापूर- देशासह राज्यातील अनेक जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत, ही खेदजनक बाब आहे. दुसरीकडे नंदुरबारसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी असल्याने या जिल्ह्यात द्वापार आणि सत्ययुग असल्याची प्रचिती येते, असे प्रतिपादन त्र्यंबकेश्वर येथील गुरुकुलचे पीठाधीश गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी केले. येथील श्री शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या हितगुज या राष्ट्रीय सत्संगात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री तथा पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. हीना गावित, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रजनी नाईक, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र डहाळे, विजय चौधरी, पंचायत समिती सभापती सविता गावित, नगराध्यक्षा रेणुका गावित, शेतकरी संघ अध्यक्ष अजित नाईक, जिल्हा परिषदेच्या सदस्या संगीता गावित, गिरीश गावित, हरीश पाटील, हेमंत पाटील, तहसीलदार प्रमोद वसावे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, माजी नगराध्यक्ष दामू बिऱ्हाडे आदी उपस्थित होते. 
 
गुरुमाउली अण्णासाहेब मोरे म्हणाले की, युवा पिढी बिघडलेली नाही. आपण घडविण्यात कुठेतरी कमी पडलो आहाेत. सुसंस्कृत निर्व्यसनी युवा पिढी निर्माण व्हावी ही काळाची गरज आहे. तसे झाले तर घराघरात मनमनात आई-वडिलांचे महत्त्व राहील. त्यामुळे भावी पिढीवर चांगले संस्कार करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. भारतीय संस्कृती आध्यात्मिकतेच्या माध्यमातून टिकवून ठेवली आहे. आदिवासी संस्कार कलाकृतीचा देशभरात प्रचार प्रसार होणे गरजेचे आहे. आर्थिक प्रगतीसाठी घरात श्रीयंत्र ठेवले पाहिजे. ज्या सेवेकऱ्यांनी नोटबंदीच्या काळात श्रीयंत्राचा वापर केला त्यांना आर्थिक अडचण निर्माण झाली नाही. उत्तम आरोग्यासाठी वनौषधी मृत्युंजय यंत्राचा वापर करावा. कर्करोगावर स्वामी समर्थ केंद्रातर्फे औषधी तयार करण्यात आल्या आहेत. या औषधांचे नियमित सेवन केल्यास जीभ, मेंदूचा कर्करोग इतर चार-पाच आजार एका महिन्यात बरे होतात. कृषी विभागाच्या योजनेचा लाभ शेतकऱ्यापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. वास्तुशास्त्रानुसार घर, कार्यालयातील रचना असावी, असेही ते म्हणाले. 
 
आदिवासी पद्धतीने स्वागत 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अण्णासाहेब मोरे यांचे आदिवासी पद्धतीने स्वागत झाले. या वेळी हुतात्मा शिरीषकुमार यांना अभिवादन करण्यात आले. सत्संगाला धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबारसह गुजरात राज्यातून हजारो भाविक उपस्थित होते. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. नवापूर केंद्राचे ज्येष्ठ सेवेकरी अशोक रणधिरे यांनी प्रास्ताविक केले. नवापूर येथील स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केेले. दरम्यान, नवापूर तालुका पत्रकार संघाच्या मदतीने रंगावली धरणातून गाळ काढण्याच्या उपक्रमाचे गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी कौतुक केले. 
 
बातम्या आणखी आहेत...