आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा घाऊक बाजारात तूरडाळ 65 रुपये किलो, नवीन डाळी दाखल; जोरदार पावसामुळे उत्पन्न वाढले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - यंदा जोरदार पाऊस झाल्याने शेतमालाचे भरघोस उत्पन्न झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील बाजारपेठेत उडीद, मूग, तूर, हरभरा डाळ मोठ्या प्रमाणावर आल्या आहेत. डाळींचेही उत्पादनात वाढ झाल्याने दरातही पन्नास टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. तूरडाळ ६५ ते ७० रूपये ठोक दरापर्यंत खाली आली आहे. मूग उडीद डाळीचेही दर पन्नास टक्क्यांनी कमी झाले आहेत. 
 
सलग तीन वर्ष जिल्ह्यात शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला. उत्पन्नात प्रचंड घट नोंदवण्यात आली होती. त्यामुळे डाळींचे भाव गगणाला भिडले होते. गेल्या वर्षी तर तूरडाळ तब्बल २०० रूपये किलोवर पोहोचली होती. त्यामुळे सर्वसामान्यांच्या ताटातून तूरडाळ गायब झाली होती. बाजारातून डाळ विकत घेणे त्यांना परवडणारे नव्हते.
 
 यंदा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने सर्वच पिकांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून तूर डाळीची आवक सुरू झाली. गेल्या वर्षी १५ ते १६ हजार रूपये प्रती क्विंटल दराने तूर डाळ विकली गेली. सध्यस्थितीत तूर डाळीच्या भावात घसरण होत हजार ५०० रूपये क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. 
 
ऑक्टोबर महिन्यापर्यंत तूरडाळीचा भाव १४० ते १६० रूपये किलो होते. हे भाव आता ठोक बाजारात ६५ रूपये किलो तर किरकोळ बाजारात ७० ते ७५ रूपये प्रती किलोपर्यंत कमी झाले आहेत. ११० ते १२० रूपये किलो असलेली मूग डाळ आता ठोक बाजारात ५६ ते ६० रूपये किलोपर्यंत खाली आली आहे. हरभरा डाळीची नवीन आवक अद्याप बाजारपेठेत झाली नाही. जुनीच डाळ विकली जात आहे. १२० ते १३० रूपये किलो विकल्या गेलेली हरभरा डाळ आता ठोक ७० ते ८० रूपये किलोने विकल्या जात आहे.
 
शेतकऱ्यांचे मात्र नुकसान 

समाधानकारक पावसाने उत्पादन चांगले झाले असले तरी शेतमालाचे भाव पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. गेले तीन वर्ष दुष्काळी परिस्थितीत गेल्यानंतर यंदा चांगले उत्पादन झाले आहे .गेल्या वर्षी १२ हजार रूपये क्विंटलपर्यंत गेलेली तूर आता हजार ५०० रूपये प्रती क्विंटलपर्यंत खाली आली आहे. 
 
पुन्हा भाव कमी होण्याची शक्यता 
- हरभरा डाळ वगळता तूर, मूग उडीद डाळ बाजारपेठेत आल्या आहेत. मात्र, सध्या आवकच्या तुलनेत बाजारपेठेत मागणी नाही. त्यामुळे डाळींचे दर कमी झाले आहेत. दोन महिने हे दर स्थित राहतील. त्यानंतर डाळींच्या भावात अजून घसरण होण्याची शक्यता आहे. प्रवीण पगारिया, व्यापारी 
बातम्या आणखी आहेत...