आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ऑर्डर प्रमाणे चोरी करून मिळेल,’ प्रोफेशनल चोर; चोरीनंतर आंध्र, तामिळनाडूत विक्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- आंध्रप्रदेश, तामिळनाडूत अत्यंत कमी दराने चोरीच्या चारचाकी खरेदी केली जाते. या चारचाकी घेणारा ग्राहक मिळाल्यानंतर संबंधित व्यक्ती चाेरट्यांच्या टाेळीला ‘ऑर्डर’ देताे. त्यानुसार चाेरटे महाराष्ट्रातून आलिशान चारचाकी चोरून ती परराज्यात संबंधित मध्यस्तीला विक्री करतात. या टाेळीतील एक संशयित रामानंदनगर पोलिसांच्या हाती लागला आहे. ‘ऑर्डर प्रमाणे चोरी करून मिळेल,’ या सूत्रावर ही टाेळी काम करीत असल्याची खळबळजनक माहिती पोलिसांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. 

देवेंद्रनगर येथे राहणाऱ्या साईदास मोरसिंग राठोड यांची चारचाकी (क्रमांक एमएच १९, बीयू, ८४८१) १२ जुलै २०१६ रोजी रात्री चोरीला गेली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची मोठ्या प्रयत्नांनी या चारचाकी चाेरीतील शेख दाऊद शेख मंजूर (वय ५३, रा.धाडकर्डी, ता.जि.बुलडाणा), हर्षल मधुकर मंडळकर (वय २७, रा.जिजाऊनगर, ता.चिखली, जि.बुलडाणा) हर्षद भगवान गंगतीरे (वय २६, रा.दुसरबीड, ता.सिंदखेडराजा, जि.बुलडाणा) या तीन संशयितांना अटक केली आहे. यातील दाऊद हर्षल यांना आधीच अटक करण्यात आली आहे. तर हर्षदला शुक्रवारी अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या तिघांनी आपल्या गुन्ह्याची पोलिसांकडे कबुलीही दिली आहे. 

राठोड यांची चारचाकी आम्ही तिघांनी मिळून चोरल्याचे त्यांनी मान्य केले आहे; पण ही चारचाकी कोणाला विकली त्या व्यक्तीचे पूर्ण नाव, पत्ता किंवा इतर काहीच माहिती या तिघांनाही माहित नाही. दाऊद हा या टोळीतील ‘मास्टर माइंड’ आहे. तर हर्षल हर्षद हे दोघे प्यादे त्याला चोरी वाहन चालवण्यात मदत करतात. त्यांनी राज्यभरातील अनेक शहरांमध्ये चोरी केल्याची माहिती आता हळूहळू समोर येऊ लागली आहे. दरम्यान, आता हर्षलला मिळालेल्या पोलिस कोठडीत आणखी काही माहिती मिळते का? यासाठी पोलिस चौकशी करीत आहेत. 

आंध्र प्रदेश येथे चोरीच्या चारचाकी खरेदी करण्यासाठी आधी ग्राहक तयार केला जातो किंवा ग्राहकाने मागणी केल्यानंतर रॅकेट कामाला लागते. यात केवळ स्कॉर्पिओ, तवेरा आणि इंडिका या तीनच कंपन्यांची चारचाकी चोरी केल्या जातात. मृणजल नावाचा मध्यस्ती दाऊदला फोन करून कोणती गाडी चोरी करायची आहे? कोणत्या वर्षाचे मॉडेल हवे आहे ही माहिती देतो. 

माहिती मिळताच दाऊद, हर्षल हर्षद हे तिघे संबंधित गाडीचा शोध गावोगावी जाऊन घेतात. हॉटेल्स, उच्चभ्रू वस्त्या, पार्किंगमध्ये जाऊन ती टेहाळणी करतात. त्यांना समोर दिसणारी कार कोणत्या वर्षाच्या बनावटीची आहे, हे एका सेकंदात ओळखण्याचे स्किल हर्षदमध्ये आहे. तो पाहताक्षणी मॉडेलची माहिती सांगतो. ऑर्डरमध्ये सांगितल्यानुसार चोरीसाठी चारचाकीची निवड केली जाते. एक-दोन दिवस टेहाळणी करताच हे तिघे मास्टर चावीच्या साह्याने कार चोरून फरार हाेतात. संबंधित मालकाला चारचाकी चोरीची माहिती मिळेपर्यंत तिघे जण महाराष्ट्रातून पसार होऊन थेट आंध्र प्रदेश, तामिळनाडूच्या दिशेने प्रवासाला लागलेले असतात. या तिघांची माहिती मिळवून रामानंदनगर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्यांनी कार चोरीची कबुली दिली आहे; पण पुढची काहीच माहिती नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे चोरीच्या चारचाकी हस्तगत करण्यासाठी पोलिसांना चांगलीच धावपळ करावी लागणार अाहे. 

गरजेनुसार बँकेत मिळतो मोबदला 
मृणजलया मध्यस्तीचा मोबाइल क्रमांक या तिघांकडे नाही. नेहमी तोच फोन करून ऑर्डर देतो. याशिवाय त्याच्याशी बोलता येत नाही. ऑर्डर दिल्यानंतर दोन-तीन दिवसांनी तो फोन करून फॉलोअप घेतो. चारचाकी चोरल्याची माहिती मिळाल्यानंतर तो आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथे बोलावून घेताे. तेथे पोहचल्यानंतर दोन-तीन तास एकाच जागेवर उभे ठेवतो. मग अचानक समोर येऊन दाऊदच्या हातात काही पैसे ठेऊन चारचाकी घेऊन निघून जातो. काही सेकंदांतच हा सर्व व्यवहार होतो. एकाच वेळी पूर्ण पैसे दिले जात नाहीत. हे तिघे पुन्हा महाराष्ट्रात येऊन जातात. त्यानंतर पुढील काही दिवसांत वेगवेगळ्या बँक खात्यातून दाऊदच्या अकाऊंटमध्ये पैसे येतात. हे पैसे मृणजल टाकत असल्याचा विश्वास या तिघांना आहे. त्यामुळे एकाच वेळी पैसे मागता विश्वासाने चोरीच्या चारचाकीची डिलेव्हरी दिली जाते, अशी माहिती पोलिसांनी दिली. 
बातम्या आणखी आहेत...