आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताेतया डेप्युटी कलेक्टरचा डीवायएसपीकडून पर्दाफाश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- आपण डेप्युटी कलेक्टर असल्याची बतावणी करून एका भामट्याने डीवायएसपींना मोबाइलवर फोन करून कार्यालयात बोलावले. डीवायएसपींनी दोन मिनिटे चर्चा करताच त्याची बनावटगिरी उतरवत त्याचा पर्दाफाश केला. या तोतया डेप्युटी कलेक्टरविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    

समाधान केवलराव जगताप (रा.नाशिक) व ज्याेती धनंजय वाडीले हे महिला दक्षता समिती येथे एका जोडप्याचा कौटंुबिक वाद मिटवण्यासाठी गुरुवारी जळगावात आले होते. दरम्यान, या प्रकरणात मुलीवर अन्याय झाला असून तिच्या सासरच्या मंडळींवर कारवाई करा, असे सांगण्यासाठी त्यांनी थेट पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्या मोबाइलवर फोन केला. आपण ‘डेप्युटी कलेक्टर जे.सिद्धांत’ बोलत असल्याचे त्याने सांगळे यांना सांगितले. तसेच आपण पोलिस अधीक्षक कार्यालयात आलो असून आपली भेट घ्यायची आहे, असेही त्याने सांगितले. तसेच ज्योती वाडीले हिने देखील कार्यालयातील स्वागत कक्षावरील कर्मचाऱ्यांना जगताप हा डेप्युटी कलेक्टर असल्याचे सांगितले. फोनवरून त्याची नीट ओळख पटली नव्हती. डेप्युटी कलेक्टर सांगितल्यामुळे सांगळे  कार्यालयात पोहाेचले. सांगळेंच्या दालनात संबंधित मुलीसह तिच्या सासरची मंडळी आणि तोतया डेप्युटी कलेक्टर होते. सांगळेंनी सुरुवातीला ओळख करून घेतली. काही मिनिटे चर्चा केल्यानंतर जगताप हा अधिकारी नसल्याचे त्याच्या बोलण्यातून सांगळेंना जाणवले. त्यांनी मूळ प्रकरण बाजूला सारत जगतापची चौकशी सुरू केली. कोणत्या बॅचमध्ये परीक्षा उत्तीर्ण झालात?, कोणत्या जिल्ह्यात कार्यरत आहात?, सोबतच्या अधिकाऱ्यांची नावे सांगा? अशी प्रश्नांची सरबत्ती करताच जगतापची बोबडी वळली. आपले पितळ उघडे पडत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर सांगळे यांनी जगतापला अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले.  

ताेतया उच्चशिक्षित, स्पर्धा परीक्षेची तयारी   
जगताप हा उच्च शिक्षित असून स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याआधीच तो ‘तोतया अधिकारी’ बनून मिरवत होता.त्याने या पूर्वी अशा प्रकारची कोणाची फसवणूक केली आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...