जळगाव - आचार्य अत्रे लिखित ‘तो मी नव्हेच’ या लोकप्रिय नाटकातील लखोबा लोखंडेच्या भूमिकेशी साधर्म्य साधत तोतया उपजिल्हाधिकारी समाधान जगताप यानेही प्रारंभी नाशिकमधील हॉटेलमध्ये व्यवस्थापक, तहसीलदार, सनदी अधिकारी अशी नाना प्रकारची सोंगे घेऊन नागरिकांना फसविले आहे. एवढ्यावरच तो थांबला नाही. तर तहसीलदार बनून देवस्थानांमध्ये व्हीआयपी दर्शन घेण्याबरोबर शाळेला भेट देऊन भाषणही ठाेकले आहे. दुचाकी चोरी, शासकीय भरतीच्या बनावट जाहिराती इतरही सेटिंग त्याने केली आहे. कसून चौकशी केल्यानंतर त्याने ‘तो मीच’, अशी पोलिसांना कबुली दिली. दरम्यान, समाधान जगताप याला २४पर्यंत पोलिस कोठडी तर ज्योती वाडिले हिची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
एसपी कार्यालयात जाऊन थेट पोलिस उपअधीक्षकांनाच हजर व्हायला सांगणाऱ्या तोतया उपजिल्हाधिकारी समाधान जगतापला गुरुवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याची संपूर्ण बनवेगिरीची कुंडलीच बाहेर आली. त्याने आतापर्यंत अनेक सोंगे घेत तो समाधान जगताप, समाधान पाटील, जे. सिद्धांत अशा नावांनी ओळखही करून देत होता. तो सुरुवातीला नाशिकमधील हॉटेल वाघ्या मुरळीमध्ये व्यवस्थापक होता. तेथे झोल करून बाहेर पडला. नंतर दुसऱ्या हॉटेलमध्ये काम करून दहा टक्के भागिदारीही मिळवली. त्याने स्वत:चे शिक्षण बी.ई.सिव्हिल झाल्याचे सांगितले. तपासात तो यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बी.ए.च्या द्वितीय वर्षाची परीक्षा देत असल्याचे समोर आले. तहसीलदार असल्याची बतावणी करून त्याने नाशिक जिल्ह्यातील चौगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रेरणादायी भाषणही ठोकले. सप्तशृंगी गडावर पालघरचे तहसीलदार असल्याचे भासवून व्हीआयपी दर्शनही घेतले. शिर्डी येथेही तहसीलदार बनून व्हीआयपी प्रवेश मिळवून साई चरणी लीन झाला. तो राहत असलेल्या बागलाण (जि.नाशिक) येथील घराच्या दरवाजावर तहसीलदार असल्याची नेमप्लेट लावली आहे.
मलासोडा, २०२१ मध्ये आयएएस होऊन दाखवितो
समाधान स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊ शकला नाही. गुरुवारी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसी खाक्या दाखवला. सर्व पराक्रम सांगितल्यानंतरही तो पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांना मला सोडा, मी २०२१ मध्ये आयएएस होऊन दाखवतो, असे म्हणत होता. त्याने आर्थिक फसवणूक केल्याबाबतही पोलिस तपास करीत असल्याचे एसपी दत्तात्रय कराळे, उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दोघे भावी पती-पत्नी असल्याचे सांगितले
समाधानने फेसबुक चॅटिंगच्या माध्यमातून अमळनेर येथील ज्योती वाडिले हिच्यासोबत मैत्री केली. त्यानंतर हे दोघे एकत्र आले. दोघे भावी पती-पत्नी असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यांनी अनेकांना फसवल्याचा संशय आहे. त्याचे यापूर्वीच लग्न झाले आहे. सिद्धांत नावाचा त्याला मुलगाही आहे. त्यामुळेच तो जे.सिद्धांत अशी ओळख करून देतो. त्याच्यावर नाशिक जिल्ह्यातील पंचवटी भद्रकाली पोलिस ठाण्यात २०११ ते २०१२ च्या दरम्यान दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल अाहेत.
अमळनेरच्या विश्रामगृहातही पाहुणचार
आलिशान कारमधून समाधानची सवारी
समाधान जळगावमध्ये आलिशान कारमधून आला होता. त्यामध्ये त्याच्या नावाचा वाहन परवाना आढळून आला. ही कार चोरीची आहे काय? त्याने कशी खरेदी केली, याबाबत पोलिस तपास करीत आहेत.
जगतापने स्वत:च्या फेसबुक प्रोफाइलवर शासकीय लोगोचा वापर करून महाराष्ट्राचा सनदी अधिकारी अशी स्वत:ची ओळख करून दिली आहे. त्याने फेसबुक व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून शासकीय अधिकाऱ्यांना शुभेच्छा संदेश पाठवून अोळख करून घेतली. आमदार, खासदार, सनदी अधिकारी, मंत्रालयातील सचिव अशी यादीच त्याच्याकडे आहे. वाइन शॉप मंजुरीचे किती पैसे लागतील, यासंदर्भात लोकांना वेगवेगळे मेसेज टाकून चॅटिंग केल्याचे आढळून आले आहे. मोबाइलमध्ये तहसीलदार भरतीचे पोस्टरही आढळून आले. मोबाइलमध्ये शासकीय खात्यांच्या बनावट जाहिराती तयार करून अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता नाकारता येणार नाही. ग्रामसेवकांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत सेटिंग केल्याचे मेसेजही त्याच्या मोबाइलमध्ये आहेत. १६ मार्च २०१७ रोजी अमळनेर येथे आला असताना ज्योती वाडिले हिने समाधानसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात सुट बुक केला होता. तेथेही त्यांनी पाहुणचार घेतला.