आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅस जोडणीचे स्टॅम्पिंग शिधापत्रिकांवर होणार, रॉकेलचा काळाबाजार रोखण्यासाठी निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गॅस जोडणीधारकांनाही केरोसीन वाटप होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे केरोसीन पात्र लाभार्थींची आधार क्रमांकासह माहिती स्थानिक गॅस एजन्सींना उपलब्ध करून देऊन पंधरा दिवसांच्या आत सर्व गॅस जोडणी शिधापत्रिकांवर स्टॅम्पिंग करण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत. शिधापत्रिकांवर गॅस स्टॅम्पिंग करण्याची व्यक्तिश: जबाबदारी तहसीलदार, जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांची राहणार आहे.    
 
सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींकडे आधार क्रमांक असणे अनिवार्य केले आहे. त्यानुसार केरोसीन मिळण्यास पात्र लाभार्थींचे आधार क्रमांक संकलित करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र, आधार क्रमांकानुसार केरोसीनची मागणी प्राप्त न झाल्याने क्षेत्रीय कार्यालयांकडून कोणतीही कार्यवाही होत नाही. आधार सादर केलेल्या शिधापत्रिकाधारकांकडे गॅस जोडणी नसल्याची खात्री  न करता केरोसीन वितरित करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे प्रकार अाता राेखण्यात येतील.
 
आकस्मिक तपासणी    
अनुदानित दराचे केरोसीन घेणाऱ्या लाभार्थींकडे गॅस जोडणी नाही ना, याबाबत खात्री करण्यात येणार अाहे. त्यासाठी गॅस जोडणी शिधापत्रिकाधारकांच्या शिधापत्रिकांवर गॅस स्टॅम्पिंग केलेले आहे काय? केरोसीन पात्र लाभार्थी व त्यांना वितरित करण्यात आलेल्या केरोसीनची तपासणी, गॅस स्टॅम्पिंग झालेल्या शिधापत्रिकाधारकांमध्ये झालेली वाढ या अनुषंगाने आकस्मिक तपासणी मुंबईच्या पुरवठा निरीक्षकांच्या पथकाकडून करण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...