आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅस महागल्याने चुलीवर शिजवली खिचडी, मनसेचे आंदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 जळगाव - घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात एकदम ८६ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर मडक्यात प्रतिकात्मकरीत्या खिचडी शिजवण्याचा प्रयत्न करून जाहीर निषेध करण्यात आला.
घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आल्याने आता ग्राहकांना सिलिंडरसाठी ७४२ रुपये मोजावे लागत आहेत. एकीकडे पंतप्रधान चुलीचा धूर बंद करून महिलांना उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत गॅस देत आहेत, तर दुसरीकडे गॅस सिलिंडरच्या दरात भरमसाठ वाढ करण्यात येत आहे. त्यामुळे सिलिंडर घेणे सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर चालले आहे. 
 
 
सर्वसामान्य जनता वापरत असलेल्या घरगुती सिलिंडरची मोठी दरवाढ करण्यात आल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला. जनतेला विश्वासात घेता दरवाढ करणे म्हणजे लोकशाही देशात शासन मनमानी करीत आहे. 
 
 
आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइल गॅस यांचे दर स्थिर असताना अचानक करण्यात आलेली दरवाढ हा सर्वसामान्य जनतेवर मोठा अन्याय आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवताना सामान्य, गोरगरीब जनतेचा विचार करणे गरजेचे अाहे. सर्वसामान्य जनतेच्या भावना शासनाला कळवाव्यात घरगुती सिलिंडरची केलेली दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी; अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

आंदोलकांनी दिल्या निषेधाच्या घोषणा 
मनसेचे जिल्हा सचिव जमील देशपांडे, नगरसेवक अनंत जोशी, दिलीप सुरवाडे, जितेंद्र करोसिया, संदीप मांडोळे, आशिष सपकाळे, सूरज पवार, वैशाली विसपुते, हर्षदा पाटील, नीता राणे, शोभा कोळी या आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिकामे सिलिंडर आणले होते. दगडांच्या चुलीवर दोरीच्या साहाय्याने काठ्यांना मडके बांधून त्यात खिचडी शिजवण्यासाठी टाकली. मात्र, निषेधाच्या घोषणेनंतर अर्ध्या तासाच्या आत आंदोलन संपले. शेवटी आंदोलनकर्त्यांची खिचडी शिजलीच नाही. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...