आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे: अल्पवयीन मुलीची गळफासाने आत्महत्या, आठवड्यातील तिसरी घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- येथील देवपुरातील जयहिंद कॉलनीत राहणाऱ्या अनुष्का पाटीलने राहत्या घरी गळफास घेतला. उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीने आत्महत्या करण्याची ही तिसरी घटना आहे. 

येथील देवपुरातील जयहिंद कॉलनीत प्लॉट नंबर १०५मध्ये जयेश पाटील कुटुंबीयांसह राहतात. त्यांची एकुलती एक मुलगी अनुष्का (१५) इयत्ता नववीत शिकत होती. काल बुधवारी दुपारी पावणेबारा वाजेच्या सुमारास अनुष्काने पंख्याला गळफास लावून घेतला. त्यामुळे घरापासून जवळ असलेल्या एका खासगी रुग्णालयात तिला वडील जयेश पाटील यांनी अत्यवस्थ अवस्थेत दाखल केले. सुरुवातीपासून तिची प्रकृती गंभीर होती. उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे तीन वाजता अनुष्काचा मृत्यू झाला. घटनेनंतर डॉ. जितेंद्र बिऱ्हाडे यांच्या माहितीवरून पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शासकीय सोपस्कार पूर्ण केल्यानंतर तिचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. अनुष्का ही जयहिंद हायस्कूलमध्ये शिकत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हेडकॉन्स्टेबल एम. पी. पाटील तपास करत आहेत. अल्पवयीन मुलांनी आत्महत्या करण्याची सलग तिसरी घटना आहे. यापूर्वी गत गुरुवारी दत्त मंदिर परिसरातील गवळे नगरात राहणाऱ्या प्राप्ती पाटील (१४) तर सोमवारी (दि.२०) गायत्री नगरात गौरव पाटील (१७) या मुलाने आत्महत्या केली हाेती. या दोन्ही घटनांचे कारण अद्याप समोर आलेले नाही. अनुष्का सहलीला जाण्यासाठी इच्छुक होती; परंतु तिच्या पालकांनी काळजीपोटी तिला जाण्यास नकार दिला. त्यामुळे तिने सहलीला जाण्याचा हट्ट धरला. अनुष्काची आई काही वेळेसाठी घराबाहेर गेली असताना तिने गळफास लावून घेतला. यानंतर काही क्षणात तिची आई घरात दाखल झाली. त्या वेळी अनुष्काने गळफास घेतल्याचे आढळून आले. 

देवपूर ते पश्चिम देवपूर 
घटनेनंतरदेवपूर पोलिसांचे पथक रुग्णालयात दाखल झाले. अनुष्का हिचे घर प्रत्यक्षात पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते. त्यामुळे देवपूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केल्यानंतर या प्रकरणाची कागदपत्रे पश्चिम देवपूर पोलिसांकडे सोपविली. त्यानंतर दुपारी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. 

नकार, पराभव पचवायला शिकवा 
- मुलांना नकार आणि पराभव पचवण्याची क्षमता वाढविली पाहिजे. प्रत्येक गोष्ट मागितली म्हणजे दिलीच पाहिजे असे नाही. पराभवाकडे पाहण्याची सकारात्मक क्षमता मुलांमध्ये विकसित केली पाहिजे. मुलांनीही अपयश पचविले पाहिजे.
-डॉ.तुषार भट, मानसोपचारतज्ज्ञ, धुळे
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...