आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीच्या जन्मानंतर आईची बग्गीतून काढली मिरवणूक,राबवला प्रेरणादायी उपक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आईसह रोशनीची निघालेली मिरवणूक. - Divya Marathi
आईसह रोशनीची निघालेली मिरवणूक.
धुळे- मुलगी झाल्याने शहरातील प्रजापत कुटुंबीयांनी नातलग, शेजारी आणि मित्रमंडळींसोबत आनंदोत्सव साजरा केला. गोड पदार्थही वाटले, देवाची आराधना केली. एवढेच नव्हे तर बालिकेच्या नामकरण विधीपूर्वी अाईसोबत तिची बग्गीतून मिरवणूक काढली. 
 
शहरातील मोगलाई परिसरात भटूलाल प्रजापत राहतात. प्रजापत यांना दोन मुली प्रणय नावाला एक मुलगा आहे. प्रणय हे पुणे येथे अभियंता म्हणून कार्यरत आहेत. उच्चशिक्षित असलेल्या कोमल यांच्याशी प्रणय यांचा विवाह झाला.काही दिवसांपूर्वीच कोमल यांनी एका गोंडस निरागस अशा बालिकेला जन्म दिला. मुलगी झाली, तुमच्या घरी लक्ष्मी आली आहे, असा निरोप रुग्णालयातून मिळताच प्रजापत कुटुंबाच्या आनंदाला उधाण आले.
 
मुलीच्या जन्मानंतर प्रजापत कुटुंबीयांनी नातलग शेजाऱ्यांना गोड पदार्थाचे वाटप केले. तसेच या बालिकेचे रोशनी असे नामकरण करण्याचे ठरवले. रोशनीच्या जन्माप्रमाणेच तिचा नामकरण सोहळा ही मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन दिवसांपूर्वी हा सोहळा झाला. त्यापूर्वी प्रजापत कुटुंबीयांनी कोमल राेशनी यांची बग्गीतून मिरवणूक काढली.
 
मोगलाई परिसरातून निघालेली ही मिरवणूक लाडकाना भवनापर्यंत नेण्यात आली. या मिरवणुकीत रोशनीचे वडील प्रणय, आजोबा भटूलाल आणि पणजोबा ताराचंद प्रजापत यांच्यासह कुटुंबीय सहभागी झाले होते. त्यानंतर लाडकाना भवनात विधिवत नामकरण सोहळा झाला. या वेळी उपस्थितांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. प्रजापत कुटुंबीयांनी स्त्री जन्माच्या स्वागतासाठी राबवलेला उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी आहे. प्रत्येकाने या उपक्रमातून प्रेरणा घेत मुलींचे स्वागत करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत या उपक्रमानंतर व्यक्त करण्यात आले. 
 
मुलींमुळेच नात्यातील प्रेमाचा ओलावा 
-नात्यातील प्रेम,ओलावा हा मुलींमुळे वाढतो. प्रत्येकाला हा अनुभव आला असेलच अशी माझी खात्री आहे. मला स्वत:ला चार बहिणी दोन मुली आहेत. बहीण, मुलगी नातीच्या रूपाने मुलीकडून संपूर्ण कुटुंबाला मिळणाऱ्या प्रेमाची तुलनाच होऊ शकत नाही. रोशनीकडूनही सर्वांना भरभरून प्रेम मिळेल यात शंकाच नाही. मुलीशिवाय नात्याला प्रेमाचा आधार नाही. -भटूलाल प्रजापत, कुटुंबप्रमुख 
 
सर्वानुमते ठरले रोशनी नाव 
राेशनीचा जन्म झाल्यापासून घरात आनंद व्यक्त होत होता. तिच्या रूपाने घरात सुखरूपी रोशनी आल्याचे मत कुटुंबीयांकडून व्यक्त झाले. त्यामुळे या बालिकेचे नाव रोशनी ठेवण्यात आले. प्रजापत कुटुंबीय मूळ राजस्थान येथील असून, सन १९१५ पासून ते रोजगारानिमित्त येथे स्थायिक झाले आहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...