आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झेंडू, निशिगंधाच्या सुवासाने होते गोलाणी मार्केटची सकाळ, झेंडूला 60 ते 100 रुपये किलो भाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - झेंडूच्या लाल, पिवळ्या फुलांचा ढीग. त्यासोबतच शेवंती, लिली, अॅस्टर,जर्बेरा,निशीगंधाच्या फुलांच्या दरवळीने दररोज गोलाणी मार्केटमध्ये सकाळचे वातावरण प्रसन्न होऊन जाते. गोलाणी मार्केटमध्ये दरराेज होत असलेल्या लिलावामध्ये फुलांचा चांगला दाम मिळत असल्याने जळगावसह इंदूर, दादर, पुणे, मुंबईसह औरंगाबाद, बुलडाणा, जालना या जिल्ह्यांमधून शेतकरी माल विक्रीसाठी आणतात. दिवाळीसाठी झालेल्या लिलावामध्ये झेंडूसह शेवंती, लिली, अॅस्टर, जर्बेरा, निशिगंधाची ९० क्विंटलपर्यंत आवक झाली. आवक जास्त असल्याने दसऱ्याच्या तुलनेत झेंडूला ६० ते १०० रुपयांचा भाव मिळाला. 

गोलाणी मार्केटमध्ये रोज सकाळी ते १० वाजेपर्यंत फुलांचा लिलाव होतो. जळगाव जिल्ह्यात प्रामुख्याने शिरसोली येथून निशिगंधा, शेवंती, गुलाबाची मोठ्या प्रमाणावर फुले विक्रीस येतात. इतरही तालुक्यातून गुलाब, शेवंती विक्रीस येते. जर्बेरा, गुलाबाची फुलशेतीही काही शेतकरी करतात. येथे फुलांचा लिलाव मोठ्या प्रमाणात होतो. चांगला दाम मिळत असल्याने औरंगाबाद, जालना, बुलडाणा या जिल्ह्यातून शेतकरी फुले विक्रीसाठी आलेले होते. जळगावच्या लिलावाबाबत बाहेरील जिल्ह्यातील शेतकरी उत्सुक असतात. भाव कळाल्यानंतर रात्रीच जळगावमध्ये फुलांसह वाहने दाखल झाली होती. त्याचबरोबर नगर, पुणे येथून शेवंतीची फुले येतात. जर्बेरा, अॅस्टर, डच, गुलाब दादर, पुणे येथून आली होती. लिलावाशिवाय जळगावातील विक्रेते स्वत:ही येथून फुले मागवून लिलावात सहभाग घेतात. शहरातील ७५ ते ८० फूल विक्रेते लिलावात सहभागी होतात. 
 
पावसामुळे शेवंतीच्या फुलांना फटका
यंदा राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाचा जोर कायम आहे. त्याचा फटका शेवंतीची फूलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बसला आहे. दसऱ्याला ३०० रुपये किलोपर्यंत पोहोचलेली शेवंतीच्या फुलांना मंगळवारच्या लिलावामध्ये १५० रुपये किलोप्रमाणे भाव मिळाला. ते प्रतीच्या झेंडूच्या फुलांना ६० ते १०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. ट्रकभर फुले लिलावासाठी दाखल झालेली होती. फुलांच्या लिलावामुळे सकाळी गोलाणी मार्केटमध्ये फुलांचा दरवळ पसरला होता. लिलावाचे मनोहारी दृश्य होते. 
 
बातम्या आणखी आहेत...