आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपंगत्वावर मात करीत वीस वर्षांपासून करताहेत अध्यापन, झोपलेल्या अवस्थेतच शिक्षणाचे कार्य निरंतर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झोपलेल्या अवस्थेत शिक्षणाचे धडे देताना अशोक वाघ. - Divya Marathi
झोपलेल्या अवस्थेत शिक्षणाचे धडे देताना अशोक वाघ.
कापडणे- एका अपघातात कायमचे अपंगत्व पदरी पडल्यानंतरही निराश होता, तालुक्यातील न्याहळोद येथील तरुणाने अध्यापनाचा मार्ग स्वीकारला. गत वीस वर्षांपासून अंथरुणावर असलेला हा अवलिया शिक्षक झोपूनच अध्यापनाचे कार्य करीत आहे. त्यांच्या हातून गत वीस वर्षांत गावातील शेकडो विद्यार्थी घडले. आजही त्यांचे हे काम निरंतर सुरू आहे. योगासन, प्राणायाम अन् ध्यानधारणेच्या बळावर अपंगत्वावर मात करीत हे शिक्षक इतरांसाठी प्रेरणास्रोत बनले आहेत. 
 
तालुक्यातील न्याहळोद येथील अशोक देवराम वाघ यांचा सामान्य कुटुंबात जन्म झाला. सुरुवातीला जनता सहकारी बँकेत नोकरी लागली. सर्व काही सुरळीत सुरू असताना सन १९९४मध्ये एक संकट त्यांच्यावर ओढवले. या संकटाने त्यांचे जीवनच बदलले. २१ वर्षांपूर्वी अशोक वाघ यांची मित्राशी नारळाच्या झाडावर चढण्याची पैज लागली हाेती. दुर्दैवाने झाडावर चढताना हात सटकला. ते खाली पडले. या अपघातात कंबरेचा एक मनका दाबला गेल्यामुळे त्यांचा कंबरेखालील भाग बधिर झाला.
 
 या अपघाताने त्यांच्या जीवनात जणू अंध:कारच पसरला. अपंगत्व आल्यामुळे बँकेची नोकरी गमवावी लागली. कुटुंबाची परिस्थिती हलाखीची म्हणून अनेकदा आत्महत्येचा प्रयत्नही केला. मात्र, या बिकट परिस्थितीत त्यांचे कुटुंब आणि मित्रांनी वेळोवेळी त्यांचे मनोबल वाढवले. सुरुवातीचे दोन वर्षे दु:खाला कवटाळलेल्या अशोक वाघ यांनी सन १९९८मध्ये न्याहळोद गावी खासगी क्लासेस सुरू केले. सुरुवातीला या क्लासला प्रतिसाद नव्हता. मात्र, मित्रांनी या वेळीही त्यांना मदत केली. टप्प्याटप्प्याने त्यांच्याकडे विद्यार्थ्यांचा ओघ सुरू झाला. सध्या सकाळी पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना अाणि सायंकाळी आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ते अध्यापनाचे धडे देत आहेत. 
 
हलाखीच्या परिस्थितीमुळे सुरुवातीला उपचार घेण्यासाठी त्यांना अनेक अडचणी आल्या. घरात फक्त आई आणि भावंडे असा परिवार असल्याने अचानक आलेल्या या अपंगत्वाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मात्र आता परिस्थितीत स्थिरावलेली आहे. आज वीस वर्षांनंतरही ते अंथरुणावरच खिळून आहेत. मात्र, आपला प्रामाणिक प्रयत्न त्यांनी सोडलेला नाही. गेल्या वीस वर्षांत त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले असून, त्या विद्यार्थ्यांच्या प्रेमामुळे आपले जगणे सोपे झाल्याचे ते सांगतात. 
 
ज्या विद्यार्थ्यांना घडविले ते बरेच विद्यार्थी चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरीला लागले. हे विद्यार्थी गावात आल्यानंतर अशोक वाघ यांची भेट आवर्जून घेतात. काही विद्यार्थ्यांना अश्रू अनावर होतात. नेहमीच झोपून असल्यामुळे सन २०१२पासून वाघ यांना कमरेखाली जखम झाली आहे. बराच उपचार केला. मात्र ती जखम बरी होत नाही. विद्यार्थ्यांच्या प्रेमामुळे वाघ यांना जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. 
 
एकत्र कुटुंबाचा आधार 
अशोक वाघ लहान असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने कुटुंबाची जबाबदारी आई आणि मोठ्या भावांवर अाली. भावांच्या पाठिंब्याने जगण्याचे सामर्थ्य लाभले. तीन भाऊ पुतण्या प्रकाश वाघ यांचा पाठिंबा असल्याचे अशोक वाघ सांगतात. अशोक वाघ हे वीस वर्षांपासून सकाळी रोज दाेन तास ध्यानधारणा योगा करतात. त्यामुळे जीवन जगण्याची प्रेरणा मिळत असल्याचे ते सांगतात. योग अाणि प्राणायामांनी इतकी वर्षे जगवल्याचे ते सांगतात. 
बातम्या आणखी आहेत...