आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडले; 20 हजार क्युसेस प्रतिसेकंद विसर्ग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हतनूर धरणातील विसर्गामुळे तापीपात्र दुथडी भरून वाहत आहे. - Divya Marathi
हतनूर धरणातील विसर्गामुळे तापीपात्र दुथडी भरून वाहत आहे.
भुसावळ - मध्य प्रदेशातील टेक्सा आणि देडतलाई या पर्जन्यमापक स्थानकांवर गेल्या ४८ तासांमध्ये झालेल्या पावसामुळे हतनूरची जलपातळी गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेदरम्यान ३.१० मीटरने वाढली. यामुळे दरवाजे पूर्ण तर ३२ दरवाजे अर्धा मीटरने असे एकूण ३६ दरवाजांतून ५७३ क्युमेक्स अर्थात २० हजार २३४ क्युसेस प्रतीसेकंद वेगाने विसर्ग करण्यात येत आहे. 
 
तापीचे उगमस्थळ असलेल्या मध्यप्रदेशातील बैतूल आणि हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रातील टेक्सा आणि देडतलाई या पर्जन्यमापक स्थानकांवर गेल्या ४८ तासांमध्ये समाधानकारक पाऊस झाला. यामुळे धरणाची जलपातळी वाढली आहे. यामुळे सायंकाळी सात वाजता दरवाजे पूर्ण तर ३२ दरवाजे अर्धा मीटरने उघडून तापी नदीपात्रात ५७३ क्युमेस अर्थात २० हजार २३४ क्युसेस प्रतीसेकंद वेगाने विसर्ग करण्यात आला. धरणात सायंकाळी साडेसात वाजता २०८.३५० मीटर जलपातळी तर १४९.५० दलघमी जलसाठा कायम होता. हतनूरच्या पाणलोटक्षेत्रात आतापर्यंत रिपरिप पाऊस झाला. यामुळे जमिनीमध्ये सिंचनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तापी आणि उपनदी असलेल्या पूर्णा या दोन्ही नद्यांच्या संगमावर हतनूर धरण आहे. सध्या होत असलेला पाऊस नदी, नाल्यांमधून वाहून निघत असल्याने हतनूरमध्ये जलपातळी वाढण्यास मदत होत आहे. यंदाच्या पावसाळी हंगामात प्रथमच हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. पाण्याची आवक कायम राहिल्यास विसर्ग सुरु राहिल. मात्र शुक्रवारी आवक घटल्यास काही दरवाजे बंद करुन विसर्ग थांबवण्यात येणार आहे. 
 
तापी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा 
धरणातून तापी पात्रात होत असलेल्या विसर्गामुळे पूर आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी पात्रात प्रवेश करु नये. यासह मच्छीमार बांधवांनी पुरात व्यवसाय थांबवावा. तापीकाठच्या गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा दिला आहे.
एस.आर. पाटील, उपविभागीय अभियंता, हतनूर 
बातम्या आणखी आहेत...