आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हतनूर धरण तहानले; उरला केवळ 6.94 टक्के जलसाठा, पावसानंतरही धरणात आवक मंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- बुधवारपासून तालुक्यासह संपूर्ण भुसावळ विभागात पावसाची रिपरिप सुरु आहे. यामुळे पिकांना जिवदान मिळाले असले, तरी विभागासह अर्ध्या जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या हतनूर धरणात अद्यापही पाण्याची समाधानकारक आवक झालेली नाही. विभागात पाऊस होत असला तरी हतनूरच्या पाणलोटक्षेत्रात कमी पाऊस नसल्याने धरणात केवळ ६.९४ टक्के जलसाठा आहे.
 
भुसावळ शहर, तालुका आणि विभागात बुधवारपासून दररोज रिपरिप पाऊस सुरु आहे. दमदार पाऊस नसला तरी गेल्या पंधरवड्यापासून पावसाची प्रतिक्षा असलेल्या पिकांना जिवदान मिळाले आहे. भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड आदी तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत समाधानकारक पाऊस झाल्याने पिकांना जिवदान मिळाले. मात्र अद्यापही हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पावसाची ओढ कायम आहे. हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात येणाऱ्या बऱ्हाणपूर, देडतलाई, चिखलदरा, टेक्सा, गोपाळखेडा आदी स्थानकांवर गेल्या पंधरवड्यापासून समाधानकारक पावसाची नोंद नाही. यामुळे हतनूर धरणात येणारा जलसाठा अत्यल्प आहे. हतनूर धरणात शनिवारी सकाळी साडेआठ वाजता केवळ २०८. ३९० मिटर जलपातळी तर १५०. ७० दलघमी जलसाठा शिल्लक होता. धरणाच्या क्षमतेच्या तुलनेत केवळ ६.९४ टक्के जलसाठा कायम आहे. हतनूरच्या पाणलोटक्षेत्रात येणाऱ्या देडतलाई येथे २८.६, टेक्सा १६.४, गोपाळखेडा चिखलदरा येथे २२.०० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. उर्वरित पर्जन्यमापन केंद्रांवर पावसाने ओढ दिली आहे. यामुळे हतनूरमध्ये जलसाठा होत नसल्याची स्थिती कायम आहे. हतनूरवर अर्ध्या जिल्ह्याचा पाणीपुरवठा आणि सिंचनाची सुविधा मिळते, यामुळे या धरणात पाण्याचा साठा वाढणे अपेक्षित आहे. त्यासाठी दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.
 
दोन दरवाजांतून विसर्ग : हतनूरधरणात होत असलेल्या अल्प आवकचाही फायदा मिळावा यासाठी दोन दरवाजे अर्धा मिटरने उघडून विसर्ग केला जात आहे. शनिवारी धरणातून २४ क्युमेक्स अर्थात ८४७.६४ क्युसेस प्रतीसेकंद वेगाने विसर्ग करण्यात आला. यासह गेल्या काळात उजव्या तट कालव्यातूनही पूनर्भरणासाठी विसर्ग झाल्याने यावल आणि चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दमदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे.
 
शहराचा पाणीप्रश्न मिटला : हतनूरमध्येझालेल्या अल्पशा पाणी आवक नंतर विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे तापीपात्रातील बंधाऱ्यात पाण्याची पातळी वाढली. हतनूरमधून अल्प प्रमाणात का होईना विसर्ग झाल्यामुळे शहरातील संभाव्य टंचाईवर मात करता आली आहे. तापीपात्रातील बंधाऱ्याची पातळी वाढून तो ओव्हरफ्लो होणार असल्याने शहराला आगामी ३० दिवसांपर्यंत भुसावळ शहरात सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे.
 
चिंतेचे वातावरण कायम : मध्यप्रदेशातील बैतूलचा भाग आणि विदर्भातील अमरावती जिल्ह्यात सलग दोन दिवस समाधानकारक पाऊस झाल्यास हतनूरचा जलसाठा वाढीसाठी मदत होणार आहे. मात्र पाणलोटक्षेत्रात पाऊस नसल्याने आवक अत्यल्प आहे. जुलै महिन्यात १०० टक्के भरणारे धरण सध्या तळ गाठलेल्या स्थितीत असल्याने हतनूरवर अवलंबून असलेल्या पाणीवापर संस्था आणि शेतकऱ्यांमध्ये चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे.
 
धरणातून विसर्ग
पाणलोट क्षेत्रात दोन दिवस समाधानकारक पाऊस झाल्यास हतनूर १०० टक्के भरेल. जुलै महिन्याचा दुसरा पंधरवडा सुरू होऊनही पाण्याची आवक नसल्याने स्थिती गंभीर आहे. आलेल्या पाण्याचाही सदुपयोग करावा, यासाठी विसर्ग मात्र सुरू आहे.
- एस. आर. पाटील, उपविभागीयअभियंता, हतनूर धरण
बातम्या आणखी आहेत...