आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपत्तीनंतर होतो ‘गहजब’: 198 शाळांवर वीजरोधक यंत्रणा नाही; 52,000 विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केवळ यावल तहसील कार्यालयाच्या छतावर वीजरोधक यंत्र लावले आहे. - Divya Marathi
केवळ यावल तहसील कार्यालयाच्या छतावर वीजरोधक यंत्र लावले आहे.
यावल - शहरातील पाच स्थळांचा अपवाद वगळता तालुक्यातील सार्वजनिक ठिकाणे, शालेय इमारतींवर वीजरोधक यंत्रणा म्हणजेच वीज प्रतिबंधक (Lightning arrestor) नाही. परिणामी ५२ हजार विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला असल्याचे धक्कादायक वास्तव ‘दिव्य मराठी’ने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. मात्र, एखादी जीवघेणी दुर्घटना घडल्यावर उपाययोजना करण्यापेक्षा पावसाळ्यापूर्वीच १९८ शाळा, १३ कार्यालयांसह गरजेच्या ठिकाणी विजरोधक यंत्र बसवण्यासाठी प्रशासन पुढाकार घेईल का? हा कळीचा प्रश्न आहे. 
 
यावल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या प्राथमिक उच्च प्राथमिक ११४, तर उर्दू माध्यमाच्या २६ शाळा आहेत. महाविद्यालये, माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालये ५८ आहेत. यापैकी पहिली ते पाचवीपर्यंत ५२ हजार १४० विद्यार्थी शिक्षण घेतात. दरम्यान, हे विद्यार्थी शिक्षण घेणाऱ्या बहुतांश शाळांची दयनीय अवस्था असून तेथे विजरोधक यंत्रणेचा अभाव आहे. दुसरीकडे उन्हाळ्यात ऋतुबदल होवून मे महिन्यात मान्सूनचे वारे वाहण्यास सुरुवात होते. अनेकवेळा विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होतो. त्यातही जून महिन्यात वीज कोसळण्याची शक्यता जास्त असते. अशा दुर्घटनांमध्ये दरवर्षी पशुधनासह अनेकवेळा शेतकरी, शेतमजूर आणि रहिवाशांचा बळी जातो. दरम्यान, वीज पडून एखादी दुर्घटना घडल्यावर उपाययोजनांबाबत सार्वत्रिक जाग येते. आता ‘दिव्य मराठी’ने केलेल्या पाहणीनंतर जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत इमारती, विविध प्रशासकीय कार्यालये, महाविद्यालये विद्यालयांमध्ये हा धोका समोर आला आहे. 
 
१४० शाळा जिल्हा परिषदेच्या 
०१ किनगावच्या शाळेवर आहे यंत्रणा
१३ शासकीय, निमशासकीय कार्यालये 
५८ माध्य. शाळा, एक कॉलेज 
 
सरकारी धोरण : वीज पडून जीवितहानी टाळण्यासाठी सरकारी धोरण आहे. तरीही प्रत्येक तलाठी सजावर यंत्रणा बसवण्यासाठी फारसे प्रयत्न नाही. दुर्घटना घडल्यावर मात्र सर्व स्तरावरून भाष्य होते. 
 
सहा यंत्र : तहसीलकार्यालय, साने गुरूजी विद्यालयाच्या मागील बाजूचा पालिकेचा जलकुंभ, विरार नगरातील जलकुंभावर प्रत्येकी एक आणि शहरातील सुदर्शन धनश्री चित्र मंदिर या दोन्ही चित्रपटगृहावर ही यंत्रणा आहे. इतर कुठेही सोय नाही. 
 
प्रत्येक यंत्र ५०० मीटर परिघाला देते विजेपासून सुरक्षा 
सद्य:स्थिती अशी : जिल्हा परिषदेच्या १४० शाळांपैकी केवळ किनगावच्या नेहरू विद्यालयावर वीजरोधक यंत्रणा आहे. महाविद्यालये, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालये अशा ५८ ठिकाणी ही यंत्रणा बसवलेली नाही. 
 
सरकारचे धोरण : दिवंगत नेते विलासराव देशमुख केंद्रात माहिती तंत्रज्ञान मंत्री असताना मराठवाड्यात वीजरोधक यंत्र बसवण्याची मागणी करण्यात आली होती. बीड जिल्ह्यात एका कार्यक्रमात त्यांनी तसे आश्वासनही दिले. मात्र, पुढे काही झाले नाही. 
 
२०१५ मध्ये निर्णय : वसतिगृहे, निवासी शाळा, सामाजिक न्याय भवनाच्या इमारतींवर वीज प्रतिबंधक यंत्रणा बसवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाने घेतला होता. ऑगस्ट २०१५मध्ये घेतलेल्या या निर्णयानुसार समाज कल्याण विभागाची वसतिगृहे, शाळांवर यंत्रे बसवण्यात आली. 
 
मुख्यमंत्री, महसूल मंत्र्यांना पत्र देणार 
- तालुक्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय अशा एकूण १६ विविध कार्यालयांना वीजरोधक यंत्रणा बसवणेबाबत पत्रव्यवहार केला आहे. पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी यंत्रणा बसायला हवी, अशी निर्देश दिलेले आहेत. 
कुंदनहिरे, तहसीलदार, यावल 
 
-जिल्हा परिषदेच्या शाळांसह विद्यालये महाविद्यालयात वीज प्रतिबंधक (Lightning arrestor) बसवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच आपापल्या स्तरावर कार्यवाही करावी, असे पत्र सर्वांना देऊ. त्यानुसार कार्यवाही होते किंवा नाही, याचाही आढावा घेऊ.
एजाजशेख, गटशिक्षण अधिकारी, यावल 
 
- ‘दिव्य मराठी’नेअतिशय चांगला विषय समोर आणला आहे. राज्यभर यादृष्टीने आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात, यासाठी आपण मुख्यमंत्री, महसूलमंत्री शिक्षण मंत्र्यांना पत्राद्वारे विनंती करणार आहोत. यामुळे होणारे नुकसान टाळता येईल. 
हरिभाऊ जावळे, आमदार, रावेर 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...