आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्नपत्रिका फुटल्यानंतरही झाली ITIची परीक्षा, जळगावात एका विद्यार्थ्यावर गुन्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - देशभरात एकाच वेळी होणाऱ्या आयटीआय अॅप्रेंटिसशिपच्या (बीटीआरआय) परीक्षेतील इलेक्ट्रॉनिक्स व फिटर या ट्रेडची प्रश्नपत्रिका फुटल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. जळगावात ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केलेली प्रश्नपत्रिकाच जशीच्या तशी परीक्षेत उतरली. मात्र, त्यानंतरही सुस्त आयटीआय प्रशासनाने जळगावात परीक्षा घेतली. दरम्यान, प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी एका विद्यार्थ्यावर जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

शुक्रवारी अॅप्रेंटिसशिपच्या इलेक्ट्रिशियन व फिटरच्या थेअरीचा पेपर झाला. मात्र, हा पेपर फुटल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने दिले हाेते. १०० गुणांच्या या पेपरमधील ८० गुणांचे मोठे प्रश्नच ‘दिव्य मराठी’ने शुक्रवारच्या अंकात प्रकाशित केले होते. सकाळी १०.३० ते १.३० दरम्यान झालेल्या पेपरमध्ये हेच प्रश्न दिले होते. आयटीआय उतीर्ण झाल्यावर प्रशिक्षणानंतर ही परीक्षा विद्यार्थ्यांना हमखास नोकरीची संधी देत असते.

पेपर सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका
पेपरफुटीची बातमी ‘दिव्य मराठी’त प्रकाशित होताच प्रशासनाने परीक्षेसाठी कडक व्यवस्था ठेवली होती. परीक्षार्थींची तपासणी करूनच आत सोडले जात होते. यादरम्यान गुणवंत रवींद्र पाटील या परीक्षार्थीकडे प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स प्रत आढळून आली. शिक्षकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. आयटीआय कर्मचारी ज्ञानेंद्र दीनानाथ कुलकर्णी यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात ही फिर्याद दिली आहे.

माहीत नाही
आयटीआयमधील पेपरफुटीविषयी अद्याप मला माहीत नाही. यासंबंधीची माहिती घेऊन काय करता येईल ते ठरवले जाईल.
आर.आर. असावा, संचालक, तंत्रशिक्षण विभाग

प्रश्नांमध्ये साम्य
वृत्तपत्रात छापलेले प्रश्न व प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांमध्ये साम्य आढळून आले आहे. या पेपरफुटीचा अहवाल तंत्रशिक्षण विभागाकडे पाठवण्यात आला .
व्ही. एम. राजपूत , प्राचार्य, शासकीय आयटीआय, जळगाव