आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांच्या हलगर्जीपणाच्या चौकशीची प्रकरणे धूळ खात, सिव्हिलमध्ये अनेकांची फरपट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- खासगी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांना जीव गमवावा लागतो. अशा प्रकरणात पीडित कुटुंबीयांना संबंधित डॉक्टरांविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीच्या चौकशीचा अहवाल आवश्यक असतो. मात्र, जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या दोन वर्षांपासून दोन प्रकरणे चौकशीविनाच धूळखात पडले आहेत. यात अन्यायग्रस्त कुटुंबीयांची चांगलीच फरफट होते आहे.
 
ममता तायडे या १८ वर्षीय युवतीचा जुलै २०१५मध्ये अपघात झाल्यानंतर तिच्या उजव्या पायाला दुखापत झाली हाेती. शहरातील एका खासगी रुग्णालयात ममतावर उपचार करण्यात आले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दोन वर्षात ममता तायडेवर आठ वेळा शस्त्रक्रिया कराव्या लागल्या आहेत. दरम्यान, अद्यापही ममताला स्वत:च्या पायावर उभे राहता आलेले नाही. तिचे वडील पोलिस नाईक पदावर कार्यरत अाहेत. दरम्यान, ममता तायडे यांचे प्रकरण जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय समितीसमोर चौकशीसाठी दिलेले आहे. मात्र, चौकशी समितीमध्ये असलेले सदस्य आपापल्या कामात व्यस्त अाहेत. त्यामुळे ही चौकशी पूर्ण हाेत नाही.

परिणामी तायडे कुटुंबीयांना अद्याप न्याय मिळू शकला नाही. याबाबत अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांनी लवकरच चौकशी पूर्ण करू, असे आश्वासन दिले आहे.
 
शहरातील रामेश्वर कॉलनी येथे राहणाऱ्या गोपाल भवरे यांचा १७ महिन्यांचा मुलगा तन्मय याला ताप आल्यामुळे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणातही डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तन्मयला जीव गमवावा लागला आहे. जानेवारी २०१६ रोजी तन्मयचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी डॉक्टरांवर आरोप केल्यानंतर धुळे येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल प्राप्त झाला आहे.

परंतु वैद्यकीय समितीची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. जळगावच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ नसल्यामुळे ही चौकशी जळगावात होऊ शकणार नाही, असे उत्तर भवरे कुटुंबीयांना देण्यात आले. त्यानंतर त्यांची फाइल चाैकशीसाठी औरंगाबादला पाठवण्यात आली आहे. आता भवरे कुटुंबीयांना नेहमी औरंगाबादचे कारण दाखवले जाते आहे. चौकशीसाठी पुढाकार घेणारे कुणीच नसल्यामुळे त्यांची माेठी फरफट होते आहे.

लवकरच करणार चौकशी
ममता तायडेप्रकरणाची चौकशी लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. काही दिवसांत चौकशीचा अहवाल देण्यात येईल. तर तन्मय भवरे या मुलाची चौकशी औरंगाबाद येथे होणार आहे. त्यामुळे जळगावातून याबाबतीत काहीच सांगता येणार नाही.
- डॉ.किरण पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव
बातम्या आणखी आहेत...