आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेमिस्टर तोंडावर असूनही सामाजिक शास्र विभागात प्राध्यापकांची वानवा, एकही दिवस वर्ग नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मुंबई विद्यापीठाच्या निकालांचा घोळ सुरू असतानाच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सावळा गोंधळही चव्हाट्यावर आला आहे. पहिली सेमिस्टर तोंडावर असूनही उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र प्रशाळेतील एमए ( प्रथम), एमए (द्वितीय) वर्षांचे अभ्यासक्रम शिकवण्यासाठी प्राध्यापकच उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थी चांगलेच अडचणीत आले आहेत. दरम्यान, सेमिस्टरचे परीक्षा अर्ज भरण्याची मुदत सुरू झाली असून विद्यार्थ्यांचे अद्याप एक दिवसही वर्ग झालेले नाहीत.
 
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सामाजिकशास्त्र प्रशाळेत इतिहास, अर्थशास्र, मानसशास्र, डाॅ.आंबेडकर विचारधारा, समाजकार्य, समाजशास्र, स्री अभ्यास, कला मानव्य प्रशाळेतील संगीत, संरक्षणशास्त्र अशा सुमारे १४ विभागांमध्ये ३०० मुले प्रवेशीत आहेत. मात्र, या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्राध्यापक उपलब्ध नाहीत. तासिका तत्त्वावरील काही प्राध्यापकांची मुदत संपल्यामुळे त्यांना तीन महिन्यांपूर्वी कमी करण्यात आले आहे. त्यानंतर विद्यापीठाने ही पदेच भरली नाहीत. नियमित प्राध्यापक भरतीवर बंदी असल्यामुळे तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांकडूनच हे अभ्यासक्रम शिकवले जातात. यात काही विभागांसाठी बोटावर मोजण्याइतकेच नियमित प्राध्यापक आहेत. पण त्यांना सर्व विषय शिकवणे शक्य नाही. त्यासाठी तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची मदत घेतली जाते.
 
आता प्राध्यापकच नसल्यामुळे गेल्या महिनाभरापासून विद्यार्थी नियमित येऊन देखील त्यांना शिकवले जात नसल्याचे चित्र आहे. विद्यार्थी विद्यापीठात येऊन केवळ हजेरी लावत आहेत. वर्ग होत नसल्यामुळे काही वेळ थांबल्यानंतर त्यांना घरी जावे लागते. विद्यापीठ प्रशासनाच्या उदासिनता असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा प्रकार विद्यापीठात घडतो आहे. या प्रकारामुळे विद्यार्थीदेखील अचंबित झाले आहेत.
 
कंत्राटी प्राध्यापक भरतीच्या मुलाखती घेण्याची प्रक्रियादेखील अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या नियुक्त्या होऊन रुजू हाेण्यासाठी आणखी बराच वेळ जाणार आहे. ताेपर्यंत पहिल्या सेमिस्टरची परीक्षा सुरू होण्याची भीती विद्यार्थ्यांना वाटते आहे. राज्यभरातील सर्व विद्यापीठांमध्ये नियमित प्राध्यापक भरतीवर सध्या बंदी आहे. त्यामुळे राज्यभरात काही अभ्यासक्रमाची स्थिती बिकट झाली आहे.
 
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने मुंबई विद्यापीठातील काही अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका तपासण्याची तयारी दाखवली अाहे. त्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठानेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी पत्रव्यवहार केला आहे. राजधानीच्या विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासण्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये अभ्यासक्रम शिकवण्यासाठी प्राध्यापक उपलब्ध नाहीत. तरीही मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासण्याची तयारी दाखवल्याने विरोधाभास निर्माण झाला आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
 
विद्यापीठाने मुदत संपलेल्या कंत्राटी, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना कमी केल्यानंतर शहरातील काही सामाजिक शैक्षणिक संघटनांनी कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांची भेट घेऊन निवेदने दिली आहेत. या प्राध्यापकांना कायमस्वरूपी घ्या किंवा त्यांची मुदत वाढवून देण्याची मागणी संघटनांनी केली आहे. या मागण्यांनाही आता जवळपास दोन-तीन महिने उलटलेले आहेत. तरीदेखील त्यावर काहीच कार्यवाही झालेली नसल्यामुळे अखेर आता अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर देखील प्राध्यापक उपलब्ध नसल्याची परिस्थिती विद्यापीठासमोर ठाकली आहे.
 
अतिरिक्त भार पडणार
यंदाविद्यापीठाने तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या संख्येतही घट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निवड होणाऱ्या प्राध्यापकांवर अतिरिक्त भार पडणार आहे. सलग तीन वर्ष नियुक्त प्राध्यापकांना पुन्हा मुलाखतीला सामोरे जावे लागणार आहे. पुन्हा नियुक्ती होणार या आशेवर काही कंत्राटी प्राध्यापक प्रवेशप्रक्रियेत सहभागी होतात. खासगी संस्थांमध्ये अशाच प्रकारची विभागणी केलेली असते.
 
सामाजिकशास्त्रे प्रशाळेततासिका तत्त्वावर प्राध्यापक घेतले जाणार आहेत. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आठ दिवसांत प्राध्यापकांची पदे भरली जाणार आहेत.
- प्रा.पी.पी.पाटील,कुलगुरू, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
 
बातम्या आणखी आहेत...