आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार पुत्राचा महामार्गावर अपघात झाला त्याच ठिकाणी आणखी ३ बळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महामार्गावरील खड्डा वाचवताना बांभाेरीजवळील जैन इरिगेशन कंपनीत रात्रपाळी साठी कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तिघांना जीव गमवावा लागल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या दुर्दैवी घटनेमुळे शनिवारी एकाच वेळी तीन अंत्ययात्रा निघाल्याने पिंप्राळ्यात शोककळा पसरली होती..विशेष म्हणजे चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांचा मुलगा आदर्श याचाही महामार्गावरील याच ठिकाणी अपघाती मृत्यू झाला होता.महामार्ग प्राधिकरणाने अद्यापही त्या ठिकाणी डागडुजी केलेली नाही.

जैन इरिगेशनच्या प्लास्टिक पार्क प्राेसेसिंग विभागात कामाला असलेले निवृत्ती भागवत पाटील (वय ४५), संताेष कहारू काेळी (वय ४०, दाेघे रा. पिंप्राळा), निवृत्ती विक्रम महाजन (वय ३५, मूळ रा. खर्ची, ह. मु. पिंप्राळा) यांची शुक्रवारी रात्रपाळी हाेती. यासाठी ते पिंप्राळा येथून दुचाकीने (क्र. एम एच-१९-एफ-४७४६) बांभाेरी येथील कंपनीत चालले हाेते. रात्री ११.४० वाजता जैन इरिगेशनच्या समाेर असलेल्या महामार्गावरील माेठा खड्डा वाचवताना त्यांचा ताेल गेल्याने तिघे रस्त्यावर फेकले गेले. याचवेळी मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने तिघांना चिरडले. त्यातील एक जण जागीच ठार झाला, एकाचा उपचारासाठी शहरात घेऊन जाताना रस्त्यात मृत्यू झाला. तिसऱ्याचा डाॅ. सुनील नाहटा यांच्या हाॅस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.शुक्रवारी रात्री ११.४० वाजेच्या सुमारास तीन कर्मचाऱ्यांचा ज्या ठिकाणी अपघात झाला. त्या ठिकाणी माेठा खड्डा पडलेला अाहे. गुरुवारी शिव कॉलनीच्या धोकादायक स्टॉपजवळ साइडपट्ट्यांमुळे निवृत्त उपप्राचार्याचा नाहक बळी गेला होता. दुसऱ्याच दिवशी हा अपघात झाला.

अपघाताची तीच जागा, तीच पद्धत
गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात आमदार सोनवणे यांचा धाकटा मुलगा आदर्शचा बांभोरीजवळील याच भागात खड्डा टाळताना तोल जाऊन अपघाती मृत्यू झाला होता.शुक्रवारी मध्यरात्री या दुर्देवी कर्मचाऱ्यांचाही खड्डा टाळताना तोल जाऊन अपघात झाला.
एकाचवेळी दाेन अंत्ययात्रा
जैन इरिगेशनचे कर्मचारी निवृत्ती पाटील, संताेष काेळी हे अपघातात ठार झाले. शनिवारी दुपारी वाजेच्या सुमारास पिंप्राळ्यातील एकाच गल्लीतून दाेन मित्रांची अंत्ययात्रा निघाली. तसेच निवृत्ती महाजन यांच्यावर त्यांच्या मूळ गावी खर्ची येथे अंत्यतसंस्कार करण्यात अाले.

पिंप्राळा नगरसेवकाचीही मदत
पिंप्राळापरिसराचे नगरसेवक अमर जैन यांनी तिन्ही मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत दिली. या वेळी पाेलिस पाटील विष्णू पाटील, माजी नगरसेवक मंगलसिंग पाटील उपस्थित हाेते. पिंप्राळा परिसरातील अनेक जण जैन इरिगेशनमध्ये कामाला अाहेत. त्यांच्यासाठी बसच्या सुविधेचीही मागणी कंपनीकडे केली अाहे.

कंपनीच्या अधिकाऱ्यांवर नाराजी
अपघातातील तिघांचे मृतदेह शनिवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात अाणले. त्या वेळी कुटुंबीयांनी अाक्राेश केला. तसेच गावकऱ्यांनी गर्दी केली होती. कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला तरीही कंपनीचा एकही अधिकारी अाला नव्हता. त्यामुळे मृताच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त करीत काही काळ गाेंधळ घातला. काही वेळानंतर अालेले कंपनीचे व्यवस्थापक चंद्रकांत नाईक यांना संतप्त कर्मचाऱ्यांनी घेराव घातला. मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर कंपनीचे जनसंपर्क अधिकारी फारूख शेख तसेच एस. एन. पिंपळापुरे यांनी मृताच्या नातेवाइकांची समजूत काढली.

कंपनीकडून एक लाखाची मदत
अपघातातील मृत निवृत्ती पाटील, संताेष काेळी यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी राेख २० हजार अाणि ८० हजार रुपयांचे धनादेश तसेच निवृत्ती महाजन यांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची राेख मदत कंपनीच्या वतीने या वेळी व्यवस्थापक चंद्रकांत नाईक, फारुख शेख यांनी जाहीर केली. तसेच अपघात विमा अाणि भविष्यनिर्वाह निधीची रक्कम तत्काळ देऊ, असे आश्वासनही कंपनीकडून देण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...