जळगाव - शहरातील विविध नागरी समस्यांपेक्षा थेट जीवन-मरणाशी संबंधित असल्याने समांतर रस्त्यांची समस्या प्राधान्याने सोडवली पाहिजे, या मागणीसाठी विविध ६० सामाजिक संस्था, संघटनांनी सहभाग नोंदवत शनिवारी सायंकाळी जयप्रकाश नारायण चौकात सभेचे आयोजन केले होते.
महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे, डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यासह नागरिकांची या वेळी मोठी उपस्थिती होती. फारुख शेख यांनी एक नागरिक मंचच्या माध्यमातून कृती समिती तयार करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
बंटी नेरपगार यांनी समांतर रस्ते होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला. सरिता माळी यांनी महिलांनी लोकप्रतिनिधींच्या दारी जाऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला. पीयूष पाटील यांनी लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली. प्रा. वकार शेख यांनी अपघातावेळी तत्काळ मदतीसाठी पुढे यावे, अशी सूचना केली. हेमंत बोरा यांनी लोकप्रतिनिधींना गुलाबाचे फूल देण्याची सूचना मांडली. पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप तिवारी यांनी सूत्रसंचालन करत प्रास्ताविकही केले. विराज कावडिया यांनी आभार मानले.
आंदोलनाची मालिका सुरू करा : शंभू पाटील
महामार्गाचा विषय केंद्राच्या अख्यतारीत आहे. यासंदर्भात
आपले खासदार कधीच बोलत नाहीत; लोकप्रतिनिधी त्यांचे काम प्रामाणिकपणे करत नाहीत. नगरसेवक कैलास सोनवणे यांनी मंत्री गिरीश महाजनांकडे पाठपुरावा करावा. मंचच्या माध्यमातून एकत्रित येऊन नागरिकांनी आंदोलन करून ताकद दाखवून द्यावी. १० मिनिटे महामार्ग बंद केला तरी शासनाला जनतेची ताकद कळेल.
महापालिकेने व्यवस्था करणे शक्य : प्रा. डी.डी.बच्छाव
पैसे नाहीत, हे महापालिकेचे रडगाणे चुकीचे आहे. वर्षभरात महापालिकेला विविध मार्गांनी १५० कोटी रुपयांवर कर मिळतो. यातून रस्ते विकसित केले पाहिजे. नाशिकमध्ये महापालिकेनेच समांतर रस्ते केले आहेत. जास्त नको; परंतु नागरिकांकडून घेतात तेवढे पैसे तरी समांतर रस्त्यांवर खर्च करावेत. महामार्गालगतच्या प्रत्येक घराचे रस्ते थेट महामार्गाला जोडले आहेत. कंपाउंड करून ते बंद केले पाहिजेत.
लोक प्रतिनिधींना घेराव घालू : अश्विनी देशमुख
महामार्ग माणसे गिळणारा बकासुर आहे. महामनस्ताप मार्ग अशी त्याची ओळख झाली आहे. समांतर रस्त्यांची जबाबदारी महामार्ग प्राधिकरणाची आहे. एका जनहित याचिकेवर उत्तर देताना तत्कालीन आयुक्तांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले होते; परंतु मालकी प्राधिकरणाकडेच आहे. आपले भांडण दिल्लीशी असल्याने त्यादृष्टीने पाठपुराव्याचे नियोजन करू.
साखळी उपोषण करून लोकप्रतिनिधींना घरी जाऊन घेराव घालण्याचे आंदोलन करू. महापालिकेचे अधिकारी गोपाळसिंग राजपूत यांचा मुलगा लग्नाच्या १५ दिवसआधी महामार्गावर अपघातामध्ये मृत झाला.
‘तिरडीवर नवरदेव सजला...’
हे त्यांचे शब्द अजूनही हृदयात घर करून आहेत. ही परिस्थिती बदलल्याशिवाय माघार घ्यायची नाही. हे आंदोलन समांतर रस्ते होईस्तोवर थांबणार नाही : सचिन नारळे
नागरिकांनी एकजूट होऊन एका चांगल्या आणि ज्वलंत विषयाला हात घातला आहे. युद्धातील हुतात्म्यांपेक्षाही अधिक लोक देशांत अपघातांमध्ये मृत्युमुखी पडत आहेत. समांतर रस्त्यांसाठी कृती समिती स्थापन करावी. ही चळवळ शहरात आदर्शवत चळवळ म्हणून उभी राहिली पाहिजे.
पाठ पुरावा करू : डॉ. प्रताप जाधव
समांतर रस्ते, महामार्गासंदर्भात घोषणा झाल्या; परंतु योग्य पाठपुरावा झाला नाही. लोकसहभाग तयार झाल्याने आता आपण समांतर रस्त्यांसाठी पाठपुरावा करू. राजकीय इच्छाशक्ती, लोकसहभाग आणि प्रशासन एकत्र आले तर आपले काम लवकर होईल. अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. दर सेकंदाला एकाचा मृत्यू होत असल्याची स्थिती आहे.
ढिम्म प्रशासनाला वठणीवर आणू : अॅड. सुचिता हाडा
लोक प्रतिनिधी आणि नागरिकांनी एकत्रित येऊन ढिम्म प्रशासनाला वठणीवर आणण्याची वेळ आली आहे. या आंदोलनात एकत्रित येऊन समांतर रस्त्यांसाठी पाठपुरावा करून आंदोलन करू. बायपासने प्रश्न सुटणार नाही.
समांतर रस्तेच हवेत : अनंत जोशी
बायपासमुळे शहरातील केवळ २० टक्के वाहतूक बाहेरून जाईल. शहरातून होणारी अवजड वाहतूक सुरूच राहील. तिकडे काय करायचे ते करा; पण आधी शहरात समांतर रस्ते हवे आहेत. खासदार ए. टी. पाटलांची दुसरी टर्म आहे. त्यांना अपघातांमध्ये मृत्यू पावणारे दिसत नाहीत का? लोकप्रतिनिधी खुनी आहेत.
तामिळनाडूमध्ये बैलांच्या शर्यतीसाठी लोक रस्त्यावर येतात, कुत्रे मारू नये म्हणून शासन लक्ष घालत असल्याचे उदाहरण आहे; परंतु महामार्गावर मरणाऱ्या लोकांबाबत कुणालाच काही वाटत नाही, हे दुर्दैव आहे. मेणबत्त्या लावून प्रश्न सुटणार नाहीत. आता रस्ते होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील.
महामार्ग बंद करावा लागेल : मुकुंद सपकाळे
अर्ज,विनंत्या करून प्रश्न सुटणार नाहीत. नागरिकांनी एकात्रित येऊन एक दिवसासाठी बंद केला तर खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील पळत येतील. आंदोलनाशिवाय प्रशासनाला जाग येत नाही.
लग्नाआधीच बारसे; दिल्लीत वधू शोधणार : गजानन मालपुरे
केंद्रीय मंत्र्यांनी वर्षभरापूर्वीच १६,२५० कोटींच्या कामांचे भूमिपूजन केले. लग्नाआधीच बारसे करण्याचा हा प्रकार होता. यात वधू कोठे आहे? हे शोधण्यासाठी दिल्लीत जाऊ. महिन्यांत समांतर रस्ते केले नाहीत तर मंत्र्यांना झोपू देणार नाही. पुढचे आंदोलन केवळ तरुणांचे असेल. शासनाला वठणीवर आणू.
मेहरूण तलाव केला, महामार्ग का नाही? : मनोज चौधरी
महापालिकेने लोकसहभागातून मेहरूण तलावाचे काम केले तसे महामार्गाचेही होऊ शकते. आंदोलन सुरू ठेवून दुसऱ्या बाजूने नागरिकांना सोबत घेऊन साइडपट्ट्या, समांतर रस्त्यांचे काम सुरू करू. गणेश मंडळांनी मुरूम द्यावा. डीपीडीसीतून निधी मिळाला तर उर्वरित कामे होतील. महापालिकेने महामार्गावरचे अतिक्रमण काढून द्यावे.
मुख्यमंत्र्यांची तयारी : कैलास सोनवणे : समांतर रस्त्यांची जागा प्राधिकरणाकडे आहे. ती आपल्या ताब्यात घेतल्यास मुख्यमंत्री समांतर रस्त्यांसाठी निधी देण्यास तयार आहेत. यासंदर्भात जलसंपदामंत्री गिरीश महाजनांशी बोलणे झाले आहे. तांत्रिक बाबी पूर्ण करून पाठपुरावा करू. महापालिकेने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.
पुढील स्लाईडवर वाचा सविस्तर बातमी ...