आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हद्दवाढीत एन.ए. जमिनी घेतल्या जातील ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- महापालिकेच्या हद्दवाढीसाठी एन.ए. जमिनींची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी मागवली अाहे. मुळात शहरालगतची केवळ चार गावंाचीच नाेंद जिल्हाधिकाऱ्यांनी अहवालात केली अाहे. मात्र, भविष्याचा विचार करता काही एन.ए.क्षेत्र समावेश करण्याच्या सूचनेप्रमाणे त्या क्षेत्राची माहिती मागवण्यात आली आहे.

महापालिकेची प्रथमच हद्दवाढ होणार आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढावे याकरिता हद्दवाढ करण्याचा हेतू होता. मात्र, महापालिकेची आर्थिकस्थिती पाहता, या हद्दवाढीनंतर विस्तारलेल्या क्षेत्रासाठी नागरी सुविधा देणे शक्य होणार नाही, असे दिसते. शहरातच या सुविधा पूर्णपणे देता येत नसताना, नवीन रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन या सुविधांवर कोट्यवधी रुपयांवर खर्च अपेक्षित आहे. त्यामानाने कर रूपातून हा खर्च भागवणेही सध्या तरी शक्य नाही. महापालिकेत जी १६ गावे प्रस्तावित होती. त्यातील बरीच गावे ही महापालिकेपासून पाच ते सात किलोमीटर अंतरावर आहेत. यावर सुनावणी जिल्हाधिकाऱ्यांकडे झाल्यावर त्यांनी त्यांच्या अहवालात या बाबी नमूद करीत केवळ महापालिकेच्या हद्दीला लागून असलेले वाडीभोकर, वलवाडी, महिंदळे, नकाणे या गावांचाच समावेश करणे योग्य होईल, असा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला होता. त्यानंतर या चार गावांव्यतिरिक्त शहराजवळी गावांचे बिगर शेती क्षेत्र किती आहे. त्यावर भविष्यात नागरी वसाहत होऊ शकते ते महापालिकेच्या कक्षात येऊ शकतात. अशा भागांचा समावेश करण्यात यावा, त्यादृष्टीने तपासणी करून त्याचा अहवाल शासनाकडे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवायचा आहे. त्याप्रमाणे शहराच्या परिसरात या गावाजवळील एन.ए. बिगर शेतीक्षेत्र किती आहे. याची माहिती जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी संबंधितांकडून मागवली आहे. त्याकरिता तलाठी, ग्रामसेवक, तहसील कार्यालयाच्या यंत्रणेकडून ही माहिती मागवण्यात येऊन त्याचा अंतिम अहवाल तयार करून ताे शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर शासनस्तारावर हद्दवाढीची अंतिम अधिसूचना निघू शकेल. जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल एप्रिल महिन्याच्या अंत मध्ये पाठवला जाईल.

गावांची संख्या झाली कमी
महापालिकेची हद्दवाढीची अधिसूचना निघाल्यावर त्यावर सुरुवातीला सोळा गावांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे शहराचे क्षेत्रफळ एकदम दुप्पट वाढून नागपूर शहराएवढे झाले होते. मात्र, शहराची लोकसंख्या, िवकासाचा वेग यांचा विचार करता; एवढ्या गावांचा समावेश भौगोलिकदृष्ट्या तसेच व्यावहारिक दृष्टिकोनातूनदेखील योग्य होणार नसल्याने कमी होऊन चार गावांपर्यंत तो आला आहे. त्यामुळे उर्वरित गावांना दिलासा मिळाला असल्याचे चित्र दिसते.

औद्योगिक वसाहत स्वतंत्रच
महापालिकेच्या हद्दीत अवधान औद्योगिक वसाहतीचा समावेश करण्याचा महापालिकेचा प्रयत्न होता. मात्र, औद्योगिक वसाहत तशी स्वतंत्र आहे. त्याचे महामंडळ असून त्याद्वारे कर घेऊन त्याभागात रस्ते, दिवे, पाणीपुरवठा आदी सोयी करण्यात येतात. त्यात अजून महापालिकेच्या कराचा भुर्दंड बसला असता. मात्र, हद्दवाढीत अवधान क्षेत्र त्याकरिता सध्यातरी वगळले आहे. मनपाचे आर्थिक उत्पन्न बुडीत असले तरी उद्योग क्षेत्रांवर अद्यापही मोकळीक देण्यात आली आहे. त्याचाही फटका बसतो.

मनपालगतची चार गावे
महापालिका होऊन साधारणपणे १५ वर्षांचा कालावधी उलटला आहे. या कालावधीत शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला. शहराबाहेरील जागेवर वसाहती िनर्माण हाेऊन त्या थेट शेजारील गावांच्या क्षेत्रापर्यंत भिडल्या त्यामुळे गाव, शहराची सीमारेषा पुसट झाली. याकरिता त्यांचा दैनंदिन सर्व संपर्क महापालिकेच्या कक्षात आल्याने ही गावे हदद्दवाढीत समावेशाची शिफारस आहे.