आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दागिने, रोख रकमेसह दुचाकी घेत चोरटे पसार; धुळे तालुक्यातील मोघण येथे घडलेला प्रकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- तालुक्यातील मोघण येथील शेतकऱ्याच्या घरातून रोख रक्कम, दागिने चोरल्यानंतर चोरटे शेतकऱ्याची दुचाकी घेऊन पसार झाले. या प्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरमालक अथवा इतरांनी पाठलाग करू नये तसेच पळ काढण्यास अडचणी येऊ नये यासाठी मोटारसायकलही लांबविण्यात आली असल्याचा अंदाज पोलिसांचा आहे. 
 
धुळे तालुक्यातील मोघण गावात दिलीप श्यामराव पाटील (वय ५३) हे राहतात. उकाडा जाणवत असल्यामुळे काल शुक्रवारी रात्री पाटील कुटुंबीय झोपण्यासाठी घराच्या गच्चीवर गेले होते. ही संधी साधून जिन्यावाटे चोरटे त्यांच्या घरात आले. त्यानंतर त्यांनी कपाट इतर ठिकाणी ठेवलेले दागिने एक लाखाची रोख रक्कम लांबविली. पीकविम्याचा हप्ता भरण्यासाठी पाटील यांनी ही रक्कम आणली होती. मध्यरात्री बारा ते शनिवारी सकाळी सात वाजेदरम्यान हा प्रकार घडला. सकाळी घटना उघडकीस येताच मोहाडी पोलिसांना कळविण्यात आले. पोलिस ठाण्यात जाण्यासाठी पाटील कुटुंबीय वाहन शोधत असताना तेही चोरट्यांनी लांबवल्याचे समोर आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मोहाडी पोलिस ठाण्याचे पथक काही वेळाने दाखल झाले. याशिवाय पोलिस मुख्यालयातून श्वानपथक ठसेतज्ज्ञांना बोलावण्यात आले. त्यांनी चोरट्यांचा पुरावा शोधण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला; परंतु चोरट्यांचा सुगावा लागला नाही. या प्रकरणी दिलीप पाटील यांच्या तक्रारीवरून मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चोरीस गेलेले दागिने, रोख रक्कम मोटारसायकल यांची किंमत पोलिसांनी एक लाख ८४ हजार रुपये आकारली आहे. सहायक पोलिस निरीक्षक शिरसाठ या घटनेचा पुढील तपास करत आहेत. अशी माहिती देण्यात आली. 
 
चोरटे होते अधिक 
पोलिसांच्या वीरू या श्वानाने पाटील यांच्या घरापासून काही अंतरापर्यंत चोरट्यांचा माग काढला; परंतु यानंतर श्वान घुटमळत राहिले. घरात काही ठिकाणी चोरट्यांच्या हातांचे ठसे पोलिसांना मिळून आले आहेत. एकंदरीत सर्व घटना पाहता या चोरीमागे एकापेक्षा अधिक चोरट्यांचा समावेश असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. 
 
प्रश्न आहे अनुत्तरित 
पाटील कुटुंबीय झोपेत असताना ही चोरी झाली. चोरट्यांनी जिन्यावाटे घरात जाण्यासह दरवाजाचे कुलूप तोडणे, घरातील कपाट उघडण्यासह पुन्हा घराबाहेर येऊन मोटारसायकल सुरू करेपर्यंत पाटील कुटुंबीयांना चोरट्यांची चाहूल लागली नाही. याचे कारणही पोलिसांना तपासात शोधावे लागणार आहे. चोरीचा हा घटनाक्रम पाहता या चोरीमागे सराईत चोरट्यांचा हात असल्याचे दिसते. शिवाय कोणतीही भीती बाळगता अगदी सहजपणे चोरट्यांनी घरात हातसफाई केल्यानंतर मोटारसायकलही लांबविली. या घटना पाहता चोरट्यांची हिंमत वाढल्याचे दिसते. 
बातम्या आणखी आहेत...