आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे : 39 दिवसांच्या आंदोलनानंतर कुणाल बारचे अतिक्रमण 10 तासांत जमीनदोस्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुणाल बारची इमारत जेसीबीच्या साहाय्याने पाडण्याची सुरू असलेली कारवाई. - Divya Marathi
कुणाल बारची इमारत जेसीबीच्या साहाय्याने पाडण्याची सुरू असलेली कारवाई.
धुळे - शहरातील नकाणे रोडवरील उच्चभ्रू वसाहतीत सुरू असलेला कुणाल बार अखेर मंगळवारी जमीनदोस्त करण्यात आला. अतिक्रमण काढण्यासाठी सुमारे दहा तास लागले. हा बार हटवण्यात यावा यासाठी परिसरातील महिलांचे सलग ३९ दिवसांपासून आंदोलन सुरू होते. बार जमीनदोस्त झाल्याने महिलांच्या आंदोलनाला यश आले आहे. दरम्यान, अतिक्रमण काढताना कोणताही अनुचित प्रकार घडला नाही; परंतु खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या कारवाईचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले आहे. अखेरपर्यंत जिल्हा प्रशासनातील अधिकारी या ठिकाणी फिरकले नाही. त्यामुळे नाराजीही व्यक्त होत आहे. 
 
शहरातील उच्चभ्रू वसाहतीमध्ये नकाणेरोड परिसराचा समावेश होतो. या ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून कुणाल बिअरबार सुरू होता. हा बार बंद करण्यात यावा या मागणीसाठी परिसरातील महिलांनी आंदोलन सुरू केले. नगरसेवक कमलेश देवरे नगरसेविका वैभवी दुसाने यांनी या आंदाेलनाचे नेतृत्व केले. गेल्या आठवड्यात कुणाल बारच्या मालकांना बारचे अतिक्रमण हटवण्यात यावे, अशी नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी सकाळी साडेसहा वाजेपासून बारचे अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली. दोन जेसीबी एक पोकलॅण्ड मशीनच्या साहाय्याने अतिक्रमण काढण्यात आले. या वेळी महापालिका, राज्य उत्पादन शुल्क तहसील कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. या वेळी स्थानिक नागरिकांनी कारवाई पाहण्यासाठी घरांच्या छतावर गर्दी केली होती. खबरदारीचा उपाय म्हणून पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. तसेच नकाणे रोडवरील वाहतूक काही वेळेसाठी बंद करण्यात आली होती. कारवाई वेळी हॉटेल मालक एका बाजूला उभा होता. सुरुवातीला बारचा दर्शनी भाग जेसीबीने पाडण्यात आला. त्यानंतर मुख्य शटर ग्रिलजवळील भिंत तोडण्यात आली. 
 
दुसऱ्या बाजूने नकाणे रोडवर पोकलॅण्ड मशीननेही अतिक्रमण पाडण्यास सुरुवात झाली. अतिक्रमण काढल्यानंतर विटांचा खच जेसी0बीच्या मदतीने ट्रॅक्टरमध्ये भरून इतरत्र नेण्यात आला. तसेच लोखंडी खिडक्या, जिना तसेच इतर साहित्य सुरक्षित स्थळी नेण्यात आले. दहा तासांच्या कारवाईनंतर हे बांधकाम पूर्णत: काढण्यात आले. 
 
नियमांचे पालन आवश्यक 
नकाणे रोड परिसरातील शांतता धोक्यात येऊ नये या उद्देशाने बार हटवण्यात यावा, अशी मागणी सातत्याने होत होती. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. कुणाच्याही उपजीविकेवर परिणाम व्हावा हा आंदोलनाचा उद्देश नव्हता. या कारवाईचे श्रेय नागरिकांचे आहे. स्थानिक नागरिकांच्या एकजुटीचा हा विजय आहे.
-कमलेशदेवरे, नगरसेवक, धुळे. 

अधिकारी आलेच नाही 
आंदोलकांनी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना जून रोजी निवेदन दिले होते. त्यानंतरही जिल्हाधिकारी पांढरपट्टे आंदोलन स्थळाकडे फिरकले नाही. निदान एकदा तरी त्यांनी येऊन पाहणी केली असती तर दिलासा मिळाला असता, अशा शब्दांत परिसरातील महिलांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान,एखादे दारूचे दुकान हटविण्यासाठी महिलांनी प्रथमच प्रदीर्घ लढा दिला.

चौपाटी नंतर बिअरबार 
गेल्या महिन्यात वादग्रस्त असलेल्या पांझरा चौपाटीचे अतिक्रमणही पहाटे काढण्यात आले होते. ही कारवाई २१ जून रोजी झाली होती. त्यानंतर कुणाल बारचे अतिक्रमणही पहाटे काढण्यात आले. चौपाटीप्रमाणेच बारचाही विषय दिवसभर नागरिकांच्या चर्चेचा ठरला आहे. 

रात्रीतून हलवला मद्यसाठा 
अतिक्रमण काढण्याबाबत प्रशासनाने यापूर्वीच नोटीस दिली होती. नोटिशीची मुदत काल सोमवारी संपली. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून कारवाई अटळ मानली जात होती. कारवाई होणार असल्यामुळे बिअरबारमधील मद्यसाठा रात्रीतून इतरत्र हलवण्यात आला होता. त्यासाठी संबंधितांनी प्रशासनाची परवानगी घेतली होती, अशी माहिती देण्यात आली. 

काय घडले ४० दिवसांत 
कुणालबार हटवण्यात यावा या मागणीसाठी जूनपासून सनदशीर मार्गाने सुरू आंदोलन सुरू करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून बारसमोर महिलांनी भजन आंदोलन सुरू केले होतेे. काही दिवस पावसातही आंदोलन झाले. या बार विषयी जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रारीही झाल्या. ज्येष्ठ नागरिक काही संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. मधल्या काळात बिअरबार अतिक्रमित असल्याचे समोर आले. या विषयी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत तक्रार झाली होती. बार हटवण्यासाठी मतदान करण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. 
बातम्या आणखी आहेत...