आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू दुकाने वाचवणाऱ्या रस्ते हस्तांतरणाला विरोध; आखाजीच्या मुहूर्तावर १० हजार नागरिकांची स्वाक्षरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव -  महामार्ग दारूबंदीला पाठिंबा आणि म्हणूनच शहरातील सहा रस्त्यांच्या हस्तांतरणाला कडवा विरोध दर्शवून जळगावकर नागरिकांनी यंदाची अक्षय्य तृतीया साजरी केली. तिजोरीत खडखडाट असलेल्या महापालिकेच्या गळ्यात टाकलेले सहा रस्ते पुन्हा शासनाकडे वर्गीकृत करावेत, यासाठी शुक्रवारी जळगाव फर्स्टसह ३० संस्था, संघटनांनी शहरात घेतलेल्या स्वाक्षरी मोहिमेस उदंड प्रतिसाद मिळाला. डॉक्टर,वकील, अभियंते,ज्येष्ठ नागरिक, तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपल्या प्रखर भावनाही व्यक्त केल्या.
 
जातीपाती,धर्माच्या भिंती ओलांडून जळगावकर नागरिक या शुभकार्यासाठी पुढे आले. महिलांनी हिरिरीने पुढाकार घेत या स्वाक्षरी मोहिमेला प्रचंड प्रतिसाद दिला. सकाळपासून सुरू असलेल्या मोहिमेत सहभागी होत स्वाक्षऱ्यांचा १० हजारांचा पल्ला गाठला. विशेष म्हणजे आमदार, महापौरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा व्यक्त केला. दरम्यान, महापालिकेची शनिवारी महासभा होत असून या महासभेत रस्ते हस्तांतरण रद्द करण्याबाबत सर्वपक्षीय नगरसेवक काय भूमिका घेतात? याकडे आता शहराचे लक्ष लागून आहे. सर्वोच्च न्यायालयाने महामार्ग राज्यमार्गापासून ५०० मीटरच्या आत येणारी सर्व दारू दुकाने परमिट रूम बंदचा आदेश दिला. त्यानंतर राज्य शासनाने ३१ मार्च रोजी शहरातील रस्त्यांचे महापालिकेकडे हस्तांतरण करण्याचा निर्णय घेतला होता. जळगावातील लोकप्रतिनिधींनी खास पुढाकार घेत हा निर्णय घेण्यास राज्य शासनाला बाध्य केले होते. त्यामुळे शहरातील ४५ दारू दुकाने परमिट रूमला अभय मिळाल्याचे उघड झाले. त्यानंतर भाजप सरकार दारू विक्रेत्यांसाठी तडकाफडकी निर्णय घेत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त झाली होती. याच पार्श्वभूमीवर जळगाव फर्स्टचे अध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. तसेच जळगाव फर्स्ट या संघटनेच्या नेतृत्वात शुक्रवारी सकाळी ते सायंकाळी या वेळेत शहरातील ३० पेक्षा जास्त ठिकाणी सामाजिक संघटनांनी वेगवेगळ्या भागात स्वाक्षरी मोहीम राबवली. एका दिवसाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी स्टॉलवर येऊन उत्स्फूर्तपणे स्वाक्षरी केल्या. क्रीडा संकुलाजवळील केंद्रावर 
 
मुस्लिम बहुल भागातूनही मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद 
जळगाव फर्स्टच्या स्टॉलवर उपस्थित आमदार सुरेश भोळे, महापौर नितीन लढ्ढा, डॉ. राधेश्याम चौधरी. दुसऱ्या छायाचित्रात स्वाक्षरी करताना महिला. 

जळगाव फर्स्ट आणि मुस्लिम समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मेहरूण परिसरातील अक्सानगर भागात स्वाक्षरी मोहिमेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुस्लिम समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष अश्फाक पिंजारी,फहिम पटेल यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नागरिकांना विषय समजावून सांगत स्वाक्षरी मोहिमेत सहभागी करून घेतले. जमीयत उलेमा हिन्द जळगावतर्फे जुन्या मेहरूणमधील मास्टर कॉलनी, अल मन्नान रजा कॉलनी, मलिकनगर परिसरातील मशिदींजवळ स्वाक्षरी घेण्यात आल्या. यासाठी मुफ्ती अतिक (अध्यक्ष), रागिब अहमद (सचिव), मुफ्ती खालिद (शहराध्यक्ष), मौलवी एजाज हाफिज शफी पिरजादे यांनी नियोजन केले. 

संपूर्ण राज्यामध्ये दारूबंदीची मागणी करणाऱ्या आमदार भोळे यांनी आधी आपले स्वत:चे दारूचे दुकान बंद करावे, असे आव्हान जळगाव फर्स्ट संघटनेचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी यांनी दिले आहेत. आधी शहरातील ४५ दारू दुकाने वाचवण्यासाठी आमदार भोळे यांनी पुढाकार घेऊन सहा रस्ते मनपाकडे हस्तांतरण केले. आता दारूबंदीची मागणी करतात. हा प्रकार भोळे यांचे बिंग उघडे पाडणारा आहे. भोळे हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. त्यांनी विधीमंडळ सभागृहात प्रस्ताव मांडावा. एक तर राज्यभरातील महामार्ग, राज्यमार्ग इतर मार्ग ताबडतोब स्थानिक संस्थांना रस्ते हस्तांतरित करण्याची घाई सरकारने करायला नको होती. सर्वोच्च न्यायालय महामार्ग इतर मार्गावरील दारू दुकाने बंद करीत नव्हते तर ते ५०० मीटर स्थलांतरित करायला सांगत होते. राज्य सरकारने याचे पालन करताना परिणामांचा अभ्यास केला असता तर एकच पॉलिसी तयार झाली असती. जळगाव सारख्या शहरात एका रात्रीत सहा रस्ते मनपाकडे हस्तांतरित करणे गैर आहे, असे चौधरी म्हणाले. 

तांत्रिक अडचणी दूर करीत रस्ते दर्जाहीन करण्यात यावे यासाठी मी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रितसर विनंती केली होती. परंतु काही विरोधक अपप्रचार करीत असून सत्य जाणून घेता चुकीची माहिती पसरवित आहे. सध्या आरोप करणारे विरोधक हे विधानसभा निवडणुकीत स्वतःची अनामत देखील वाचविता आलेले उमेदवार असून इतर विरोधकांच्या मदतीने एकत्र येऊन बेछूट आरोप करीत आहे. स्वतःला मोठ करण्यासाठी दुसऱ्याला कमीपणा दाखवायचा आणि मीडिया ट्रायलचा उपयोग करण्याचा फंडा ते अवलंबत आहेत. शहर विकास हाच माझा पहिल्यापासून अजेंडा असून तो आजही कायम आहे, उद्याही तसाच राहणार. शासनाने दारू बंदी केल्यास त्या निर्णयाचे स्वागत करणारा मी पहिला व्यक्ती असेल. शहरात रस्ते दर्जाहीन करणे अथवा नाही असे राजकारण करण्याऐवजी दारूबंदी करण्याचा निर्णय घेतल्यास मी स्वागतच करेल. तसेच महासभेत जो निर्णय हाेईल त्याला माझा पूर्णपणे पाठींबा राहील असे, आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...