आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांची नजर, चुकवून विक्रेत्यांनी मद्यसाठा हलवला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेकडे वर्ग करण्यात अालेले सहा रस्ते पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय गुरुवारी झाला. त्यानंतर शुक्रवारी उत्पादन शुल्क विभागातर्फे सहा रस्त्यांवरील ४५ परमिट रूम, बिअरशॉपी, देशीदारूची दुकाने बंद करण्याची कारवाई करण्यात आली. एकीकडे उत्पादन शुल्क विभागातर्फे कारवाई सुरू असताना दुसरीकडे काही वाईन शाॅप चालकांनी अधिकाऱ्यांची नजर चुकवून दुकानातील हजारो लिटर दारूचा साठा इतरत्र हलवला. कारवाईनंतरही रात्री १० वाजेदरम्यान पाेलनपेठेत काही दारूची दुकाने सुरूच हाेती. 
राष्ट्रीय राज्य मार्गापासून ५०० मीटरच्या आत असलेली सर्व दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. या आदेशानुसार जळगाव शहर तालुक्यातील ४५ दारूची दुकाने प्रभावित झालेली होती. मात्र, या निर्णयापासून पळवाट काढण्यासाठी सहा रस्ते अवर्गीकृत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे या दुकानांना अभय मिळाले होते. आता ते सहा रस्ते महापालिकेकडून पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर  शुक्रवारी सहा रस्त्यांवरील दारूची दुकाने बंद करण्याची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे निरीक्षक संजय कोल्हे, उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील, महेंद्र सोनार लिलाधर पाटील यांच्या पथकाने केली. कारवाईत मद्यसाठ्याचा पंचनामा करून दुकाने त्वरित बंद केली. तर परमिट रूममधील मद्यसाठा गोडाऊनमध्ये सील करण्यात आला. दरम्यान, अधिकारी कारवाई करीत असल्याची बातमी पसल्यानंतर वाईन शाॅप चालकांनी तात्काळ दुकानातील मद्यसाठी इतरत्र हलवला. तर काहीनी कारवाई झाल्यानंतरही दुकाने उघडून मद्यसाठ्याची विल्हेवाट लावल्याचा प्रकार नजरेस पडला. 

जळगावफर्स्टच्या निवेदनानंतर कारवाई : शहरातीलसहा रस्त्यांवरील ४५ दारू दुकाने तत्काळ बंद करण्यात यावे, या मागणीसाठी शुक्रवारी जळगाव फर्स्ट जनआंदोलनात सहभागी सामाजिक संस्थांतर्फे जिल्हाधिकारी उत्पादन शुल्क अधीक्षकांना निवेदन दिले. त्यानंतर उत्पादन शुल्कतर्फे कारवाईला सुरुवात करण्यात आली. निवेदन देते वेळी राधेश्याम चौधरी, मुस्लिम समन्वय समितीचे अश्फाक पिंजारी, सलीम पटेल, ज्योती वाणी, जमियत उलेमा हिंदचे रागिब देशमुख, सलीम इनामदार, महेंद्र पवार, व्ही.एस.राणे, अमोल कोल्हे, डॉ.विकास निकम अादी उपस्थित हाेते. 

...तर जप्त मद्याचा लिलाव होणार 
परमिटरूम मधील साठा सील करून गोडाऊनमध्ये टाकण्यात येत आहे. वाइन शॉपमधील साठ्याचा पंचनामा करून ताे मालकाच्या ताब्यात देत आहे. एखाद्याने परवाना स्थलांतरित केल्यास तो नूतनीकरण करून त्याचा साठा पुन्हा परत केला जाईल. जर दुकान स्थलांतरित करायचे नसल्याचा अर्ज दिला, तर ताब्यात घेतलेला साठ्याचा लिलाव करणार असल्याचे उत्पादन शुल्क उपनिरीक्षक चंद्रकांत पाटलांनी सांगितले. 

बंद दुकाने स्थलांतरित हाेणार 
४५बंद झालेल्या दारूच्या दुकानांपैकी बहुतांश दुकाने इतरत्र स्थलांतरित करण्यात येणार अाहेत. उत्पादन शुल्काच्या कारवाईनंतर तळीरामांनी वाइन शाॅपवर नेहमी प्रमाणे गर्दी केली हाेती. मात्र, त्यांना कारवाईमुळे माल नसल्याचे सांगण्यात अाले. एका वाइन शाॅपचालकाने तर हे दुकान स्थलांतरित हाेणार अाहे, असे सांगून त्यांनी त्या ग्राहकांची नावे अाणि माेबाइल क्रमांक रजिष्टरवर लिहून घेतली. 

भजे गल्लीतील प्रिन्स वाइन शॉपमध्ये शुक्रवारी कारवाई करताना उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संजय कोल्हे कर्मचारी. तर पंचनामा झाल्यानंतर अधिकाऱ्यांची नजर चुकवत दुकान उघडून मद्याचा साठा इतरत्र हलवताना प्रिन्स वाइन शॉपमधील कामगार. 

राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सु. ल. आढाव यांनी दारूच्या दुकानांवर कारवाई करताना मद्यसाठ्यांबाबत पंचनामा करून त्याची नोंद घेण्यात यावी, तो मद्यसाठा दुकान मालकाच्या ताब्यात ठेवण्यात यावा. त्यामध्ये नोंदीनुसार मद्यसाठा कमी आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे अादेश अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार शुक्रवारी अधिकाऱ्यांनी कारवाईची माेहीम सुरू केली. सायंकाळी वाजता भजेगल्लीतील प्रिन्स वाइन शॉपमध्ये उत्पादन शुल्क निरीक्षक संजय कोल्हे हे कारवाई करीत हाेते. या वेळी ‘दिव्य मराठी’चा चमू देखील त्या ठिकाणी पाेहचला. छायाचित्रकाराने कारवाईचे छायाचित्र काढताच निरीक्षक काेल्हे दचकले. त्यांनी हरकत घेत छायाचित्रकारावर संताप व्यक्त करत ‘बस झाले अाता, किती फाेटाे काढतात’ असे म्हणत काेल्हे बाजूच्या परमिट रूममध्ये गेले. तितक्यात बंद झालेले प्रिन्स वाइन शॉप पुन्हा उघडण्यात अाले. कामगारांनी पटापट दुकानातील मद्यसाठ्याचे खाेके काढून ते इतरत्र हलवले. हा सर्व प्रकार छायाचित्रकाराने कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर या गंभीर प्रकाराबाबत ‘दिव्य मराठी’ने राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक आढाव यांच्याशी संपर्क साधून त्यांना घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. त्या वेळी त्यांनी असा प्रकार घडणार नाही. बरं ठीक अाहे, मी बघताे, असे सांगून फाेन कट केला. 
 
 
बातम्या आणखी आहेत...