आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य प्रदेशच्या ४० किलोमीटर सीमेवर २४ तास पथकाची गस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ/यावल- यावल अभयारण्यात सशस्त्र टोळीच्या घुसखोरीनंतर वन्यजीव विभाग अधिक सावध झाला आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्राला लागून असलेल्या ४० किलोमीटर अंतराच्या मध्य प्रदेश सीमेवर २४ तास गस्त, सीमाभागात टेहाळणीसोबतच वनक्षेत्रातील चारही नाक्यांवरील तपासणी अधिक चौकस केली आहे. याबाबत वन्यजीवचे नाशिक येथील वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांनी यावल अभयारण्यात सोने (वाघ) आहे, चोर-लुटारू येतीलच. मात्र, आम्ही त्यांना सोडणार नाही. वन्यजीव, प्रादेशिक वनविभाग, महाराष्ट्र पोलिस आणि एसआरपीच्या मदतीने घुसखोरांच्या नांग्या ठेचून काढू, असा इशारा "दिव्य मराठी'शी बोलताना दिला.

शुक्रवारी (दि. १५) वाघाच्या शिकारीच्या उद्देशाने १५ सशस्त्र घुसखोरांनी मध्य प्रदेशच्या हद्दीकडून यावल अभयारण्यात घुसखोरी केली होती. मात्र, वन्यजीव विभागाच्या गस्तीपथकासोबत धुमश्चक्री उडाल्याने या घुसखोरांना पळती भुई थोडी झाली. या वेळी थेट गोळीबार झाल्याने वनविभागाने प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. यावल पोलिस ठाण्यात गुन्हादेखील दाखल झाला आहे. या घटनेच्या स्थळी पंचनाम्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक जगदीश परदेशी करंजपाणी-लंगडाआंबा वनक्षेत्रात गेले होते. तेथे गस्तीपथकातील कर्मचाऱ्यांच्या वर्णनावरून अभयारण्यात घुसखोरी करू पाहणारे वाघाच्या शिकारीसाठीच आले असावे, असा प्राथमिक अंदाज समोर आला. कारण बंदूकधारी घुसखोरांनी वृक्षतोड अथवा वनक्षेत्रात अतिक्रमण केले नव्हते. या सर्व घटना पाहता वन्यजीव विभाग अधिक दक्ष झाला आहे. यावलच्या सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) अश्विनी खोपडे यांनी ४० किलोमीटर अंतराच्या मध्य प्रदेश सीमेवरील गस्त वाढवली आहे. पूर्वसूचना देता कर्मचाऱ्यांना नेमून दिलेले ठिकाण सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच वरिष्ठांकडे एसआरपी तुकडीची मागणीदेखील केली आहे.

-जंगल आपले आहे, आणि ते वाचले पाहिजे यासाठी स्थानिकांनी सहकार्य करावे. संशयास्पद हालचाली दिसताच वन्यजीव विभागाला माहिती द्यावी. यामुळे अपप्रवृत्तींचा बंदोबस्त करता येईल. राजेंद्र नन्नवरे, पर्यावरणअभ्यासक
- शुक्रवारी केवळयावल अभयारण्यातच नव्हे, तर जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच कमांडोसारखा पेहेराव करून घुसखोरीचा प्रयत्न झाला. ही घटना पहिली आणि शेवटची ठरावी, यासाठी तातडीने जिल्हा पोलिस अधीक्षकांशी बोललो. एस.व्ही.रामाराव, वनसंरक्षक(वन्यजीव), नाशिक
- वन कर्मचाऱ्यांना हस्तचलितकॅमेरे दिल्यास अभयारण्यात घुसखोरी करणाऱ्यांचे चेहेरे टिपणे सोपे होईल. यासाठी आम्ही वरिष्ठांकडे मागणी केली आहे. अश्विनी खोपडे, सहायकवनसंरक्षक (वन्यजीव) , यावल
- आम्ही सर्वांनीप्रचंड मेहनत घेऊन मध्यंतरी अतिक्रमण काढण्याचा सपाटा लावला होता. त्यामुळे पोटदुखी झालेली काही मंडळी आता जंगलात आग लावण्याचे उपद्व्याप करत आहे. या नतद्रष्टांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान असले, तरी आम्ही मागे हटणार नाही.

- फक्त पाच-सातवर्षांपूर्वीचे आणि आताच्या यावल अभयारण्यात कमालीचा फरक आहे. अतिक्रमणमुक्त अभयारण्यात आता वनराई पुन्हा बहरत असून इतर अनेक वन्यप्राण्यांसोबत पट्टेदार वाघाचा अधिवास पुनर्प्रस्थापित झालेला आहे.

गस्तीवर असणाऱ्याप्रत्येक पथकाकडून अपडेट घेणे सुरू आहे. पथकांकडे वायरलेस वॉकी-टॉक संच, जीपीएस यंत्रणा आदी सुविधांच्या माध्यमातून जंगलातील प्रत्येक हालचाल टिपली जाते. प्रत्येक पथकाचा आपापसातील संपर्कदेखील नियमित तपासण्यात येत आहे. आम्ही सतर्क आहोतच.