आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमळनेर- बाजार समितीच्या तीन विरोधी संचालकांचे ठिय्या आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाजार समिती कार्यालयासमाेर ठिय्या अांदाेलन करताना संचालक. - Divya Marathi
बाजार समिती कार्यालयासमाेर ठिय्या अांदाेलन करताना संचालक.
अमळनेर- मागील सभेच्या इतिवृत्ताची माहिती सचिव उन्मेषकुमार राठोड हे देत नसल्याने याप्रकरणी संचालक विजय प्रभाकर पाटील, सचिन बाळू पाटील पराग श्याम पाटील या विरोधी गटातील तिघा संचालकांनी बाजार समितीच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. हे आंदोलन तब्बल दोन तास चालले. 
 
सचिव राठोड यांनी १८ एप्रिलपर्यंत माहिती देण्याचे पत्र दिल्यानंतर या संचालकांनी हे आंदोलन थांबवले. मागील सभेच्या इतिवृत्ताची प्रत अजेंड्याची छायांकित प्रत मिळण्याबाबत या तिघा संचालकांनी गुरुवारी पत्र दिले होते. मात्र, याबाबत माहिती देण्यास सचिवांनी नकार दिल्यानंतर हे संचालक संतापले आणि त्यांनी ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, या संचालकांनी दिलेल्या या पत्रात म्हटले आहे की, सचिवांकडे वेळोवेळी विहित कागदपत्रांची मागणी करत असतानाही बाजार समिती कार्यालयाकडून कागदपत्रे मिळत नाहीत. १५ नोव्हेंबर २०१५ ते १३ एप्रिलपर्यंत झालेल्या मासिक सभांचे अजेंडे, रजिस्टर छायांकित प्रत, सभांचे इतिवृत्त, दररोज झालेल्या रोखीच्या व्यवहाराचा तपशील, डेली कॅशबुक, १३ एप्रिलपर्यंत छायांकित प्रत मिळावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, ही बाब सभापतींसमोर ठेवण्यात येईल, असे उत्तर दिल्याने संचालक संतापले होते. 
 
संचालक असूनही आम्हाला माहिती मिळत नाही. हा कोणता पारदर्शी व्यवहार आहे? अशी सचिन पाटील यांनी सचिवांना विचारणा केली; अन्यथा माहिती मिळत नाही, असे लेखी द्या, अशी मागणी या संचालकांनी केली. ही माहिती घेण्याचा अधिकार आहे. माहिती मिळत नाही तोपर्यंत सचिवांनादेखील घरीही जाऊ देणार नाही, असा पवित्रा तिघा संचालकांनी घेतला. त्यानंतर बाजार समितीच्या सचिवांनी १८ एप्रिलपर्यंत माहिती देण्याचे पत्र दिले. 
 
सचिवांचे आश्वासन 
तिघा संचालकांचा अर्ज सभापतींकडे टिप्पणीसाठी पाठवण्यात येईल. त्यांच्या टिप्पणीनंतर १८ एप्रिलपर्यंत आपणास माहिती उपलब्ध करून देण्यात येईल, असे पत्र सचिवांनी या तिघा संचालकांना दिले आहे. त्यामुळे तूर्त निर्माण झालेला तिढा दूर करण्यात यश मिळाले. 
बातम्या आणखी आहेत...