आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव : अपघातात जखमी वराची 12 दिवसांपासून मृत्यूशी झुंज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जखमी मुकेश सातदिवे - Divya Marathi
जखमी मुकेश सातदिवे
जळगाव : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अपघातात जखमी झालेला भुसावळ येथील युवक गेल्या १२ दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत आहे. त्याच्या डोक्यासह पायावर तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अंगाची हळद पुसण्यापूर्वीच या नवदापंत्याच्या जीवनात अपघाताने विघ्न आले आहे. 
 
जळगाव शहरातील टागोरनगरातील सीमा दिलीप साळवे भुसावळ शहरातील नारायणनगरातील रहिवासी मुकेश अरुण सातदिवे हे दोघे ४ जून रोजी शानबाग सभागृहात विवाहबद्ध झाले होते. सीमा सहा महिन्यांची असताना तिचे पितृछत्र हरवले. काका राजू साळवे यांनी तिचा सांभाळ करून विवाह लावून दिला. लग्नानंतर ५ जून रोजी दुचाकीवर हे नवदापंत्य धार्मिक विधीसाठी भुसावळला चालले होते.
 
दरम्यान भुसावळ शहरातील नाहाटा चौफुलीवर ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला होता. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले होते. मुकेशच्या हाताला डोक्याला जबर मार बसला होता.
 
दोघांना सुरुवातीला भुसावळ शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर जळगाव शहरातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, मुकेशची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला ६ जून रोजी औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.
 
जळगाव येथील खासगीरुग्णालयात दाखल असलेल्या सीमाला १५ जून रोजी डिस्चार्ज मिळाला. मुकेशची गेल्या बारा दिवसांपासून मृत्यूशी झुंज सुरू आहे. त्याच्या डोक्यावर दोन पायावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तो रेल्वे विभागात कंत्राटी कामगार आहे.
 
घराची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च होत आहे. त्याला जीवनदान देण्यासाठी दात्यांनी मदतीचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा सीमाचे काका राजू साळवे यांनी व्यक्त केली आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...