आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: मेहरूण तलावात बुडून युवकाचा मृत्यू ; गेल्या पाच महिन्यांत कुटुंबातील तिघांचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मेहरूण तलावावरील गणेश घाटावर मेहुणे मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या अमित काॅलनीमधील युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी वाजता घडली. संजय प्रजापती असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या पाच महिन्यांत प्रजापती कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 
 
सुप्रीम कॉलनी भागातील अमित कॉलनी येथील रहिवासी संजय चंद्रदेव प्रजापती (वय १९) हा औद्योगिक वसाहतीतील एका चटई कंपनीत कामाला होता. सोमवारी कामगार दिनानिमित्त कंपनीला सुटी असल्याने तो घरीच होता. सुटी असल्यामुळे साेमवारी दुपारी संजय हा मेहुणा राजू लालबिहारी प्रजापती (वय २८, रा. अयोध्यानगर), मित्र अमृत देवेंद्र प्रजापती (वय १८) आनंद लाला गाैड (वय १९, दोन्ही रा. सुप्रीम कॉलनी) यांच्यासाेबत मेहरूण तलावात पोहण्यासाठी गेला हाेता. संजयला पोहता येत नसल्याने तो गणेश घाटावरच बसून होता. मात्र, सर्व जण पोहत असताना त्यालाही पाण्यात उतरण्याचा मोह झाला. त्यामुळे तो घाटावरून पाण्यात उतरताच त्याचा पाय खड्ड्यात गेला त्यानंतर ताे पाण्यात बुडाला. 

दीड तासानंतर सापडला मृतदेह
संजय हा तलावात उतरल्यानंतर कुठेच दिसत नाही. तसेच त्याचे कपडे घाटावरील पायऱ्यांजवळ पडून होते. त्यामुळे तो बुडाला की काय? अशी शंका आल्याने मेहुणे राजू प्रजापती यांनी त्याचा शोध घेतला. तो बुडाल्याची खात्री झाल्यानंतर मेहुणे राजू यांनी रडायला सुरुवात केली. ही घटना शेजारी म्हशी चारणाऱ्या तरुणाच्या लक्षात येताच त्याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल, उपनिरीक्षक एन. बी. सूर्यवंशी, रतिलाल पवार, अश्रफ शेख यांच्यासह कर्मचाऱ्यांचा ताफा घटनास्थळावर दाखल झाला. यानंतर पट्टीच्या पोहणाऱ्यांना बोलावून दीड तासानंतर दारा नावाच्या तरुणाने संजयचा मृतदेह बाहेर काढला. 
 
महिनाभरातील तिसरा बळी 
मेहरूण तलावाच्या सुरक्षाव्यवस्थेवर नेहमीच प्रश्नचिन्ह उभे राहत अाहे. गेल्या महिनाभरातील तिसरा बळी साेमवारी दुपारी संजय प्रजापती याचा गेला अाहे. २५ मार्च राेजी बांभाेरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भूषण प्रकाश पाटील (वय २१, रा. सुरत) आणि निखिल विजय पाटील (वय २०, रा. नंदुरबार) या दोघांचा बुडून मृत्यू झाला हाेता. तरीही महापालिकेने सुरक्षारक्षकाची नियुक्ती केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात अाहे. 

तिघांवर काळाची झडप 
संजयचे पाच महिन्यांपूर्वी डिसेंबर राेजी लग्न झाले हाेते. दुर्दैवाची बाब म्हणजे, लग्नाच्या आठ दिवसाआधीच त्याची आई सुखादेवी प्रजापती यांचा गंभीर आजाराने मृत्यू झाला हाेता. अाईच्या दु:खातून सावरत नाही ताेच जानेवारी महिन्यात संजयच्या वडिलांचा अाजारामुळे मृत्यू झाला. त्यामुळे प्रजापती कुटुंबीयांवर एकामागून एक दु:खाचे डोंगरच कोसळले होते. एवढे दु:ख कमी हाेते की काय, साेमवारी संजयचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यामुळे प्रजापती कुटुंबात शोककळा पसरली आहे. गेल्या पाच महिन्यांत कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाल्याने प्रजापती कुटुंबीयांना धक्काच बसला आहे. संजयच्या पश्चात पत्नी अंजलीदेवी, भाऊ अनिल, वहिनी, मेहुणे राजू लालबिहारी प्रजापती असा परिवार आहे. 
बातम्या आणखी आहेत...