आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मेहरूण’च्या मापात पाप; अहवाल परत पाठवला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- आठ महिन्यांपासून अतिक्रमण निश्चित करण्यासाठी सुरू असलेल्या मेहरूण तलाव मोजणीचा अहवाल अवघ्या एका दिवसातच जिल्हा प्रशासनाने भूमी अभिलेख विभागाकडे परत पाठवला आहे. दोन वेळा मोजणी करूनदेखील या अहवालात अतिक्रमणाबाबत कोणतीही सुस्पष्टता नाही. अहवालामध्ये एक पानी पत्र आणि त्याला काही नकाशे जोडण्यात आलेले आहेत. त्यात अतिक्रमण किंवा तलावाचे मूळ क्षेत्रफळदेखील कळत नसल्याने हा अहवाल बुधवारी परत पाठवला.
धनदांडग्यांनी अतिक्रमण करून लचके तोडलेल्या मेहरूण तलावाचे मूळ क्षेत्र मोजण्यासाठी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी नोव्हेंबर २०१४मध्ये जिल्हा प्रशासनाला आदेश दिले होते. मंत्र्यांच्या आदेशानंतर तब्बल दोन वेळा मोजणी आणि दोन वेळा मोजणीची पडताळणी करण्यात आली आहे. दोन वेळा केलेल्या मोजणीनंतर भूमी अभिलेख विभागाने सर्व्हे क्रमांकनुसार नकाशे तयार केले आहेत. तांत्रिक मोजमाप असलेले काही नकाशे आणि कव्हरिंग लेटर देऊन अहवाल पूर्ण करून पाठवण्यात आला आहे. अहवालात मात्र अतिक्रमण किती, कोणी केले, कधीपासून अतिक्रमण आहे, यासंदर्भात कोणतीही बाब अधोरेखित करण्यात आलेली नाही. त्यामुळे अहवालानुसार अतिक्रमण काढणे जिल्हा प्रशासनाला शक्य होणार नाही.
जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र
भूमी अभिलेख विभागाने तलावावरील अतिक्रमणाचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा. अतिक्रमण किती आणि कोणी केले आहे, याचीदेखील माहिती अहवालात नमूद करावी, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी दिले आहे. तांत्रिक बाबींची पडताळणी करून अतिक्रमणाचा वेळेत नवीन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नवीन अहवाल येईपर्यंत महापालिकेचा तलाव सुशाेभिकरणाचा प्रकल्पदेखील पुन्हा रखडणार असल्याची स्थिती आहे.