आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५९ लेटलतिफांना नोटीस बजावून होईल कारवाई!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- महापालिकेत बुधवारी ५९ कर्मचारी वेळेत हजर नसल्याचे आढळून आले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. कार्यालय सुरू होण्याच्या वेळेत उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी विविध विभागांना भेट दिली. त्यात हे कर्मचारी कार्यालयीन वेळेत आले नसल्याचे सिद्ध झाले. त्यांच्या हजेरी पुस्तकांचीही उपायुक्तांनी तपासणी केली.

महापालिकेतील कर्मचारी कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहतात का, किती कर्मचारी हे कार्यालयात उशिरा येतात. त्यांच्या कामकाजाच्या वेळेप्रमाणे कामकाज होते का. त्याचप्रमाणे काही कर्मचारी हे कामाच्या नावाने बाहेर थांबतात, उशिराने येतात असे प्रकारही होत आहे. बहुतांश कर्मचारी हे कार्यालयात हजेरी लावून बाहेर काही सांगता निघून जातात. हे सर्व प्रकार महापालिकेच्या कार्यालयामध्ये सुुरू असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. त्याचप्रमाणे महापालिकेत अधिकारी नसताना ठरावीकच कर्मचारी हे कार्यालयात आढळतात. या प्रकाराची दखल घेत बुधवारी महापालिकेचे कार्यालय सुरू होण्याच्या वेळी १०.४५ वाजता उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी मनपा आवारातील सर्व विभागांच्या कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर तेथील हजेरी पुस्तकांत उपस्थितांची स्वाक्षरी तपासली. त्यात वेळेत उपस्थित नसलेल्यांच्या नावापुढे उशिराची नोंद केली आहे. मनपा आवारात १५ ते १६ विभागात जाऊन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची पडताळणी केली आहे. यामध्ये सर्व विभागातील मिळून ५९ लेटलतीफ कर्मचारी असल्याचे आढळून आले. या कर्मचाऱ्यांची माहिती त्या विभागाला आस्थापनेकडे पाठविली. या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे. तसेच आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांच्याशी चर्चेनंतर दंड करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

काम सोडून कर्मचारी असतात बाहेर
महापालिकेत कितीही महत्त्वाचे काम असले तरी कर्मचारी जागेवर नसतात. झाडाझडती घेतल्यावर अशा गोष्टी उघड होतात. कर्मचारी मात्र काम सोडून महापालिकेच्या आवारासह इतरत्र फिरत असल्याचे बऱ्याचदा दिसून येते.

महापालिकेतगेल्या चार महिन्यांत तिसऱ्यांदा कारवाई करण्यात आली आहे. अचानक भेटी दिल्यानंतर गैरहजर कर्मचारी उघडकीस येतात. दररोज हाच प्रकार महापालिकेत सुरू असतो; परंतु याकडे गंभीरपणे कोणीच लक्ष देत नाही. अिधकारी कधीतरी कारवाई करतात. दुपारच्या वेळेसही जेवणाच्या नावाखाली कर्मचारी गायब झालेले असतात. त्यांच्यावरही कारवाई करण्याची गरज आहे. अिधकाऱ्यांनी दररोज सर्व विभागांना भेटी द्यायला हव्या. तरच लेटलतीफ वेळेवर येतील.

अचानक केली पाहणी
महापालिकाआयुक्त डॉ. नामदेव भोसले हे मुंबईत बैठकीला गेले आहेत. त्यामुळे महापालिकेत आयुक्तांच्या अनुपस्थितीत उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी अचानक भेट देऊन लेटलतीफ कर्मचाऱ्यांची नोंद केली आहे. याअगोदर ‘दिव्य मराठी’नेही आयुक्तांच्या गैरहजेरीत कर्मचाऱ्यांची हजेरी कमी असल्याचे वृत्त दिले होते. त्यामुळे त्याची दखल घेण्यात येऊन बुधवारी ही पाहणी करण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.