आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका कार्यालयाचे होणार स्थलांतर, हालचाली गतिमान, दुर्घटनेची भीती वाढली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - पालिकेची जीर्ण इमारत धोकादायक बनली आहे. दर्शनी भागातील पडदीचे अवशेष कोसळण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. आतापर्यंत सुदैवाने जीवित वित्तहानी झाली नसली तरी सातत्याने दुर्लक्ष झाल्यास अपघात होण्याची शक्यता आहे.
पालिकेची स्थापना १८८२मध्ये झाली. या वेळी ब्रिटिशकाळात पालिकेच्या मुख्य प्रशासकीय कौलारू इमारतीचे काम पूर्ण करण्यात आले होते. यानंतरच्या काळात १९८१-८२मध्ये प्रवेशद्वार आणि त्यावरील नगराध्यक्ष दालनासह उपनगराध्यक्षांचे दालन, बांधकाम विभाग, गटनेता दालन, शिक्षण सभापतींचे दालन आदींची उभारणी करण्यात आली, तर टेरेसवर पाण्याची छोटी टाकी बांधण्यात आली. आता या पाण्याच्या टाकीला गळती लागली आहे. पाणी भिंतींमध्ये शिरून हे सर्व बांधकाम जीर्ण झाले आहे. कोणत्याही वेळी हे बांधकाम कोसळण्याची भीती आहे. यामुळे या इमारतीमधून पालिकेचे प्रशासकीय कामकाज चालवणे जिकिरीचे झाले आहे.
मुख्याधिकारी बी. टी. बाविस्कर यांनी हे धोके ओळखून आता पालिका प्रशासकीय इमारतीचे स्थलांतर करण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत. पालिकेच्या मालकीच्या शहरात अनेक इमारती आहेत. यातील पालिकेच्या कामकाजासाठी सोईची ठरेल तसेच नागरिकांचा सहज संपर्क होईल अशा जागेची निवड केली जाणार आहे. पालिकेच्या स्थलांतरानंतर नवीन सातमजली इमारतीचे प्रस्तावित कामही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.

आवारात विहीर कायम ठेवणार
पालिकेच्या सध्याच्या इमारतीला ब्रिटिशकालीन वारसा आहे. या इमारतीच्या मध्यवर्ती भागात ब्रिटिशांच्या काळातील मोठी विहीर आहे. विशेष म्हणजे, सध्याच्या काळातही ही विहीर शहरातील नागरिकांची टंचाईच्या काळात तहान भागवते. या वास्तूत नवीन इमारत उभी झाली तरी, आवारातील जुनी विहीर कायम ठेवली जाणार आहे.

या जागांची केली चाचपणी
पालिकेचीजळगाव रोडवरील शाळा क्रमांक एक, गोपाळनगरातील पालिकेचे सांस्कृतिक भवन, युनियन बँकेसमोरील जुने जनसेवा कार्यालय, पालिकेच्या जामनेर रोडवरील अग्निशमन केंद्राची वास्तू, यावल रोडवरील फिल्टर हाऊस आदी जागांची चाचपणी करण्यात आली आहे. यातील सोईच्या जागेची निवड केली जाणार आहे. एकाच इमारतीमधून काम पूर्ण होत नसल्यास दोन इमारतींची निवड करून काही विभागांची विभागणी करून कामकाज सुरू करण्याचेही पालिका प्रशासनाचे नियोजन आहे.

नवीन इमारत उभी राहणार
पालिकेची जीर्ण इमारत पाडून त्या जागी सातमजली सुसज्ज इमारत उभी राहणार आहे. बसस्थानक आणि रेल्वेस्थानकाच्या मध्यवर्ती भागातील या जागेचा व्यावसायिक उपयोग करण्यासाठी तळमजल्यावर व्यापारी संकुल, तर वरील सहा मजल्यांवर पालिकेचे विविध विभागांसाठी बांधकाम होईल. प्रत्येक मजल्यावर हॉल सिस्टिमने बांधकाम होऊन नंतरच्या काळात प्लायवूड पार्टिशन करून विभागांची रचना केली जाणार आहे. तळमजल्यावरील व्यापारी संकुलामुळे पालिकेच्या उत्पन्नातही वाढ होईल.

नवीन टर्ममधील पहिल्याच बैठकीत ठराव
-पालिकेची इमारतअत्यंत जीर्ण आणि धोकादायक झाली आहे. यामुळे या इमारतीतून कामकाज स्थलांतरित करावयाचे आहे. यासाठी नवीन टर्ममधील पहिल्याच सभेत ठराव केला जाणार आहे. ठरावाला मंजुरी मिळाल्यास तत्काळ नियोजन केले जाईल. भविष्यातील सातमजली इमारतीसाठीही मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
-बी.टी. बाविस्कर,मुख्याधिकारी, भुसावळ
पालिकेच्या स्थापनेवेळी बांधकाम करण्यात आलेल्या कौलारू इमारतीला आता १३४ वर्षे पूर्ण झाली आहेत, तर १९८२मध्ये बांधकाम झालेले मुख्य प्रवेशद्वार आणि त्यावरील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष दालनाचा भाग आता जीर्ण झाला आहे. यामुळे पालिकेचे कामकाज या इमारतीमधून स्थलांतरित करण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे. पालिकेच्या मालकीच्या जागांचा शोध सुरू असून, येत्या दोन महिन्यांत ठोस निर्णय घेतला जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...