Home »Maharashtra »North Maharashtra »Jalgaon» News About Murder Of 4 Persons Of Family In Jalgaon

जळगावच्या भादलीत एकाच कुटुंबातील चार जणांचा खून, संपत्तीच्या वादाची शक्यता

प्रतिनिधी | Mar 21, 2017, 05:55 AM IST

जळगाव-भादली गावातील भोळे कुटुंबातील पती-पत्नीसह दोन मुलांची रविवारी मध्यरात्री निर्घृण हत्या करण्यात अाली. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी अाेळखीच्याच लाेकांनी खून केल्याचा पोलिसांना संशय अाहे.

प्रदीप सुरेश भोळे (४५), पत्नी संगीता (३५), मुलगी दिव्या (८), तर मुलगा चेतन (५) अशी मृतांची नावे असून ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस अाली. खुनाचे नेमके कारण कळू शकले नसले तरी भाेळे यांच्या नातेवाइकांसह काही जवळच्या मंडळींतील ७ जणांना नशिराबाद पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले अाहे.
खुनाच्या घटनेमुळे साेमवारी सकाळपासून भादलीमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात अाला हाेता. पोलिस अधीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर, अपर पाेलिस अधीक्षक माेक्षदा पाटील, भुसावळचे परिवीक्षाधीन उपविभागीय पाेलिस अधिकारी नीलाेत्पल, परिवीक्षाधीन अायपीएस मनीष कालवाणिया, एलसीबीचे राजेशसिंह चंदेल, नशिराबाद पाेलिस ठाण्याचे सहायक पाेलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी पाहणी केली. तसेच अारसीपी प्लाटून, क्यूअारटी, कमांडो पथक तसेच पाेलिस कर्मचारी तैनात करण्यात अाले हाेते. भादली गावात यापूर्वी एवढी भयावह घटना कधीच घडलेली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

ठसेतज्ज्ञ, श्वानपथक दाखल
घटनास्थळी जिल्हा पाेलिस दलाचे ठसेतज्ज्ञ तसेच श्वानपथकही अाले. त्यांनी सर्व घटनास्थळाची कसून तपासणी केली. हल्लेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र, हॅपी नावाच्या श्वानाने भाेळे यांच्या घरासमाेर असलेल्या पडक्या घरापर्यंतच माग काढला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर साेमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात अाणले. या ठिकाणी नागरिकांनी माेठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
चारही जणांवर सारखेच वार
मारेकऱ्यांनी भोळे कुटुंबातील चारही सदस्यांवर एकसारख्याच पद्धतीने वार केले आहेत. चौघांच्याही डाेक्यात डाव्या बाजूला कुऱ्हाड किंवा काेयत्यासारख्या तीक्ष्ण हत्याराने वार केले. दरम्यान, प्रदीप यांच्या शरीरावर अन्य ठिकाणीही वार करण्यात आले आहेत. त्यांचा डाव हात फ्रॅक्चर असल्यामुळे त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पाठपुरावा करणार...
- एकाच कुटुंबातील चाैघांची निर्घृण हत्या हाेणे अतिशय दुर्दैवी घटना अाहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध लागणे आवश्यक आहे. हत्या नेमकी का करण्यात आली यामागील सत्यता बाहेर यायला हवी. यासाठी मी पाठपुरावा करणार अाहे.
एकनाथ खडसे, माजी महसूलमंत्री
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended