आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवापूर रेल्वेस्थानकातील दूरध्वनी एक वर्षापासून बंद, प्रवाशांचे होताय हाल, वायरलेस फोन असून नसल्यासारखाच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवापूर - शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या येथील रेल्वेस्थानकातील दूरध्वनी गेल्या वर्षभरापासून बंद आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. दुसरीकडे हा प्रश्न सोडवण्याऐवजी रेल्वे बीएसएनएलचे अधिकारी एकमेकांची उणीदुणी काढण्यात व्यग्र आहे. 
 
येथील रेल्वेस्थानकावरील दूरध्वनी क्रमांकावर (०२५७९-२५०२२२) फोन केल्यानंतर एक-दोनदा रिंग वाजते. त्यानंतर फोन आपोआप बंद होतो. त्यामुळे स्टेशन मास्टर फोन उचलत नाही असा प्रवाशांचा गैरसमज होतो; परंतु प्रत्यक्षात गेल्या एक वर्षापासून बंद आहे. दूरध्वनी सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने बीएसएनएल कार्यालयात अनेकवेळा संपर्क साधला तसेच पत्रव्यवहार केला; परंतु अद्यापही हा दूरध्वनी क्रमांक सुरू झालेला नाही. त्याचा त्रास प्रवाशांना होत आहे.
 
 बीएसएनएलने रेल्वेला वायरलेस फोन दिला असून, त्याचा वापर करण्याची सूचना बीएसएनएलने रेल्वे प्रशासनाला दिलेली नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला नवीन नंबर जाहीर करता येत नसल्याचा दावा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. काही प्रवासी रेल्वेची माहिती जाणून घेण्यासाठी स्टेशनवर संपर्क साधतात;
 
परंतु प्रवाशांना रेल्वे गाड्यांची माहिती किंवा आरक्षणासंदर्भात विचारणा करायची असल्यास त्यांनी रेल्वे अॅप्स अथवा १३९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे सांगण्याचा प्रयत्न रेल्वे विभागाचे अधिकारी करीत आहे. शरद लोहार पश्चिम रेल्वे बोर्डाचे सदस्य आहेत. त्यांचेही हा प्रश्न सोडवण्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
 
फाॅल्ट सापडत नाही 
- शहरात काही दिवसापूर्वी नगरपालिकेने रस्त्याचे काम केले. त्या वेळी रेल्वे स्टेशनच्या टेलिफोनची वायर दाबली गेली. त्यामुळे रेल्वेस्थानकाचा फोन काही दिवसापासून नादुरुस्त झाला आहे. दुरुस्ती करणे अवघड झाले. वायर कुठे नादुरुस्त झाली हे समजत नसल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून रेल्वे प्रशासनाला वायरलेस फोन दिला आहे. -विष्णू निफाडे, अभियंता बीएसएनएल, नवापूर. 
 
बीएसएनएल अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष 
- रेल्वे विभागाच्या वरिष्ठ कार्यालयात तक्रार करण्यात आली आहे. मात्र, बीएसएनएल विभागाने कायमस्वरूपी व्यवस्था केली नाही. वायरलेस फोन दिला आहे. तो पण लागत नाही. या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे. -व्ही.एस.मीना, रेल्वे अधीक्षक, नवापूर.
 
प्रवाशांचा संपर्क येतो 
नवापूर स्थानकाशी तीन जिल्ह्यांचा संपर्क येतो. हे स्टेशन महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेवर असल्याने गुजरात राज्यातील तापी अहवा डांग जिल्ह्यातील तसेच नवापूर तालुक्यातील प्रवासी रोज स्थानकामध्ये येतात. त्याचबरोबर अनेक जण नवापूरहून मुंबई, तिरूपती बालाजी, अजमेर, शेगाव अशा ठिकाणी देवदर्शनाला जातात. दूरध्वनी बंद असल्याने प्रवाशांना रेल्वेविषयी चौकशी करता येत नाही. 
बातम्या आणखी आहेत...