जळगाव- नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पक्षाची झालेली पिछेहाट अंतर्गत नाराजीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बदलीचे संकेत मिळत आहेत. खुद्द जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.सतीश पाटील यांनी हे संकेत दिले आहेत.
जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या सदस्यांमधून गटनेता निवडण्यासाठी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात बैठक झाली. नूतन जिल्हा परिषद सदस्यांशी डॉ.पाटील यांनी संवाद साधला. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, आता जिल्हाध्यक्ष राहण्याची इच्छा राहिलेली नाही. यापुढे मतदारसंघात काम करणार आहे.
मात्र, जाताना काहीतरी चांगले करून जाईल, असे सांगितले. जिल्हा परिषद निवडणुकीत राज्यासह जिल्ह्यात पैशांचा वापर करण्यात आला. जलसंपदामंत्री गिरीश महाजन गल्लोगल्ली मोटारसायकलीवर फिरून पैसे वाटत होते. मनपा जि.प. निवडणुकीत लागलेला निकालच संशयास्पद असल्याचा आरोपही डॉ.पाटील यांनी केला.