आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिकमुक्त चाळीसगाव अभियानाची वाताहत, नियमित कारवाईअभावी कॅरिबॅगचा पुन्हा वापर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव- शहरात प्लास्टिकमुक्त अभियानाची वाताहात होत आहे. पालिकेने स्वातंत्र्य दिनापासून शहरात प्लास्टिक बंदीचा निर्णय केला आहे. पंरतु, या निर्णयाला नागरिकांसह विक्रेत्यांनी खो दिला आहे. 
 
शहरात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅगचा सर्रास वापर सुरू अाहे. नागरिकांची अनास्था पालिकेच्या कचखाऊ धोरणामुळे प्लास्टिक बंदीच्या आदेशाला हरताळ फासला जात आहे. 
 
प्लास्टिकच्या अती वापरामुळे अनेक महानगरांना मोठया संकटांना सामोरे जावे लागत आहे. पर्यावरणावर देखील प्लासिटकचा विपरीत परिणाम होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. केंद्र सरकाच्या स्वच्छ भारत अभियान कॅरिबॅग मुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने १५ ऑगस्टपासून प्लास्टिकमुक्त चाळीसगाव हे अभियान हाती घेतले आहे. प्लास्टिक कॅरिबॅगच्या वापरावर निर्बंध यावे, म्हणून नगरपरिषदेने विविध उपक्रम हाती घेतले. अभिनेता सयाजी शिंदे ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांच्या हस्ते प्लास्टिकमुक्त चाळीसगाव हे अभियान सुरू करण्यात आले. त्यानंतर शहरवासियांचे विक्रेत्यांचे पत्रकाव्दारे आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी विक्रेत्यांची भेटी घेऊनन प्रबोधन केले. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅगचा वापर करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार देण्यात आले आहे. त्यानुसार कॅरिबॅगचा वापर करणाऱ्या विक्रेत्यांकडे जप्तीची कारवाई देखील झाली. शहरात नगरपरिषदेकडून तसेच सामाजिक संघटनांतर्फे मोफत कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. परंतु, इतके करुन देखील शहरात कॅरिबॅगचा सर्रास वापर सुरू आहे. गणेशोत्सवाच्या काळात तर कॅरिबॅगच वापराला ऊत आला होता. भाजीपाला, दूध, फळे, फुले, पुजेचे साहित्य, मिठाईचे किराणा दुकानांवर प्लास्टिकच्या कॅरिबॅगचा वापर सुरू आहे. नागरिकांमधील अनास्था आरोग्य विभागाच्या कारवाईत सातत्य नसल्याने अभियानाची वाताहत होतेे. 
 
अभियानास पाठींबा 
नगरपालिकेच्या आवाहनानुसार५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅग विकणे बंद केले आहे. काही जण बाहेरुन कॅरीबॅग आणून त्या चोरुन विकत आहेत. नगरपरिषदेने त्यांच्यावर कारवाई करावी. नगरपरिषदेच्या ‘प्लास्टिकमुक्त चाळीसगाव’ या अभियानास पाठींबा आहे. 
- नकुल धामणे, प्लास्टिक विक्रेते 
 
आजपासून दंडात्मक कारवाई 
शहरातील घाटरोड,स्टेशनरोड, भाजीपाला मार्केट बाजारपेठेत नगरपरिषदेच्या पथकाकडून जप्तीची कारवाई करण्यात आली. शनिवारपासून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी कापडी पिशव्यांचा वापर करुन शहर प्लास्टिक मुक्त होण्यास स्वच्छ, सुंदर राहण्यास सहकार्य करावे. 
- घृष्णेश्वर पाटील, आरोग्य सभापती, नगरपरिषद 
 
कारवाईसाठी पथक 
नगरपरिषदेकडूनशहरात १० हजार कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले आहे. प्लास्टिक पिशव्यांसंदर्भात कारवाईसाठी आरोग्य निरीक्षकांसह १० कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे. या अगोदर विक्रेत्यांना पूर्वसूचना देऊन समजवण्यात आले. त्यांनतर जप्तीची कारवाई करण्यात आली. आता विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याची माहिती नगरपालिकेचे आरोग्य सभापती घृष्णेश्वर पाटील यांनी दिली. 
 
शहरालगत चार कारखाने 
५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅगच्या वापरावर उत्पादनावर बंदी असताना देखील शहरातील बाजारात मोठया प्रमाणावर कॅरिबॅग येत आहेत. शहरात प्लास्टिक विक्रेत्यांची आठ ते १० दुकाने आहेत. शहरालगत प्लॉस्टिकचे उत्पादन करणारे चार कारखाने आहेत. याकडे पालिका, प्रदूषण नियत्रंक मंडळ, अन्न औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होते. प्लास्टिकच्या पिशव्यांचा पुरवठा रोखण्यात ते अपयशी ठरत आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...