आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहिदांच्या श्रद्धांजलीस गैरहजर दाेन पाेलिसांची हजेरी मास्तरला शिवीगाळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या कार्यक्रमास उपस्थित नसलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची गैरहजेरी रेकॉर्डवर घेतल्याचा राग आल्यामुळे दोन कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील हजेरी मास्तरला शिवीगाळ केल्याचा प्रकार रविवारी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) कार्यालयात घडला. हा वाद पोलिस निरीक्षकांच्या दालनात गेल्यानंतर सुद्धा वरिष्ठांसमोरच दोन्ही कर्मचाऱ्यांची एकमेकांशी अरेरावी सुरू होती हे विशेष. गेल्या सोमवारीच दोन कर्मचाऱ्यांमध्ये एलसीबी कार्यालयात हाणामारी झाली होती त्याला आठवडाही उलटत नाही तोच हा प्रकार घडल्याने पोलिस दलातील शिस्त वेशीवर टांगली गेली आहे. 


मुंबई येथील हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम रविवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास हजर राहण्यासाठी एलसीबीच्या कर्मचाऱ्यांना निरोप देण्यात आला होता. तरी देखील तुरळक कर्मचारी कार्यक्रमाला हजर राहिले. यामुळे पोलिस निरीक्षक सुनील कुराडे यांनी कार्यक्रमास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करून डायरीवर नोंद करण्यास सांगितले. त्यानुसार हजेरी मास्तरने डायरीवर नोंद घेतली. याचा राग आल्यामुळे गैरहजर असलेले सुभाषसिंग पाटील अाणि मंगलसिंग पाटील हे दाेघे रागारागात कार्यालयात दाखल झाले. कार्यालयात उशिरा येऊनही त्यांनी उलट हजेरी मास्तरलाच शिवीगाळ सुरू केली. हा वाद चांगलाच चिघळला. अखेर कुराडे यांनी हस्तक्षेप केला. त्यांनी वाद घालणाऱ्या दोन्ही कर्मचाऱ्यांना आणि हजेरी मास्तरला दालनात बोलावून घेतले. परंतु वरिष्ठ अधिकारी समोर असूनही दोन्ही कर्मचाऱ्यांची हजेरी मास्तरला शिवीगाळ सुरूच होती. अधिकाऱ्यांबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. या वादानंतर रविवारी पुन्हा एलसीबीचे कार्यालय चर्चेत आले. 


जिल्हाभरात या घटनेची खुसखुशीत चर्चा रंगली होती. या संदर्भात छेडले असता, गैरसमजामुळे कर्मचाऱ्यांमध्ये किरकोळ वाद झाला होता. त्यांची समजूत काढण्यात आली असल्याचे कुराडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. दरम्यान, बिट बदल, कलेक्शनच्या वादातून सोमवार, दि. २० नोव्हेंबर रोजी दिलीप येवले ईश्वर सोनवणे या दोन कर्मचाऱ्यांमध्ये एलसीबी कार्यालयातच हाणामारी झाली होती. त्यापाठोपाठ रविवारी दोन कर्मचारी पुन्हा आपसात भिडण्याचा हा दुसरा प्रकार घडला आहे. यामुळे पोलिस दलातील शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. 


दररोज हजेरीचा पायंडा 
एलसीबीकडेसंपूर्ण जिल्ह्यातील गुन्ह्यांचा समांतर तपास असतो. सध्या ८२ कर्मचारी एलसीबीमध्ये कार्यरत आहेत. यातील २५-३० कर्मचारी दररोज तपासासाठी बाहेरगावी असतात. तर उर्वरित कर्मचाऱ्यांना शहरात अथवा प्रशासकीय कामे करावी लागतात. कुराडे यांनी दररोज सकाळी ११ वाजता कर्मचाऱ्यांची हजेरी घेण्याचा पायंडा पाडला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेळेत कार्यालयात हजर राहावे लागते. या प्रकारामुळे देखील अनेकजण नाराज आहेत. परंतु कामात सुसूत्रता आणि कर्मचाऱ्यांना कामे सोपवण्यासाठी हजेरी पद्धत अधिक फायदेशीर असल्याचे मत कुराडे यांनी व्यक्त केले आहे. 


पोलिस निरीक्षकांनी दिली होती सूट 
गैरहजरराहिलेला एक पोलिस कर्मचारी जास्त संताप व्यक्त व्यक्त करीत होता. त्याची प्रकृती खराब असल्यामुळे पोलिस निरीक्षक सुनील कुराडे यांनीच त्याला दवाखान्यात जाण्यासाठी विशेष सूट दिली होती; परंतु हजेरी मास्तरला याबाबीत काहीच माहीत नव्हती. त्यामुळे त्या कर्मचाऱ्याचेही नाव डायरीवर गैरहजर म्हणून नोंदवले गेले. प्रकृती खराब असल्यामुळे पोलिस निरीक्षकांनी सूट देऊनही गैरहजेरीची डायरीवर नोंद झाल्याचा राग त्या कर्मचाऱ्याला आला होता. काही वेळानंतर संपूर्ण घटनेचा उलगडा झाल्यावर त्या पोलिस कर्मचाऱ्याच्या रागाचा पारा खाली आला.

बातम्या आणखी आहेत...